‘अडल्ट्स इन द रूम’ सही सही एडल्ट गेम

ज्योती धर्माधिकारी
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

सातव्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये देशातील विविध भाषांचे, तसेच जगभरातील एकूण ४० चित्रपट पाहण्याची संधी मराठवाड्यातील चित्रपटरसिकांना मिळाली आहे. त्यात दाखवण्यात आलेल्या या एका अफलातून चित्रपटाविषयी...  

2009च्या ग्रीसमधील आर्थिक महासंकटाचे पडसाद सगळ्या जगभर उमटले. त्याहीपेक्षा संपूर्ण युरोप ढवळून निघाला. एकीकडे माणुसकीच्या नात्याने दिखाव्यापुरती का होईना, पण मदत तर करायला हवी आणि त्याच वेळी इतर राष्ट्रांची ढासळणारी आर्थिक पत सांभाळण्याची अत्यंत अटीतटीची. प्रत्येक राष्ट्राचे हितसंबंध साधण्याची जणू स्पर्धाच लागलेली.

युरोपमधील प्रत्येक देशाने एकीकडून ग्रीसला आणि ग्रीस प्रमाणेच पोर्तुगीज, आयलँड, स्पेन, या देशांनाही मदत करण्यासाठी आपला हात समोर केला. (चित्रपटात या देशांच्या आद्याक्षरांवरून PIGS असे एका देशाचा प्रतिनिधी असे लिहितो आणि खवचट हसतो) दिसायला तर असेच दिसते, की सगळे देश एकजुटीने ग्रीसला मदत करत आहेत.

मात्र त्याच वेळी युरोपियन कौन्सिलची दुटप्पी भूमिका आणि ग्रीस पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांची कोंडी या चित्रपटात चित्रित झालेली आहे. कोस्टा गवरस या महान दिग्दर्शकाचा महान चित्रपट असेच म्हणावे लागेल. कारण चित्रपटाचे  कथानक  संपूर्ण युरोपीय देशांचे  हितसंबंध, शत्रुत्व, राजकीय डावपेच सांगणारे भव्य असे आहे.

ग्रीसच्या अर्थमंत्र्यांची भूमिका करणारा क्रिस्टोस लुईलीसची भूमिका मध्यवर्ती आहे. एकीकडे देशातील नागरिकांनी आर्थिक हतबलतेतून आपली संपत्ती विकायला काढलेली, तर एकीकडे संपूर्ण युरोपभरातून मदत होते, असं दिसणारं दृश्य.

Image may contain: 6 people, people standing and suit

हे अत्यंत वरकरणी आहे. मदतीच्या नावाखाली सर्वतोपरी ग्रीसच्या हतबलतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न युरोपियन कौन्सिलने केला. त्यात पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांची मजबूत युती आणि मैत्री युरोपियन कौन्सिलला भक्कम उत्तरे देत होती. त्यांचे प्रत्येक डाव परतवून लावत होते. स्पष्टच आहे, जर्मन चान्सलर एंजेला मर्केल (एंगीला) यांची भूमिका अत्यंत मुत्सद्देगिरीची आणि युरोपियन कौन्सिलला मुठीत धरून ग्रीसला तालावर नाचणारी आहे, किंवा होती म्हणूया.

फ्रान्सने घेतलेली प्रचंड दुटप्पी भूमिका ग्रीसला नेहमीच कोड्यात पाडत आली. कारण फ्रान्सलाही माहीत होतं, की जर दिवाळखोरीत निघालेल्या ग्रीसला मदत केली, तर फ्रान्सचा आर्थिक बॅकबोन मोडकळीला लागणार. मात्र, जगाच्या दृष्टीने मैत्रीपूर्ण मदतीचा हात फ्रान्सने पुढे केला. त्याच वेळी डॉ. एंजेला मर्केल यांनाही त्यांचा पूर्ण पाठिंबा होता.

Image may contain: 3 people

अर्थात हा संपूर्ण युरोपीयन इतिहास माहित असल्याशिवाय चित्रपट कळणे अक्षरश: अशक्य आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाचे सगळे, खांब दिग्दर्शकांनी समर्थपणे सांभाळले. चित्रपट शो-बिझनेस आहे हे दिग्दर्शकाने प्रत्येक चौकटीमध्ये दाखवून दिले. युरोपियन कौन्सिलच्या केवळ एका खोलीत घडणारे नाट्यमय प्रसंगांची रंजकता टिकवून ठेवण्यात दिग्दर्शकाला अफलातून यश मिळाले.

अर्थमंत्री यानिस व्हर्फकीसची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आणि ही भूमिका साकारणाऱ्या लुईस यांच्या अभिनयाला दाद द्यावी तेवढी थोडी. एका देशप्रेमाने ओतप्रोत अँग्री यंग मॅन त्याने उभा केला. त्याला वेगवेगळ्या देशांनी ज्याप्रकारे अगतिक करून टाकले, तो अभिनय केवळ अप्रतिम. ती संपूर्ण अगतिकता चेहऱ्याच्या प्रत्येक रेषेतून व्यक्त होत होती.

चित्रपटाचा भाग म्हणून मला काय आवडले माहिती आहे? क्रिस्टीलोने दरवेळी घातलेले वेगवेगळ्या रंगाचे शर्ट खरोखर चित्ताकर्षक होते. त्याचवेळी ग्रीस पंतप्रधानांना युरोपियन कौन्सिलने कोंडीत धरण्याचा केलेला प्रयत्न आणि ग्रीस जनतेच्या भल्यासाठी एका मित्राने आपल्या मित्राचा दिलेला बळी ही एक छोटीशी संगित नाटिका चित्रपटातच आहे आणि ती फार सुंदर वठली आहे.

एकीकडे इतिहासाचे वर्णन करणार्या प्रत्यक्षदर्शी चित्रपटांमध्ये किती वार्तांकन टाईप किंवा बोजड होण्याची शक्यता असते. मात्र रंग विविधता आणि रिदमिक संगीत यामुळे चित्रपट वेगवान राहतो.

एक अफलातून चित्रपट बघितल्याचे समाधान मिळाले आणि त्याहूनही दिवाळखोरीत निघालेल्या देशाची प्रचंड अगतिकता त्यातून स्पष्ट झाली. आपण वर्तमानपत्रांत रोज वाचतो त्यापेक्षा प्रत्यक्ष ‘एडल्ट्स गेम’ किती जीवघेणा असू शकतो याचे परिणाम कारक चित्रीकरण म्हणजे हा चित्रपट.

इतर ब्लॉग्स