जलीकट्टू : 'वळू'ची क्लिष्ट उत्क्रांती

नम्रता फलके
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

सुरुवातीला एका पेशीपासून सुरू झालेला हा चित्रपट शेवटी अक्राळ विक्राळ रूप घेतो. अनेक माणसं जोडली जातात. केरळच्या दाट जंगलातून ही म्हैस पळत राहते आणि सोबत हृदयाचा ठेका चुकवणारं संगीत आपल्याला हादरवत राहतं.

साधारणतः 2 लाख वर्षांपूर्वी ग्रेट एप पासून मानवाची निर्मिती झाली आणि उत्क्रांती होत होत आजचा होमो सेपियन तयार झाला. या सेपियनने वस्त्या केल्या, महानगरं उभारली, संस्कृती विकसित केली. मानवाच्या या विकासाचा इतिहास माणसानेच लिहिला आणि आपण एप पासून सेपियनपर्यंत उत्क्रांत झालो आहोत, असा सदृश भ्रम पसरवला.

हो... 

कारण या उत्क्रांती दरम्यान माणसाचा मेंदू जरी मोठा होत गेला, तरी त्याने एप चा डी एन ए कधीच सोडला नाही. किंबहुना सोडवताच आला नाही. आदिमानवाचा पूर्वज चिम्पांझी अजूनही जिवंत आहे, जो माणसाला त्याच्या प्राणी असण्याच्या सत्यापर्यंत घेऊन जातो. उत्क्रांत झालेल्या मेंदूला अजूनही त्याच्यात असलेल्या प्राण्यांच्या डी एन ए वर बऱ्या प्रमाणात मात करता आली, पण हा डी एन ए एवढा शक्तिशाली आहे, की एखाद्या क्षुल्लक घटनेनेसुद्धा त्याला क्लिक मिळू शकते आणि माणसातील प्राणी जागृत होऊ शकतो. जलीकट्टू हा चित्रपट माणसाच्या पुन्हा प्राणी होत जाण्याच्या प्रक्रियेचा आणि मनोवृत्तीचा वेध घेतो.( Reverse Darwinism).

Image may contain: 1 person, plant, outdoor and nature

जलीकट्टूबद्दल बोलण्याआधी 2008 साली आलेल्या 'वळू' या मराठी सिनेमाबद्दल बोलावंच लागेल. वळू (wild bull) हा रोटरडॅम चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला पहिला मराठी सिनेमा. गावाने पवित्र मानलेल्या एका वळूला कोणीही बंदी बनवत नाही. पण नंतर गावात एकापाठोपाठ वाईट घटना होत जातात आणि गावकरी वळूला त्यासाठी जबाबदार मानतात.

बाहेरून आलेला एक जंगल अधिकारी... वळूला पकडण्यासाठीची गावकऱ्यांची कसरत... गावातील सामाजिक उलाढाली... एक प्रेमकथा... अशा घटकांनी वळूची पटकथा पुढं जाते. जलीकट्टूसुदधा केरळच्या एका गावाची कथा आहे.

म्हशीचं मांस आवडणारं हे गाव. सर्व नीट चाललं असतांना एके दिवशी एक म्हैस कापताना निसटते आणि शेजारच्या जंगलात शिरते. तिला पकडण्यासाठी मग प्रयत्न सुरू होतात. वाटेत येईल त्या सर्व मानवी आणि नैसर्गिक साधन संपत्तीची ती हानी करते.

या कथेतही एक प्रेमकथा आहे. एक पोलिसवाला आहे.. दरम्यान गावातील अनेक सामाजिक पैलू हा चित्रपट उलगडून दाखवतोच. त्यामुळे जलीकट्टू हा चित्रपट वळू पासून मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेला आहे. मात्र हा चित्रपट वळूची कॉपी नक्कीच नाही. कारण वळू हा एक विनोदी धाटणीचा चित्रपट होता तर जलीकट्टू माणसाच्या उत्क्रांतीवर प्रश्न उठवणारा क्लिष्ट चित्रपट आहे.

Jalikattu

लिजो जोस पेलीसरी या मल्याळी दिग्दर्शकाचा हा चित्रपट. तामिळनाडू मध्ये जलीकट्टू नावाचा सण पवित्र मानला जातो. या दिवशी बैलाला लोकांमध्ये निर्बंध सोडलं जातं आणि माणसं आपलं बळ आजमावून जलीकट्टूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. लिजोने हे नाव अतिशय समर्पक पद्धतीने वापरले आहे.

खाटकाची म्हैस पळून जाते आणि तिला शोधण्याच्या प्रक्रियेत अनेक माणसे सहभागी होतात आणि मग म्हशीच्या मांसासाठी गटबाजी होऊन झुंडशाही तयार होते. आणि हे गट म्हशीला पकडून आपलं सामर्थ्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

जलीकट्टूची पटकथा वरपांगी सामान्य वाटत असली तरी ती शेवटी ती अत्यंत गडद होत जाते. माणूस हा शेवटी जनावरच आहे, हा एक सरळ संदेश दिग्दर्शकाला द्यायचा आहे. पण त्यासाठी जी स्टोरी लाईन त्याने पकडलीय, ती खरंच कौतुकास्पद आहे.

