संस्कृती ही धाक दाखवणाऱ्यांच्या आक्रमकतेवर तरलेली नाही

Osmanabad News
Osmanabad News

नमस्कार.
त्र्याण्णवव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सूत्र फादर फ्रान्सिस दिब्रिटोंच्या हाती सोपवण्याआधी, ब्याण्णवव्या संमेलनाची अध्यक्ष या नात्यानं मी इथे उपस्थित आहे.

संमेलनाच्या घटनेत महत्त्वपूर्ण बदल होऊन गेल्या वर्षी निवडणुकीशिवाय एकमतानं मला अध्यक्षपद दिलं गेलं, तेव्हा सगळ्या मराठी रसिक-वाचक-अभ्यासकांना झालेला मनापासूनचा आनंद वर्षभर, अगदी आजपर्यंत एखाद्या उत्सवी सणासारखा माझ्या वाट्याला आला आणि झालेला बदल किती स्वागतार्ह होता, याची जाणीव पुन:पुन्हा झाली.

अध्यक्षपदाच्या गेल्या वर्षभरातच नव्हे, त्याआधीही पुष्कळ वर्ष मी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या निमित्तांनी फिरले आहे. व्याख्यानांसाठी, माणसांच्या भेटींसाठी आणि वडलांच्या-माझ्या संशोधनासाठीही. अगदी चंद्रपूर-मूल-मार्कडपासून कणकवली -सावंतवाडीपर्यंत आणि नाशिक-सटाण्यापासून नगर-अकोले-नांदेडपर्यंत हैदराबाद, बडोदे, बेळगाव, गोवा इथल्या मराठी वाचक-रसिकांनाही मी पूर्वी अनेकदा भेटले आहे.

या वर्षात एक नवं निमित्त माझ्या फिरण्याला जोडलं गेलं. माझी माणसांना भेटण्याची-संवाद-संपर्काची तहान कायम ठेवणारं निमित्त. लोकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रेम आणि भरभरून आनंद मी अनुभवला. शिवाय मी एक-दोन नवे संकल्पही केले. या अध्यक्षीय वर्षात आठवी ते बारावीच्या मराठीच्या शिक्षकांशी मराठीच्या अध्यापनाविषयी बोलायचं ठरवलं. अगदी लातूरपासून सुरुवात केली. उदगीर, नागपूर, रत्नागिरी, सातारा, पंढरपूर - डॉ. नीलिमा गुंडींना साथीला घेऊन मी शिक्षकसंवाद केला आणि करते आहे. वाचन, अध्यापन, भाषा, व्याकरण, कोशसाहाय्य अशा मुद्द्यांच्या अनुषंगानं बोलणं आणि मुख्यत: कवितेच्या अध्यापनाच्या दृष्टिकोनाची चर्चा करणं हे उद्दिष्ट ठेवलं, पाठ्यक्रम आपण शिकवत नाही, तर त्याच्या आधारे भाषेकडे आणि साहित्याकडे मुलांना घेऊन जातो. त्यांच्या आकलनाचे मार्ग सुचवतो, दाखवतो. याची जाणीव शिक्षकांमधून जागी करण्यासाठी या वर्षी सुरू केलेला उपक्रम आता पुढेही शक्‍य तितका चालू ठेवायचं ठरवलं आहे.

याचबरोबर आणखी एक संकल्प केला आहे. मराठीच्या प्रदीर्घ काव्यपरंपरेचा परिचय विद्यार्थ्यांबरोबरच रसिकांनाही करून देणाऱ्या दृक्श्राव्य कार्यक्रमांची आखणी या वर्षात मी केली आहे. त्यांचं ध्वनिमुद्रण अजून बाकी आहे. पण तेही कार्यक्रम लवकरच पुरे करण्याचा प्रयत्न आहे. माझ्यासाठी हे वर्ष खूप धावपळीत, धामधुमीत गेलं. आता ती उसळती लाट शांत होते आहे. संमेलनात गेल्या वर्षी जे ठराव केले, त्यातल्या दोन ठरावांचा पाठपुरावा मी धडपडून केला. एक ग्रंथालयसेवकांची वेतनवाढ आणि दुसरं बृहन्महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यसंस्थांसाठी कायमस्वरूपी आर्थिक पाठबळ. शासनाकडे या दोन्ही गोष्टींसाठी मी पत्रव्यवहार केला, बोलणीही केली. ग्रंथालयसेवकांचा मुद्दा अद्याप विचाराधीनच राहिला आहे.

