... अन् नामांतरासाठी ९० किलोमिटरचा रात्रीचा सायकल मार्च

मिलिंद सर्पे, किनवट
मंगळवार, 14 जानेवारी 2020

मराठवाडा विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव द्यावे, अशी चळवळ "दलित पॅंथर' या संघटनेकडून मराठवाड्यात सुरु झालेली होती. तो काळ होता १९७७ चा. मी तेव्हा होतो सातवीत. प्रा.धन्वे सरांनी मला शिशु दलित पॅंथरचा अध्यक्ष केले होते. २७ जुलै १९७८ ला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव एकमताने मंजूर झाला खरा, परंतु त्यानंतर २७ जुलैच्या रात्रीपासून मराठवाड्यातील दलित समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरु झाले.

Image result for babasaheb ambedkar marathwada university history namvistar din

मराठवाड्यातील दलित वस्त्या १५ दिवस जळत होत्या. मराठवाडा ठप्प झाला होता. नामांतराची अंमलबजावणी झाली नाही. पुढे चालून १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर न होता नामविस्तार झाला, "डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद."

नामांतर चळवळीचा मोठा इतिहास आहे. या चळवळीत माझा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दादाराव कयापाक, सुरेश गायकवाड, मनोहर भगत, सुखदेव मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सहभाग होता. तो खारीचा वाटा असला तरी फारच स्फूर्तिदायक होता, असे मला आजही वाटते.

नामांतराचा लढा सुरू झाला तेंव्हा मी सातवीत होतो. वय होते १२ वर्षे. नामांतर झाले १९९४. तेंव्हा मी याच मराठवाडा विद्यापीठातून तीन पदव्या घेऊन बाहेर पडलो होतो. नामांतर लढ्यात सहभागी असलेला मी एक भीमसैनिक असल्याने या चळवळीच्या अनेक आठवणी माझ्या स्मृतीत आजही ताज्यातवान्या आहेत.

Image result for babasaheb ambedkar marathwada university history namvistar din

आज १४ जानेवारी. नामविस्तार दिनानिमित्त नामांतर चळवळीतील एक अनुभव मी आपणास सांगणार आहे. तो असा...

ते नामांतर चळवळीतील भारावलेले दिवस होते. नामांतराच्या संदर्भाने गोकुळ गोंडेगाव येथे "दलित पॅंथर"च्या वतीने जाहीर सभेचे रात्री आयोजन करण्यात आले होते. बहुदा १९७७ चेच साल असावे. दलित पॅंथरचे कार्यकर्ते किनवटहून शेवटच्या सायंकाळच्या बसने रवाना झाले. यात प्रा. पी. एस. धन्वे, दादाराव कयापाक, सुरेश गायकवाड, सुखदेव मुनेश्वर, नितिन कावळे इत्यादींचा समावेश होता.

मी सहावीत असल्याने माझ्याकडे गोकुळ गोंडेगावला एस.टी.ने जाण्यासाठी पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु, सभेला जायची माझी तीव्र इच्छा होती. म्हणतात ना, की 'ईच्छा तेथे मार्ग'. मी गोकुळ गोंडेगावला सायकलने जाण्याची तयारी केली. यासाठी मी माझे बालमित्र प्रकाश पाटील व दिलिप कावळे यांना तयार केले व आम्ही तिघे बालमित्र किरायाच्या दोन सायकली घेऊन निघालो. 

रात्री आठ वाजता सांगण्यासारखे म्हणजे ती रात्र होती अमावस्येची. काळाकुट अंधार व कच्चे रस्ते. रस्त्याने किनवट ते गोकुळ हे अंतर आहे अंदाजे ४५ किलोमिटर. कच्चा व जंगलव्याप्त रस्ता. ही रात्र पार करुन आम्ही पोहोचलो रात्री दोन वाजता गोकुळ गोंडेगावला. 

मला त्या काळात बऱ्यापैकी भाषण करता येत असल्याने तेथे माझे भाषण झाले. यानंतर आम्ही जेवण करुन परतीच्या प्रवासाला निघालो. पहाटे चार वाजता व पडत उठत किनवटला पोहचलो. दुपारी ११ च्या  सुमारास ‌घरातली ज्वारी चोरुन विकली आणि सायकलचा किराया दिला.

ही घटना जरी छोटी वाटत असली तरी चळवळीच्या दृष्टीने फार मोठी आहे, असे मला वाटते. म्हणूनच आजच्या नामांतर दिनानिमित्ताने बालवयातील ९० किलोमिटरच्या, विशेष म्हणजे रात्रीच्या सायकल मार्चची ही घटना प्रकर्षाने आठवते. 

इतर ब्लॉग्स