संस्कारांचं देणं

rangoli
rangoli
छोट्या छोट्या प्रतीकांमधून मोठा आशय साधणारी रांगोळीची कला ही आपल्या जीवनातील चौसष्ट कलांपैकी एक असून, ती आपल्या सोळा संस्कारांना प्रज्वलित करते. रंग, ठिपके, रेघ, त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन अशा विविध आकारांपासून रांगोळीचे अस्तित्व निर्माण होते. आजच्या अँड्रॉइडच्या जमान्यात क्षणभर का होईना, रांगोळी मानवी मनाला भुरळ घालून सतत कशाच्या ना कशाच्या मागे धावणारे पाय क्षणभर रांगोळीसाठी थांबतात. रांगोळी मन उल्हसित करून सर्जनशीलतेचे देणं देते.

- पारंपरिक रांगोळी काढताना काही शुभ चिन्हे काढली जातात.
शुभ प्रतीके : रांगोळी ही कला देवाधर्माशी सबंधित कला आहे. स्वस्तिक, ज्ञानकमळ, कलश, श्रीफळ, कोयऱ्या, शंख, फुलांच्या परड्या इत्यादी अनेक पारंपरिक प्रतीकांचा वारसा जपत ही कला पुढे बहरत गेली.

- वृंदावनातील तुळशीपुढे काढायच्या, पाटाच्या बाजूने काढायचा गालिचा, संस्कारभारती, मंडल रांगोळी असे विविध रांगोळीचे अनेक प्रकार आहेत. त्यात नियमितपणे काढल्या जाणाऱ्या व नियम चुकू नये म्हणून शक्‍य तितक्‍या घाईत का होईना, काढता येतील अशा सोप्या रांगोळ्या हल्ली काढल्या जातात.

- स्वस्तिक, फूल, गाईची पावले- गोपद्म, कासव, शंख या प्रतीकांमागील भावनाही सुंदर असते. शंख हे ध्वनी, नादाची निर्मिती करणारा, चक्र हे सृष्टीच्या या तिन्ही काळांचे गतिचक्र, कारले, वेलदोड्याचा वेल यांचीही रांगोळीत हजेरी असतेच.

- घरामध्ये आनंदाचे रंग : रांगोळी ही येणाऱ्या पाहुण्याला स्वागतोत्सुक निमंत्रण देत असते. रांगोळीतील रंग सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. प्रत्येक रंग काही ना काही संदेश देत असतो. लाल रंग आत्मविश्‍वास निर्माण करतो. निळा रंग विश्‍वास व शांतता निर्माण करून सकारात्मकता देतो, तर हिरवा रंग आनंदी वृत्तीचे दर्शन घडवतो. पिवळा रंग सूर्याच्या पिवळ्या किरणांची नवी आशा जागृत करून व्यक्तिमत्त्व खुलवतो, तर जांभळा रंग सर्जनशीलतेचा अंकुर मनात जागृत करून प्रामाणिक धार्मिकता हे गुण प्रदान करतो. गुलाबी रंग प्रेमाचा आविष्कार घडवतो व सर्वांत महत्त्वाचा म्हणजे पांढरा रंग या सर्व रंगांना आपल्यात सामावून घेऊन स्वतःबरोबरच इतर रंगांचेही व्यक्तिमत्त्व खुलवतो. हे सर्व इंद्रधनुष्याचे रंग जेव्हा रांगोळीच्या माध्यमातून आपल्या अंगणात उतरतात, तेव्हा घराला व आजूबाजूच्या परीसराला तेजोमय करून उल्हसित करतात. एकोप्याने जगण्याची शिकवण देतात. या नानाविध रंगांच्या स्वाभाविक रचनांतून एका संपन्न जीवनशैलीचा उगम होत असतो. सौंदर्योपासनेतूनच माणसाच्या उत्सवप्रियतेचा जन्म होत असतो.

- आधुनिक रांगोळ्या : काळाच्या ओघात जुन्याचे जुनेपण जपत, नव्याचे नावीन्य लेवून धकाधकीच्या जीवनातही रांगोळीचे महत्त्व जाणून पेन, बोरू, पंजे, छापे, जाळीचे झाकण, नरसाळे, डिझाइनच्या नळ्या इत्यादींचा वापर करून गालिचा रांगोळी, तसेच विविध विषयांवरील निसर्गचित्रे, देवींची विविध रूपे, व्यक्तिचित्रे, सामाजिक विषय, गणेश प्रतिमा, अशा अनेक प्रकारे रांगोळीचे चित्रण पाहायला मिळते. महाराष्ट्रात रांगोळी, बंगालमध्ये अल्पना, कर्नाटकात रंगोली, राजस्थानात मांडणा, तर गुजरातमध्ये साथिया, ओरिसात झुंटी, बिहारमध्ये अरिपण असे म्हटले जाते.

- पारंपरिक रांगोळ्यांमध्ये जशी शुभ चिन्हे असतात तशीच आता ऍन्ड्रॉईडच्या जगात सोशल मीडियातील लोगोंचा वापरही रांगोळीत होताना दिसतो.

- काही ठिकाणी रांगोळीमध्ये ठिपक्‍यांचा, पानाफुलांचा, धान्यांचा, तर कोकणात भाताच्या फोलपटांची पावडर वापरतात. तांदळाच्या पिठाचा वापर दक्षिण भारतात केला जातो. ताटात किंवा परातीत पाण्यावर कोळशाची पूड टाकून त्यावरही रांगोळी काढली जाते.

- हल्ली मोठमोठ्या समारंभांत, पंचतारांकित हॉटेलांत, मॉलमध्ये, पालखी सोहळा, गणपती विसर्जन मिरवणुकीत रांगोळीच्या पायघड्या असतात.

- आयुष्यात आणते उत्साहाचे रंग : रांगोळीतील बिंदू किंवा टिंबाप्रमाणे आपणही अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करून एकमेकांना जोडण्याचे कार्य करायला हवे.

- संस्कृतीची, कलाकृतीची आवड असणाऱ्या आपणा सर्वांच्या अंगणातून "रांगोळी' बहरत असते. अशी ही संस्कारमय, चैतन्यमय अन्‌ मांगल्यदायी गुढी मनाला उल्हसित नक्कीच करेल.

- गुढीपाडवा हा सण म्हणजे मराठी नववर्षाची सुरवात. या वर्षाच्या सुरवातीलाच आपण संकल्प करू, तो म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैलीचा. रांगोळीसाठी कृत्रिम रंग न वापरता घरच्या घरी केलेले रंग वापरता येतील. पाने-फुले, रंगीत बिया यासारख्या निसर्गात सहज मिळणाऱ्या काही वस्तू वापरून तुम्ही सुंदर रांगोळी रेखाटू शकता.

- केळीच्या पानावर तसेच इतर झाडांची पडलेली पाने-फुले, घरातील वेगवेगळ्या आकाराच्या भाज्या, फळे, ओटीमध्ये आलेले तांदूळ जे तुम्ही काही कारणास्तव खाण्यासाठी वापरू शकत नाही असे किंवा लाकडाचा भुसा वापरून, पाण्यावरची अशा कलरफुल क्रिएटिव्ह रांगोळी तुम्ही काढू शकता.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com