बृहन्महाराष्ट्रातल्या संस्थांना त्यांच्या कामाची व्याप्ती आणि संस्थेचं स्वरूप लक्षात घेऊन शासनानं कायमस्वरूपी अनुदान मंजूर करावं असा आणखी एक आग्रह मी धरला; कारण अन्य राज्यांमधून या संस्थांना शासनाची मदत नाही. मराठी माणसांची संख्या मर्यादित, त्यातही साहित्य-कला-संस्कृतीसाठी वेळ आणि पैसा खर्च करणाऱ्या माणसांची संख्याही मर्यादित अशा परिस्थितीत या संस्थांना महाराष्ट्र शासनानं पाठबळ देणं गरजेचं आहे. या माझ्या आग्रही सूचनेचा मात्र तत्कालीन सांस्कृतिक मंत्र्यांनी अनुकूल विचार केला आणि कार्यवाही सुरू केल्याचं पत्रही पाठवलं. नव्या शासनव्यवस्थेत तो निर्णय अंमलात येईल अशी आशा आहे. हे संमेलन महानगरांपेक्षा कितीतरी लहान असलेल्या, प्रत्यक्षात दुष्काळी पण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या उस्मानाबादसारख्या परिसरात होत आहे हीही एक आनंदाची गोष्ट आहे. आता खरं तर साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रात नव्या मंडळींनी केवढं तरी आश्‍वासक लेखन समोर आणलं आहे. लहानलहान गावांमधली माणसं कसदार लिहू पाहत आहेत, नवी नियतकालिकं काढण्याची धडपड करताहेत; कधी नव्हे इतकं जगण्यात घुसून अभिव्यक्त होताहेत. त्या सगळ्यातून भ्रष्टतेला दूर सारणाऱ्या निकोप वाड्मयीन चळवळी उभ्या राहणं मात्र गरजेचं आहे. त्यासाठी सुजाणांचं पाठबळ मिळणं गरजेचं आहे. साहित्य महामंडळाला एखादं युवा संमेलन या नव्या लिहित्या मंडळींसाठी कदाचित सुरूही करता येईल.

गेल्या वर्षाप्रमाणे याही वर्षी फादर दिब्रिटोंची निवड महामंडळानं एकमतानं केली आहे. मात्र परभाषक साहित्यकाराला आमंत्रित न करण्याच्या महामंडळाच्या निर्णयानं भारतीय भाषा मंडळाशी स्नेहसंवाद करत राहण्याची एक वाट बंद झाली आहे अशी माझी भावना आहे. महानोरांसारखे उतम कवी इथे उद्घाटनाला आल्याचा आनंद मोठा असला तरी आपण भारतीय भाषांशी स्नेह जोडण्याची एक सुंदर परंपरा खंडित केली आहे. महाश्‍वेतादेवींपासून गिरीश कार्नाडांपर्यंतच्या कितीतरी परभाषक साहित्यिकांची या व्यासपीठावरची एक मांदियाळीच डोळ्यांसमोर येते आहे.

पण मी फादर दिब्रिटोंचं मनापासून अभिनंदन करते. माझा त्यांचा पंधरा-वीस वर्षांचा व्यक्तिगत स्नेह त्यामागे आहे. फादर स्टीफन्सच्या ख्रिस्तपुराणाचं प्रकाशन करण्याच्या निमित्तानं त्या समारंभासाठी मी प्रथम वसईला त्यांच्याकडे गेले. त्यानंतरही सुवार्ता मेळाव्यांसाठी गेले आहे. सृजनाचा मळा' या त्यांच्या ललितलेखांच्या संग्रहाचं प्रकाशन मी केलं आहे आणि त्यांच ललित लेखन सातत्यानं वाचत आले आहे.

मला त्यांच्या निमित्ताने काही अभ्यासक लेखकांची विशेष आठवण करून द्यायची आहे. देश, धर्म वेगळा असला आणि पुष्कळदा मातृभाषा वेगळी असली, तरी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीवर प्रेम करणारे अनेक लोक मध्ययुगापासून मराठी मातीवर नांदले आहेत. मराठीच होऊन गेले आहेत. त्यांची एक मांदियाळीच डोळ्यांसमोर येते आहे. शेख महंमदांसारख्या संतकवींच्या भाषेत सांगायचं तर 'बाभळीच्या झाडा, आंबे आले पाडा' असा चमत्कार घडवणारे कितीतरी कवी, साहित्यकार, अभ्यासक आहेत. 'योगसंग्राम'सारखा आत्मस्वरूपाचं विवरण करणारा ग्रंथ शेख महंमदांनी रचला. शहा मुंतोजी ब्रह्मणींसारख्या पांडुरंगाच्या स्वप्नादेशाने सहजानंद स्वामींचा गुरुपदेश घेणाऱ्या कवीने अद्वैत वेदान्तावर उत्तम ग्रंथरचना केली. सोळाव्या शतकातल्या हुसेन अंबरखानाने 'अंबर हुसेनी या शीर्षकाने समश्लोकी गीताटीका लिहिली. शहामुनींचा सिद्धान्तबोध तर पूर्वी चातुर्मास्यात अनेक ठिकाणी वाचला जात होता. आणखीही पुष्कळ नावं या मालिकेत सांगता येतील. 

