प्रेक्षकांमधील 'भागलो'ला जिवंत करणारा 'हेल्लारो'... पण 'भागलो' कोण वाचा -

नम्रता फलके
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

आपल्या देशात स्त्री मुक्ती आंदोलन मोजक्या पुरुषांमुळे होऊ शकलं हे वास्तव आहे. काही मोजके पुरुष असतात जे स्वतः पुढाकार घेऊन सुधारणा घडवून आणतात. (उदा. फुले, आंबेडकर, आगरकर इ.) मात्र अनेक पुरुषांत हे धाडस नसतं. मग ते या सुधारणेला छुप्या पद्धतीनं मदत करतात.
 

सुरवातीला काही सत्य जे वारंवार सांगितलं गेलं पाहिजे -

क्रमांक एक - जेव्हा संसाधनं अपुरी असतात, अर्थात तुमच्याकडे मूलभूत गोष्टींची कमतरता असते किंवा चैनीची संसाधनं तोकडी असतात; तेव्हा कमजोर गटाचा त्यावरून हिस्सा कमी केला जातो, जेणेकरून ताकदवान गटाला त्याचा पूर्ण लाभ उचलता आला पाहिजे. आपल्याकडे कमजोर मादीसाठी हे काम ताकदवान नर करत असतो.

क्रमांक दोन - कमजोर मादीने आपला हिस्सा किंवा स्वातंत्र्य मागू नये म्हणून नर तिच्यावर देव, धर्म, प्रथा संस्कृती, समाज या नावाखाली अनेक बंधनं लादतो आणि पाप पुण्याच्या पेचात तिला कायमची गुंतवून ठेवतो.

क्रमांक तीन - शिक्षणामुळे कमजोर मादी विचारशील होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ताकदवान नराने त्याच्या घरात शिकलेली बायको आणू नये.

क्रमांक चार - शिक्षणाच्या प्रभावाखाली किंवा माणसात उपजतच असलेल्या स्वातंत्र्याच्या इच्छेमुळे जर मादीने नराला तिचा हिस्सा मागितलाच, तर तिला ठेचून काढावं किंवा जाळावं.

आणि

क्रमांक पाच - समाजामध्ये काही चांगले नर असतात, जे मादीला या बंधनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतात. हेल्लारो हा चित्रपट अशाच दोन पुरुषांचा आहे.

जब मा पढणे को बैठती हैं
सारी दुनिया साजिश करती हैं....
हे आपल्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचं वास्तव. कच्छच्या वाळवंटात एक छोटंसं गाव. पुरुषी स्वार्थानं बरबटलेलं... जिथं नृत्यासारख्या (गरबा) मूलभूत अभिव्यक्तीला सुद्धा स्त्रियांना पारखं व्हावं लागतं. नवरा मेला म्हणून जिथं विधवेला घरातून बाहेर पडण्याची मुभा नसते. आपल्या गावाबाहेरचं जग ज्या बायकांना ऐकून सुद्धा माहीत नसतं. (कारण रेडिओ ही सुविधा फक्त पुरुषांसाठी राखून ठेवली आहे)

Image may contain: 1 person, smiling, sitting, child, beach and outdoor

त्या गावात मंझरी नावाची एक सातवी शिकलेली मुलगी येते, जी या ना त्या कारणानं या स्त्रियांच्या मनात आत खोलवर कुठंतरी धगधगत असलेल्या स्वातंत्र्याच्या ठिणगीला पेटवण्याचं काम करते आणि या कामी तिला प्रत्यक्ष मदत लाभते ती मुजली या ढोल वादकाची आणि अप्रत्यक्षपणे भागलोची.

1975 चा भारत. emergency अर्थात काटाकाटी लागलेली. पण या गावात ती पोचणं शक्य नाही, कारण सरकारी योजना सुद्धा येथे कधी पोचल्या नाहीत. तीन वर्षांपासून गावात पाऊस नाही. देवीचा प्रकोप. मल्टिप्लेक्समध्ये बसून हेल्लारो पाहणाऱ्यांनी कदाचित कधीही टिपिकल पुरुषी समाज पाहिला नसेल, तो या चित्रपटानं दाखवला आहे.

Image may contain: 2 people

म्हणजे विधवेला घराबाहेर पडण्याची मुभा नाही, पण तिच्या म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांना पाणी कोण आणून देणार, म्हणून मग तिच्यावरचं एक बंधन कमी करायचं. गावातली एक बाई पळून गेली, म्हणून देवी कोपली असा भ्रम पसरवायचा. देवी खुश व्हावी म्हणून पुरुषांनी ढोलकीच्या तालावर रात्री ताल धरायचा आणि स्त्रियांनी उपवास करायचे.

मुलींनी जास्त शिकलं, तर त्यांना पंख किंवा शिंगं फुटतात, म्हणून बायकांनी वेळेच्या आत आपले पंख छाटावे या विचारांचे इथले पुरुष. (याठिकाणी नेमाडेंच्या कवितेची आठवण येते - कशा सुरेख रांगोळ्या काढता, घरंदाज व्यथांनो!)

हे सगळे प्रकार या अशिक्षित बायकांना समजत असतातच, पण त्या विरुद्ध जाण्याची हिम्मत कुणाची नसते. या बायकांसाठी घराबाहेरचं विश्व म्हणजे कोसो दूर असलेलं पिण्याचं पाणी (तलाव). ते आणण्यासाठी दररोज या बायका कळशी घेऊन जातात. तिथंच काय त्या यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी होतात. एरवी गावाबाहेर काय सुरू आहे, हे फक्त त्यांना गावात नवी सून आल्यावरच माहिती होतं. त्यामुळे या बायका नव्या सुनेची( मंझरीची) आतुरतेनं वाट पाहत असतात.

