अचाट शक्ती पुळचट प्रयोग

shivsena
shivsena

मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यात शेतकरी दररोज गळ्याभोवती फास आवळत आहे. या ज्वलंत प्रश्‍नावर खऱ्या अर्थाने रान उठवायला हवे होते. पण, तसे काहीच घडले नाही. शिवसेना ही अचाट शक्ती. पण तिचे सध्या जे प्रयोग सुरू आहेत ते मात्र पुळचट होत आहेत. 

राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते. तेव्हा ते आपल्या भाषणात "हमे करना है. हमे देखणा है ' असा वारंवार उल्लेख करीत. त्यांची शिवसेनेचे नेते प्रमोद नवलकर नेहमीच खिल्ली उडवीत. दररोज दूध देण्यासाठी येणाऱ्या भैय्याने त्यांना एकदा विचारले,"" साहब, आप तो शिवसेना के बडे नेता हो ! तो फिर आपके घरमे ये राजीव गांधीकी तस्वीर कैसे !'' त्यावर नवलकर म्हणाले,"" भैय्याजी ये हमारा टीव्ही है!"" दररोज टीव्हीवर राजीवजींच्या दर्शनाने लोकांना कंटाळा आला होता. नवलकरांनी ही कोटी केली त्यालाही आता काही वर्षे लोटली. मात्र देशात आणि राज्यातही तसेच चित्र आहे. ते काही बदलले नाही. फक्त सत्तेवरील चेहरे तेवढे बदलले. 

नवलकरांची आज अचानक आठवण यायची कारणही शिवसेनाच. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना मोठी शक्ती. हे मोठ्या मनाने कोणीही म्हणेल. या शक्तीचा उपयोग मराठी माणसांना एकेकाळी झाला हे ही मान्य. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पक्षात लढण्याचे बळ उरले नाही की काय ? असा प्रश्‍न वेळोवेळी उपस्थित होत आहे. जनतेच्या प्रश्‍नांवर सरकारशी सामना करण्याऐवजी नुसतेच इशारे आणि कागदी बाण सोडले जाताहेत. त्या बाणाचा चुरगळा करून फडणवीस सरकार ते फेकून देत आहे. शिवसेनेला सरकार गांभीर्याने घेत नाही असा अनुभव राज्यातील जनता घेत आहे. दुसरीकडे आपले पक्षप्रमुखही दररोज सरकारला डेडलाईन देत आहेत. पोकळ इशाऱ्यांना कोणी भीकच घालेनासे झाले आहे. 

राज्यात खूप मोठी गुंतवणूक होणार आहे आणि त्यादृष्टिने फडणवीस सरकार एक एक पाऊल पुढे टाकत आहे हे स्वागतार्हच आहे. मात्र, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. तो कधी नव्हे इतका संकटात सापडला. त्याला कर्जमुक्त करण्यासाठी सर्वच पक्ष यात्रेजत्रेत आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसंपर्क यात्रा. शिवसंपर्कपाठोपाठ भाजपची संवाद यात्राही निघणार आहे म्हणे. तसा मे महिना यात्राजत्रांचाच असतो. त्यामुळे यात्रेत "जसे हौसे, नवसे, गवसे' असतात तसेच या यात्रांचेही झाले. शेतकऱ्यांच्या दु:खापेक्षा नेत्यांच्या छबीच अधिक झळकत आहेत. जे कॉंग्रेसचे तेच शिवसेनेचे. तिकडे मातृसंस्थेतील हिंदूंचे तारणहार विश्‍व हिंदू परिषदेनेही मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. या परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी सरकारचे कान उपटताना म्हटले आहे, की मोदी सरकारच्या काळात सीमेवरील जवानही सुरक्षित नाही आणि गावातील शेतकरीही सुखी नाही. एका दृष्टीने बरे झाले तोगडियाच बोलले. याचा जो काही बोध घ्यायचा आहे तो आमच्या मुख्यमंत्र्यांनीही घ्यावा. असो. 