या मध्ययुगीन संतकवींपासून थेट समकालीन गेल ऑमवेट, फादर दलरी, इरिना ग्लुश्कोवा, मॅक्सिन वर्गसन, अन फेल्डहाउस आणि गुंथर सोन्थायमरांसह अनेक अभ्यासकांनी मराठी भाषा तर आपलीशी केलीच; पण मराठी संस्कृती आणि साहित्याच्या अभ्यासातही मन:पूर्वक भर घातली. त्यांच्या अभ्यासदृष्टीविषयी, अभ्यासाविषयी मतमतांतरं नव्हती किंवा नाहीत असं नाही; पण निरोगी वाड्‌मयव्यवहारासाठी ते तर अत्यावश्यकच आहे. शेवटी सच्चा ज्ञानव्यबहार हा सगळ्या भेदांच्या पलीकडे जाणारा असतो - असायला हवा.

आमच्या घरी नियमित येणाऱ्या गुंथर सोन्थायमरांच्या मराठीपणाची आठवण थोडी अधिक उलगडून मी माझं भाषण संपवणार आहे. सोन्थायमर जर्मन अभ्यासक. हायडेलबर्ग विद्यापीठात ते तौलनिक धर्मशास्त्राचे विभागप्रमुख होते. अण्णांवर त्यांची ज्ञानर्षी म्हणून श्रद्धा होती. घरी यायचे तेव्हा दाराबाहेर बूट काढताना म्हणायचे, 'देवळात जाताना जोडे काढतात ना बाहेर?' परत कधी येणार, असं निरोपाच्या वेळी विचारलं की उत्तर असायचं, 'आता माघी पौर्णिमेला. आणि आपण माघी पौर्णिमा कधी येते याचा विचार करत राहणार. ते धनगरांविषयीचा अभ्यास करत होते. गोपालक समाजाचा अभ्यास. त्यांची दैवतं, त्यांच्या प्रथा- परंपरा, त्यांची स्थलांतरं, त्यांच मौखिक साहित्य... आपल्याला ठाऊक नसलेल्या त्या समाजासंबंधीच्या कितीतरी गोष्टी. त्यांच्या जगण्याच्या, त्यांच्या संस्कृतीच्या - त्यांना ठाऊक होत्या. जेजुरी हे त्यांचं दुसरं घर होतं. तिथले स्थानिक त्यांना नाना म्हणायचे. गमतीनं जेजुरीचे सरपंच म्हणून हाक मारायचे. त्यांनी पंचवीस-तीस वर्षांपूर्वी हायडेलबर्गला महाराष्ट्र संस्कृती परिषदही घेतली होती. काम करता करता एक दिवस ते त्यांच्या विभागातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मरण पावले; पण त्यांचं दफन झालं नाही. त्यांच्या मृत्युपत्रातल्या इच्छेनुसार त्यांच्या दहनानंतर त्यांच्या अस्थी इकडे आणून इथे कऱ्हेच्या पाण्यात विसर्जित केल्या गेल्या. त्यांनी पुस्तकांमधून मांडलेले अभ्यास आणि त्यांनी पंढरपूरच्या वारीवर केलेली उत्तम डॉक्युमेंटरी आपल्यासमोर आहेच.

या अशा आपल्याच होऊन गेलेल्या माणसांना आपण अमराठी-अभारतीय म्हणून आजवर कधी बाजूला ठेवलेलं नाही. सच्चा आणि वृत्तिगांभीर्यान काम करणारा कोणीही साहित्यकार किंवा कलावंत हा जात, धर्म, देश, वंश यांच्या पलीकडेच जाणारा असतो, हे आपण विसरलो नाही, विसरून चालणारही नाही. कारण संवादशक्ती आणि आत्मशक्ती गमावलेला एक भयभीत समाज ही आपली ओळख नाही. आपण सगळेच हे जाणतो की कोणतीही संस्कृती ही आरोळ्या देणाऱ्यांच्या, धाक दाखवणाऱ्यांच्या आणि बळजोरी करणाऱ्यांच्या आक्रमकतेवर तरलेली नाही. ती साध्या, सामान्य माणसांच्या सत्शील कृत्यांवर आणि ज्ञानवंतांच्या सशक्त विचारांवर तरलेली आहे. साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रात हाच अनुभव पुन:पुन्हा येईल अशा विश्‍वासानं आपण लिहीत मात्र राहिलं पाहिजे.

अत्यंत भ्रष्ट काळाचे प्रतिनिधी म्हणून उद्याच्या जगानं आपल्याला ओळखू नये असं जर वाटत असेल तर मग आपला आंतरिक आवाज लावून धरणारे आणि नव्या पिढीवर विश्‍वास टाकणारे विवेकी लेखक आणि वाचक म्हणून आपली ओळख निर्माण करण्याच्या, घट्ट करण्याच्या आणि टिकवण्याच्या प्रयत्नांत राहू या.

थांबते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com