शिवशंकरभाऊ पाटील...द्रष्टा कर्मयोगी!

shivshankarbhau patil
shivshankarbhau patil

एखाद्या बीजातून प्रचंड वटवृक्ष उमलावा आणि त्याच्या अनेक पारंब्या विकसित व्हाव्यात, त्याप्रमाणे शेगाव संस्थानचे कार्य हे आध्यात्मासोबतच लोकशिक्षण, आरोग्यसेवा, पुनर्वसन, शैक्षणिक, संतसेवा आणि त्याहूनही मोठी भक्तसेवा अशा विविध पातळ्यांवर विस्तारले आहे. हे कार्य खऱ्या अर्थाने मार्गी लागले ते शिवशंकरभाऊंची दूरदृष्टी, त्याला कर्माची जोड आणि सचोटीने कार्य सिद्धीस नेण्याची हातोटी...सेवाव्रती, कर्मयोगी, माणसातील देवमाणूस असे एक ना अनेक शब्द थिटे पडावे असे हे व्यक्तिमत्त्व होय... आज वयोमान वाढलेले असतानाही तेवढ्याच तन्मयतेने ते ‘श्रीं’च्या सेवा कार्यात मग्न आहेत... कुठेही कामाचे अवडंबर नाही, कोणत्या फळाची अपेक्षा नाही... बुद्धिमत्ता, सचोटी आणि सेवानिष्ठेचे हे अजब रसायन आहे... शेगावच्या गजानन महाराज संस्थानची कीर्ती आज जगभरात पसरली आहे. त्यात क्षितिजापार दृष्टी, विचारांची अथांग खोली, स्वकर्तृत्त्वाची हिमालयाएवढी उंची असलेल्या भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचा वाटा महत्त्वाचा आहे... गजानन महाराज मंदिरात फरशी बसविण्याच्या कामापासून सुरू झालेली त्यांची सेवा आजही तेवढ्याच तन्मयतेने आणि निष्ठेने सुरू आहे... शेगावात पाय ठेवल्यापासून श्रींच्या भाविकाला कुठलाच त्रास होऊ नये याची विशेष काळजी त्यांच्या नियोजनामुळे सिद्धीस जाऊ शकली. शेगाव संस्थांनच्या 42 सेवा प्रकल्पांच्या कार्यांमुळे अनेकांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण झाला आहे... गजानन महाराज संस्थानसारखे भाविकांची काळजी घेणारे, त्यांच्या सोयीसुविधांबाबत गांभीर्याने विचार करणारे आणि विशेष म्हणजे भाविकाची कुठेही आर्थिक लूट होऊ नये म्हणून काळजी घेणारे हे एकमेव संस्थान होय... आज महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही कुठे असे संस्थान सापडणार नाही.

बुद्धिमत्ता, कर्मनिष्ठा, सेवानिष्ठा आणि गजानन महाराज यांच्या उपदेशांप्रती त्यांची असलेली बांधिलकी यामुळे आकाशाएवढ्या उंचीचे कार्य भाऊंनी उभे केले आहे. हे सर्व कार्य बघितले की, त्यांच्यातील द्रष्टेपण प्रामुख्याने समोर येते. द्रष्टी माणसं ही काळाच्या पूढे बघणारी असतात. शिवशंकरभाऊंचे व्यक्तिमत्त्वही असेच... औपचारिक व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेले नसतानाही गजानन महाराज संस्थांचा कारभार त्यांनी ज्या दूरदृष्टीने आणि सचोटीने हाताळला तोच आता जगभरात अभ्यासाचा विषय झाला. अनेक मॅनेजमेंट गुरूंही त्यांच्या भव्यदिव्य कार्यापुढे नतमस्तक होतात. जीवनात एकनिष्ठेने हाती घेतलेले कार्य किती व्यापक प्रमाणात पुढे नेते येऊ शकते आणि त्यातून कितीतरी जणांच्या चेहऱ्यावर हसू फुलविता येऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण घालून दिले आहे. तत्वांशी कुठेही तडजोड न करता ‘सर्व भवंतू सुखिनः' हे ब्रीद त्यांनी सेवाकार्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविले आहे. आज शेगाव संस्थानचे उत्पन्न हे देश व राज्यातील अनेक संस्थानांपेक्षा हजारो-लाखो पटींनी कमी असेल पण भाऊंच्या मार्गदर्शनात उभे राहिलेले काम हे अशा संस्थानांपेक्षा हजारो-लाखोपट मोठे आहे. वाढत्या वयानुसार स्वास्थ थोडे त्रास देत असले तरी त्यांचा उत्साह आणि ‘श्रीं’च्या सेवेप्रती असलेली श्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही. भाऊंच्या कार्यावर कितीही सविस्तर लिहिले तरी ते कमीच आहे... समस्त तरुणाईसाठी प्रेरणास्थान असलेले शिवशंकरभाऊ पाटील यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा !

कर्मयोग्यापुढे अनेक पुरस्कारही थिटे 
कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या अतुलनीय कार्यापुढे खरे तर अनेक पुरस्कारही थिटे आहेत... त्यांनी प्रसिद्धीचा सोस कधी बाळगला नाही... पुरस्कारा चालून येत असतानाही त्यांनी ते नाकारले आहेत... मात्र, आमच्यासारख्या भाविकांना वारंवार वाटते की, या व्यक्तिमत्त्वाला साजेसा नागरी सन्मान देण्यात सरकारांची मनोवृत्ती कोती ठरते का? आता नव्या सरकारने तरी पद्म पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करायलाच हवी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com