चित्रपटाची सुरुवात हिप्नोटिक म्युझिक आणि व्हेरी क्लोज्ड शॉट्सने होते. हे क्लोज्ड शॉट्स माणसाच्या अगदी त्वचेला लागून नंतर अरण्यात अदृश्य होतात आणि तिथं अळ्या, सुरवंट, मासे, फुलपाखरांचे असेच क्लोज्ड शॉट्स दाखवले जातात. जणू काही सुरुवातीलाच दिग्दर्शक माणसाची उत्क्रांती कुणापासून झाली, त्याचं अस्तित्व काय, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

सुरुवातीला एका पेशीपासून सुरू झालेला हा चित्रपट शेवटी अक्राळ विक्राळ रूप घेतो. अनेक माणसं जोडली जातात. केरळच्या दाट जंगलातून ही म्हैस पळत राहते आणि सोबत हृदयाचा ठेका चुकवणारं संगीत आपल्याला हादरवत राहतं.

अरे माणसा माणसा... 

साधारणतः 200 लोकांचा तरी या चित्रपटात सहभाग असेल. त्या सर्वांचा उत्तम वापर दिग्दर्शकाने केला आहे. अर्थात कसब लागले असेलच. एके ठिकाणी म्हैस खड्ड्यात पडल्यानंतर तिला काढण्याचा प्रसंग सविस्तर आणि विदारक साकारला गेला आहे.

दरम्यान माणसामध्ये प्राण्यांचा स्वभाव अजूनही जिवंत आहे, हे दिग्दर्शक सांगत राहतो. प्राण्यांमध्ये दोन नर आपापसांत लढतात. जो जिंकतो तो कळपातील सर्व माद्यांवर अधिराज्य गाजवतो आणि मादीसुद्धा जिंकलेल्या नराचं वर्चस्व मान्य करते. या चित्रपटात सुद्धा अँथनी म्हैस पकडल्याचा दावा करतो आणि लोक ते मान्य करतात, तेव्हा परत जाऊन त्याला नकार देणाऱ्या स्त्रीवर तो जबरदस्ती करतो आणि नंतर ती स्त्री सुद्धा त्याचं वर्चस्व मान्य करते.

आपल्यात आणि प्राण्यांमधे हे साम्य. म्हणजे गेले 2 लाख वर्ष आपण खरंच उत्क्रांत झालो आहोत का, हा प्रश्न इथं पडतो. कारण आपल्या नराची जिंकण्याची आणि वर्चस्वाची भूक अजूनही शमलेली नाही.

Image may contain: 1 person, indoor

चित्रपटाच्या सुरुवातीला माणूस म्हणून सुरू झालेला प्रवास शेवटी प्राणी बनून संपतो. शेवट तर केवळ अप्रतिम आणि हादरवणारा आहे. म्हशीच्या मांसासाठी सुरू झालेला लढा शेवटी म्हशींसोबतच एकमेकांना विकृतपणे मारण्यात होतो. आदिमानवांना शिकार लवकर मिळत नसे. तेव्हा मिळालेल्या तुटपुंज्या शिकारीवर सर्व तुटून पडायचे. एकमेकांना मारून त्यांचा हिस्सा कमी करायचे. त्याच प्रमाणे 2019 मध्ये ही माणसं मांसासाठी माणसांनाच संपवायला लागतात, हे दाखवण्याचा सीन अत्यंत जलद आणि रोमहर्षक आहे. 300 या चित्रपटातील मृत सैनिकांच्या भिंतीपेक्षा जलीकट्टू मधील जिवंत माणसांचा पिरॅमिड  अधिक भयावह  वाटतो.

प्रतीकांचा वापर अप्रतिम

दिग्दर्शकाने प्रतीकांचा वापर अप्रतिम केला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला शेवटची घटका मोजत असलेला एक म्हातारा दाखवला आहे, ज्याला श्वास घेतांना त्रास होतोय. चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये एकीकडे माणसं माणसांना खात असतांना इकडे हा म्हातारा एकटा असतो आणि जेव्हा तो खिडकीतून बाहेर पाहतो तेव्हा त्याला ती म्हैस दिसते, जी त्याच्याकडे सताड पाहत असते. जणू काही ती त्याला सांगू इच्छिते की, "तू या गावाचा पूर्वज आणि मी तुझी पूर्वज... आपण दोघेही सारखेच. तुझा फक्त मेंदू वाढला, पण आतील प्राणी अजूनही बेशाबुत आहे... तो कधीही बाहेर येऊ शकतो आणि मानव प्रजातीचा नाश करू शकतो. प्राणी हे नाव तू मला दिलंय, पण तुझ्या आतल्या प्राण्याचं काय??? तुझ्या उत्क्रांतीला सुसंस्कृत म्हणावं का??"

खरं म्हणजे... 

जलीकट्टू हा प्रत्येकाने प्रत्यक्ष अनुभवण्याचा चित्रपट आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये ही अभिजात कलाकृती बनलेली आहे. त्याचा प्रभाव अनेक ठिकाणी जाणवतो. पण स्क्रीनप्ले आणि  क्लायमॅक्स ती उणीव भरून काढतात. सध्या मॉब लिंचिंग, शूटिंग, स्त्रियांना जाळणं, विकृत पद्धतीनं कत्तली करणं यांसारख्या घटना रोज वाढत आहेत, ज्यामुळे आपल्या माणूसपणावर वारंवार प्रश्नचिन्ह उभे होत आहेत. त्यामुळे उत्क्रांतीच्या या टप्प्यावर सुसंस्कृत होऊन आदिमानवाचा 'जंगली' डी एन ए कसा काढून फेकता येईल, यावर कृतिशील प्रयत्न व्हायला हवेत.

इतर ब्लॉग्स