Image may contain: one or more people and outdoor

मंझरी सुद्धा त्यांना नव्या गोष्टी सांगते. एके दिवशी तळ्याच्या वाटेवर त्यांना एक माणूस बेशुद्धावस्थेत आढळतो. मंझरी त्याला पाणी पाजते आणि बदल्यात तो त्यांच्यासाठी ढोल वाजवतो आणि बस... भरला जातो स्वातंत्र्याचा पहिला हुंकार आणि पावलं थिरकायला लागतात अन्यायाविरुद्ध!

आता नृत्य अर्थात डान्स म्हणजे काय?

ब्रिटनिका सांगते, 'Dance is the movement of the body in a rhythmic way, usually to music and within a given space, for the purpose of expressing an idea or emotion, releasing energy, or simply taking delight in the movement itself.'

मला वाटतं, माणसाने शब्द विकसित करण्याआधी संगीत आणि नृत्याचा जन्म झाला असावा. त्यामुळेच की काय, हे आपले अविभाज्य आणि नैसर्गिकरित्या अभिव्यक्त होणारे घटक आहेत. डान्स तुम्हाला थकवतो, आनंद देतो, नैराश्य काढण्यास मदत करतो, ऊर्जा देतो. त्यामुळेच हेल्लारो या चित्रपटांतून दिग्दर्शक अभिषेक शहाने डान्सला एका फिलॉसॉफी म्हणजेच तत्वज्ञानाप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ही इतकी साधी गोष्टसुद्धा जेव्हा या स्त्रियांना नाकारण्यात येते, तेव्हा लपूनछपून गरब्याचा आनंद या स्त्रिया लुटतात. कारण अर्थातच नृत्य ही आपली नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.

Image may contain: 3 people, people dancing

सर्वांना नायिका प्रधान वाटणारा हा चित्रपट असला, तरी मला या चित्रपटात हिरोची भूमिका महत्त्वाची वाटते. या चित्रपटात दोन हिरो आहेत. एक मूलजी आणि एक भागलो. आपल्या देशात स्त्री मुक्ती आंदोलन मोजक्या पुरुषांमुळे होऊ शकलं हे वास्तव आहे. काही मोजके पुरुष असतात जे स्वतः पुढाकार घेऊन सुधारणा घडवून आणतात. (उदा. फुले, आंबेडकर, आगरकर इ.) मात्र अनेक पुरुषांत हे धाडस नसतं. मग ते या सुधारणेला छुप्या पद्धतीनं मदत करतात.

या चित्रपटात मूलजी हा पहिल्या प्रकारात, तर भागलो दुसऱ्या प्रकारात मोडतो. मला वाटतं आपण प्रेक्षकही बऱ्या प्रमाणात भागलोसारखेच असतो. मूलजी हा स्वतः जातीय हिंसेत बायको, पोरगी गमावून बसलेला असतो. त्यामुळे स्त्रियांसाठी आदर आणि प्रेमभावना त्याच्यात असते. तर भागलो हा एकमेव पुरुष असतो जो शहरात होणारी स्थित्यंतरं आणि न बदलणारं गाव यांच्यात सामांजस्य आणण्याचा प्रयत्न करतो.

स्त्रियांवरची बंधनं, बुवाबाजी हे तो पाहत असतो, पण आपला गाव बदलणं शक्य नाही असं कुठंतरी त्याला वाटत असतं. त्यामुळं एका मर्यादेनंतर तो गावकऱ्यांना फार बौद्धिक आणि तार्किक गोष्टी सांगत नाही.

भारत लिंग समानतेच्या आकडेवारीत 118 व्या स्थानी येतो. याचा अर्थ आपण आजही कट्टर पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत जगत आहोत. संसाधनं आणि माहिती आजही बलवान नराच्या हाती आहे. त्यामुळेच स्त्री स्वातंत्र्य आणि अधिकारासाठी पुढं आलेल्या मंझरीसारख्या स्त्रियांना पुरुषांनीच बळ द्यायला हवं. मूलजीजवळ ढोल होता, त्याने तो बडवून या गावातील बायकांच्या धैर्याला बळ दिलं. भागलोने त्यांना सांभाळून घेतलं. या दोघांमुळे या बायका आपल्या मनात असलेल्या स्वातंत्र्याला बळ देऊ शकल्या आणि लढू शकल्या.

Image may contain: 1 person
दिग्दर्शक अभिषेक शहा

स्त्रीमुक्ती हा विषय घेऊन अनेक चित्रपट बनले आहेत, पण अनेकदा अशा चित्रपटांचे आशय गंभीर असल्यानं प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवतो. पण हेल्लारो या चित्रपटानं मनोरंजनाची व्हॅल्यू अचूक धरली आहे. गरबा हा संबंध भारतात लोकप्रिय प्रकार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाशी लवकर कनेक्ट होतो.

आजपर्यंत संजय लीला भन्सालीने दाखवलेल्या भक्ती आणि शृंगारिक गरब्याच्या पुढं जाऊन यातील गीतं स्त्री मनाचा वेध घेतात आणि आपल्याला ताल धरायला लावतात. शिवाय जातीप्रथा, वैवाहिक बलात्कार, विधवा प्रश्न, पाणी टंचाई या समस्यांना सुदधा उत्कटतेनं स्पर्शून जातो. उत्तम सिनेमॅटोग्राफी, सेट, लोकेशन, अभिनय, डान्स, संगीत आणि दिग्दर्शन या सर्व गोष्टी एकत्र येऊन जेव्हा एक गंभीर सामाजिक प्रश्न हाताळतात तेव्हा हेल्लारोची निर्मिती होते.

इतर ब्लॉग्स