राज्यात आजपर्यंत शिवसेनेने शेकडो लढे उभारले. ते यशस्वीही केले. या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची फौज सरकारवर अशी तुटून पडत असत की सरकारला घाम फोडला जायचा. शिवसेनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधण्यासाठी विधानसभेवर काढलेले भव्य आणि दिव्य मोर्चे आजही आठवतात. गोरगरिबांची शिवसेना म्हणून या पक्षाकडे पाहिले जात असे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच शिवसेनेचे जे आठ नेते होते तेही प्रचंड ताकदीचे होते. गल्लीबोळातून शिवसेनेचा आवाज बुलंद होत असे. बाळासाहेबांच्या ज्वलंत विचाराने वातावरण ढवळून निघत असे. बाळासाहेब असे नेते होते की ते भल्याभल्यांची बिनपाण्याने करायचे. त्यांनी मित्र भाजपलाही कधी सोडले नाही. 

एखादा प्रश्‍न हातात घेतला आणि तो तडीस नेला नाही असे कधी घडले नाही. शिवसेनेच्या इतिहासात अधिक न जाता आज या पक्षाला काय झाले आहे असा प्रश्‍न मनात येतो. गेल्या वर्षादोनवर्षापासून शिवसेनेत जो जोश होता तो कुठे दिसत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर नुसते शब्दांचे प्रहार. दररोज इशारे. तर कधी सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी. कोणतेही सरकार असो ते गेंड्याच्या कातडीचे असते असे बोलले जाते. त्यामुळे कागदी बाणांचा आणि इशाऱ्यांचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नसतो. सध्या तसेच होताना दिसत आहे. 

आज उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे, रामदास कदम आणि संजय राऊत सोडले तर शिवसेनेच्या एकाही नेत्याने डरकाळी फोडली आहे आणि ती जनतेच्या कानापर्यंत पोचली आहे असे चित्र पाहण्यास मिळत नाही. मराठवाडा तर या पक्षाचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्याने पक्षाला खूप काही दिले. सत्तेवर पोचविले. मराठवाड्यातील शेतकरी दररोज गळ्याभोवती फास आवळत असताना शिवसेनेने या ज्वलंत प्रश्‍नावर खऱ्या अर्थाने रान उठवायला हवे होते. संघर्ष करण्याची गरज होती. महाराष्ट्र बंदची हाक द्यायला हवी होती. पण, तसे काहीही घडले नाही. रस्त्यावर उतरायचे कोण ? पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खायच्या कोणी ? हा प्रश्‍न आहेच. या पक्षाकडे आजही कार्यकर्त्यांचे इतके घट्ट जाळे आहे की ते कोणताही प्रयोग यशस्वी होऊ शकतो. शिवसेनाही अचाट शक्ती. पण तिचे सध्या जे प्रयोग सुरू आहेत ते मात्र पुळचट आहेत असे म्हणावे लागेल. 

एकेकाळी राजीव गांधी जसे म्हणत होते "हमे देखना है !' तसेच उद्धव ठाकरेही आम्ही हे करू. ते करू. मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले आहे. त्याचीच प्रतीक्षा करतो आहोत असे एक ना अनेक आश्‍वासन जनतेला देतात. दररोज प्रसारमाध्यमांमध्ये झळकतात. मात्र ऍक्‍शन काही होत नाही. शब्दाचे नुसतेच बुडबुडे काही कामाला येत नाही. एकेकाळी शिवसेनेचे शिलेदार असलेल्या छगन भुजबळांनी, शेकापच्या केशवराव धोंडगेंनी, "राष्ट्रवादी'च्या आर.आर.आबांनी विधानसभा गाजविली होती. आज सभागृहात शिवसेनेचे इतके मावळे असताना सगळेच का मूग गिळून बसले आहेत याचे उत्तर सरणावरील बळिराजा शोधत असेल का ? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com