महापरीक्षा पोर्टलमधील ‘व्हायरस’ हटवाच

महापरीक्षा पोर्टलमधील ‘व्हायरस’ हटवाच

महापरीक्षा पोर्टलवर महाभरती राबवण्याचा सरकारी कार्यक्रम पूर्णपणे सदोष असल्याने त्यात सुधारणा करण्याची नितांत गरज आहे. या कार्यप्रणालीत कोणतीही पारदर्शकता नसून, याउलट ती विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि मानसिक शोषण करत आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याऐवजी त्यांचेच शोषण करण्यात येत आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद व्हावे, यासाठी राज्यात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली आहेत.

राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षेच्या चिंधड्या उडण्यास अनेक घटक कारणीभूत होते. त्यातील एक महत्त्वाचा घटक होता तो बेरोजगार तरुणांत, विद्यार्थ्यांत असलेला सरकारबद्दलचा राग. त्यांच्यातील असंतोषाचे एक कारण होते - महापरीक्षा पोर्टल आणि त्यातला महाघोटाळा. या पोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांचे अक्षशः मानसिक आणि आर्थिक शोषण होत होते. सन २०१७ मध्ये राज्य सरकारने राज्यातील वर्ग ३ आणि वर्ग ४ कर्मचाऱ्यांची महाभरती करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार ही महाभरती पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने व्हावी, यासाठी राज्य सरकारच्या वतीने महापरीक्षा या वेबपोर्टलची निर्मिती करण्यात आली. या पोर्टलची निर्मिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाच्या धर्तीवर आधारित असेल, असे त्या वेळी सांगितले गेले; परंतु महापरीक्षा पोर्टलच्या सुमार कार्यप्रणालीचा फटका बेरोजगार तरुणांना बसला. राज्यातील उद्धव सरकारने याची आता तातडीने दखल घेऊन बेरोजगार तरुणांचे हे महापोर्टली शोषण थांबवावे. तातडीने त्यातील सावळागोंधळ थांबवावा. तरुणांचा विरोध अशा ऑनलाईन कार्यप्रणालीला नसून, त्यातून होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक शोषणाला आहे, हे लक्षात घ्यावे. 

महापरीक्षा पोर्टलचा उद्देश
राज्य सरकारच्या वतीने महापरीक्षा संकेतस्थळ सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे पारदर्शक पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करावी. ही कार्यप्रणाली पूर्णत: संगणकीय आणि स्वयंचलित असावी. या कार्यप्रणालीत शून्य उणिवा असतील. हे संकेतस्थळ वापरकर्त्यांना उत्तरदायी असेल.

विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी
महापरीक्षा पोर्टलच्या निर्मितीचा एकही उद्देश पूर्ण झालेला नाही. या कार्यप्रणालीचा कारभार भयंकर त्रुटीपूर्ण आहे. या संकेतस्थळावर विविध वर्ग ३ आणि वर्ग ४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होते. काही दिवसांपूर्वी राज्यातील तलाठी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली; परंतु राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी उमेदवारांना वेगवेगळे फॉर्म भरावे लागत होते. एखाद्या उमेदवाराला राज्यातील सर्व म्हणजेच ३७ जिल्ह्यांच्या तलाठी पदासाठी अर्ज भरायचा, तर त्याला ३७ वेगवेगळे अर्ज तेही एकाच पदाचे भरावे लागणार होते. एका अर्जाचे परीक्षा शुल्क वर्गवारीनुसार साधारण ३५० ते ५०० रुपये इतके. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला सर्व जिल्ह्यांसाठी अर्ज भरावयाचे असल्यास त्याला १२ ते १५ हजार रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.

खरे म्हणजे अर्ज भरण्यातही विद्यार्थ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. रजिस्ट्रेशन न होणे, ॲक्‍टिवेशन लिंकचा ईमेल न येणे, फोटो, सही अपलोड न होणे, प्रोफाईल सेव्ह न होणे, सर्व्हर डाऊन असणे इत्यादी अनेक अडचणी अर्ज भरताना येत असतात. अर्ज भरल्यानंतर संगणकीय परीक्षा होते. ही परीक्षा अनेक दिवस चालते. तलाठी भरतीची परीक्षा तब्बल २४ दिवस चालली होती. त्यांची परीक्षा केंद्रे सुमार दर्जाची असतात. परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार आतापर्यंत घडत आला आहे. अनेक परीक्षा केंद्रामध्ये ठराविक विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट जागा उपलब्ध करून देणे, मर्जीप्रमाणे कुठेही बसवणे यांसारखे गैरप्रकार सर्रास चालतात. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा या दिलेल्या अभ्यासक्रमाशी सुसंगत नसतात. वेगवेगळ्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या काठिण्य पातळीत कमी-अधिकपणा असल्याचा अनुभव येतो. पोर्टलद्वारे आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांचे निकाल हे सदोष आहेत. परीक्षेत जे प्रश्न चुकले आहेत, त्यांसाठी सरळ गुण देण्यात येतात. ज्या विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाला वेळ दिला, त्याच्यावरचा हा अन्याय ठरतो. महापरीक्षा पोर्टलची उत्तरतालिकासुद्धा सदोष असते. १/२ निगेटीव्ह मार्किंग असतानाही १२० पैकी ११८.५० वगैरे निकाल देण्याचा सदोष कारभार यंत्रणेकडून करण्यात येतो.

पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा सुनियोजित आराखडा नसतो. शिवाय जे परीक्षार्थी परीक्षेदरम्यान, डमी उमेदवार बसवतात, सामूहिक कॉपी करतात, मोबाईलचा वापर करतात त्यांच्यावर आजपर्यंत या यंत्रणेने कोणतीही कारवाई केलेली नाही. निकाल लागल्यानंतर ज्या उमेदवारांनी परीक्षाच दिलेली नाही, अशा उमेदवारांचे नाव अंतिम यादीत असणे, एकाच उमेदवाराचे नाव दोन वेळा एकाच यादीत येणे, असे गंभीर प्रकार या यंत्रणेत घडताना दिसत आहेत.

अडचणी सोडवणाऱ्या यंत्रणेचा अभाव
महापरीक्षा पोर्टलवर लाखो विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करत असतात. मुळात हे पोर्टल सदोष असल्याने अर्ज भरताना आणि इतर अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना अडचणी येतात. 
अशा वेळी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याची कोणतही 

सुयोग्य यंत्रणा महापरीक्षा प्रणालीकडे नाही. संकेतस्थळावर असलेल्या क्रमांकाशी संपर्क केल्यास, त्यांच्याकडून मिळणारी माहिती त्यापेक्षा जास्त सदोष असल्याचा अनेक विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. त्या क्रमांकावर बोलणाऱ्या मंडळींना तरी परीक्षेबद्दल नीट माहिती असते की नाही, अशी शंका या वेळी येत असते.

हवी एमपीएससीप्रमाणे यंत्रणा
महापरीक्षा पोर्टलच्या कार्यप्रणालीचा दर्जा सुमार आहे. ते सुरू करण्यामागचा उद्देश चांगला आहे; परंतु त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर काही उपयोग नाही. या परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणारे असतात. आयोगाच्या परीक्षांचे नियोजन काटेकोर असते. वेळापत्रक तंतोतंत पाळले जाते. उत्तरतालिका वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातात. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी योग्य यंत्रणा कार्यान्वित आहे. याच धर्तीवर महापरीक्षा पोर्टलचे कामकाज चालणे अपेक्षित आहे.

आयोगाची अनेक पदांसाठी एक सामाईक परीक्षा असते. त्यामुळे प्रत्येक पदांसाठी वेगळे अर्ज आणि शुल्क विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नसते. त्यानुसार महापोर्टलची सुधारणा करणे अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर ती प्रोफाईल कायमस्वरूपी असावी, म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांच्या अर्जांसाठी ती प्रोफाईल वापरता येईल. परिणामी विद्यार्थ्याचा वेळ आणि त्रास वाचेल. 

बॅंकिंग, एसएससी, रेल्वे इत्यादी स्पर्धापरीक्षा संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून घेतल्या जातात. वेळेचे आणि नियोजनाचे काटेकोर पालन केले जाते. आयबीपीएससारखी संस्था त्याचे आदर्श उदाहरण आहे. ही संस्था बॅंकेच्या परीक्षांचे काटेकोर आणि शिस्तबद्ध आयोजन करते. त्यात पारदर्शकता असते. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्याचे क्वचितच उदाहरण सापडेल. त्यामुळे अशा संस्थांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून महापरीक्षा पोर्टलच्या कार्यप्रणालीत सुधार करण्याची गरज आहे.
या सर्व बाबींचा विचार केला, तर या पोर्टलच्या माध्यमातून आजपर्यंत घेण्यात आलेल्या परीक्षा आणि निकाल रद्द करण्यात यावेत. या प्रणालीत कोणताही पारदर्शकता नाही. त्याला भ्रष्टाचाराचीही लागण झाल्याची शक्‍यता आहे. ऑनलाईन परीक्षा असाव्यात; परंतु त्यामध्ये योग्य नियोजन आणि सुसूत्रता हवी. ती प्रणाली पारदर्शक, जबाबदार आणि उत्तरदायी असावी, एवढीच राज्यातील बेरोजगार युवकांची, विद्यार्थ्यांची माफक अपेक्षा आहे.

-----

 tushar.sonawane@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com