@ताडोबा

@ताडोबा

भारदस्त, करारी, बरेच ऊन-पावसाळे पाहिलेलं असं प्रगल्भ, बुजुर्ग व्यक्तिमत्त्व, तादू ताडू नावाच्या आदिवासी प्रमुखाने युद्ध करून वाघापासून वाचवलं, असा आदिवासींचा गाढा विश्‍वास आहे. ताडूचा ताडोबा देव झाला. आजही त्याच्या मंदिर परिसरात दरवर्षी मोठी जत्रा भरते. ताडोबाला लागूनच अंधारी हा संरक्षित वनांचा भाग. दोन्ही परिसर एकत्र करून हा मोठा व्याघ्रप्रकल्प उभा राहिला. त्यामुळे वाघ आणि इतर प्राण्यांना भरपूर मोठा प्रदेश मुक्त संचार करावयास मिळाला...
 

आम्ही ४५ अंश उन्हात शिडी चढू लागलो, दुपारी १२ वाजता मचाणाची....ताडोबाच्या जंगलातल्या सर्वांत सुंदर जागेवर ‘ऐसा मौका फिर कहां मिलेगा’ म्हणत...
सर्वांनी असं सर्वांगांनी जंगल एकदा तरी अनुभवावंच, हा jim Corbett, kipling,  चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर, दुर्गाबाई आणि तत्सम मंडळींचा आज्ञावजा सल्ला त्यांची पुस्तकं वाचून मनात होताच... आता ते सारे एक दिवसासाठी का होईना अनुभवायला मिळणार, या आनंदात आम्हाला कुठलीही चिंता जाणवू देईनाच म्हणाना.

ताडोबाच्या जंगलाचा आपला एक वेगळाच बाज आहे. तसा तो प्रत्येक रानाचा असतोच म्हणा. कान्हा, बांधवगड या मध्यप्रदेशच्या प्रकल्पाचं तरुण, रसरशीत व्यक्तिमत्त्व आहे. झाडं जोमदार, छोटे छोटे हिरवे माळ, दाटीत उभे रुबाबदार साग आणि साल आहेत तिथे पण ताडोबा-अंधारी या महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या आणि सर्वांत मोठ्या प्रकल्पाचे जुन्या जाणत्या, भारदस्त, करारी, बरेच ऊन-पावसाळे पाहिलेलं असं प्रगल्भ, बुजुर्ग व्यक्तिमत्त्व, तादू ताडू नावाच्या आदिवासी प्रमुखाने युद्ध करून आदिवासींना वाघापासून वाचवलं, असा त्यांचा गाढा विश्‍वास आहे. ताडूचा ताडोबा देव झाला. आजही त्याच्या मंदिर परिसरात दरवर्षी मोठी जत्रा भरते. ताडोबाला लागूनच अंधारी हा संरक्षित वनांचा भाग. दोन्ही परिसर एकत्र करून हा मोठा व्याघ्रप्रकल्प उभा राहिला आणि वाघ आणि इतर प्राण्यांना भरपूर मोठा प्रदेश मुक्त संचार करावयास मिळाला.

एक बाजूला चिमूर टेकड्या तर दुसऱ्या बाजूला मोठा ताडोबा तलाव. त्यामुळे टेकड्यांची उंची, दऱ्यांची खोली आणि पाण्याची शांत निश्‍चलता ताडोबात एकत्र आली. त्याचबरोबर असंख्य तऱ्हेतऱ्हेचे वृक्ष त्याला गर्द हिरवं करतात आणि मोकळे पोपटी माळ मध्ये मध्ये असल्यानं इथं स्वभावातलं खुलेपण, दिलदारपणही मला जाणवतं.
आमच्या मचाणाच्या बाजूनेही जांभळाची, सागाची, बेहडा, धावडा, कडुनिंबाचे एखाद दुसरी कवठाची, बेलाची, चिंच, बाभळीची, करंज अशी झाडं आणि त्यांचं दाटीदाटीचं कवच होतंच. थोड्या अंतरावर एक झुळझुळ ओहोळ आणि त्याच्या कडेला मोठाले अर्जुन वृक्ष पण.

पक्षी, प्राणी हमखास येतील असा उंच गवताचा माळ डावीकडे पसरलेला... अगदी आत core area  असल्यामुळे फक्त टेकड्या दिसत नव्हत्या एवढंच. 
काय काय बघायला मिळणार पुढच्या २४ तासांत या अपेक्षांचा पूर केव्हाच दाटू लागला होता मनात.

हरणं एव्हाना चरणं सुरू करत पहिल्या अर्ध्या तासातच ३० च्यावर नर-मादी पाण्याशी आलीत. दोन नरांचं एकमेकांच्या शिंगांशी टक्कर घेणंही दुरून दिसत होतं. त्यांनी कान टवकारले, कानोसा घेऊन सजग होऊ लागले की आम्हीही चाहूल घेऊ लागलो. वाघ जवळपास आहे, हे हरीण आणि वानर सूचित करतात. 

माकडं झाडावरून एक वैशिष्ट्यपूर्ण आवाज करतात आणि त्याने जागी होत हरणंही call देतात... अगदी कमी वेळाचे, उंच टिपेत आणि ठरावीक अंतरात हे कॉल्स त्यांच्या mating calls पेक्षा कसे वेगळे असतात हे त्यापुढच्या काही तासांत जाणवलं.

जंगलच्या राजाचा माग या विशिष्ट हाकांवरून घेतला जातो... ही जंगलातल्या प्राण्यांची एक स्वत:ची भाषा असते आणि ती दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरात बदलत जाते. सकाळी calls ची पक्षी किलबिल, तर दुपारी माकडं, हरणं यांचे उत्साहाचे बडबडे, संध्याकाळी हुरहूर लावणारे घाबरेघुबरे असे त्यांचे calls  आणि काळोख्या रात्री तर टिटव्या, कोल्हेकुई, लांडग्यांचे भेसूर आवाज, घुबडाचे घुम्मे आणि कधी किंकाळ्या पण.

सगळ्या जंगलवेड्यांच्या ओठी calls  आणि sighting  हे शब्द सतत असतात.
ठिपकेदार हरणं, नर, माद्या, पिल्लं, सांबर भरपूर दिसत गेली...अंधार होईपर्यंत ओढ्याकडे बऱ्याच संख्येने रानडुकरे पण पाणी पिऊन जात होती.
तेवढ्यात पायात गुडघ्यापर्यंत काळेपांढरे मोजे घातलेले दोन-तीन प्राणी दिसले... मांसल, उंच, ऐटदार, बरेचसे सांबरासारखे दिसणारे... त्या नीलगायी होत्या... आणि त्यांच्याच पाठीमागे निळ्या करड्या रंगाचा, दाढी असलेला नीलघोडा... वाघाचं आवडतं खाद्य. पायाच्या विशिष्ट रंगामुळे सांबर आणि नीलगायीतला फरक ओळखणं सहज शक्‍य होतं.

सूर्य मावळतीला आलेला... झाडांचे सोनेरी कळस होत होते... काळतोंड्या माकडांच्या एका मोठ्या पलटणीने तळ्याच्या पाण्याचे यथेच्छ रसपान केलं. पिल्लांचे लाड करीत, कुठल्याशा शेंगा सोलून खात उंबराच्या उंच वृक्षावर आपला डेरा जमविला.

जंगलाला रात्रीचे भान येऊ लागतंय, हे फांद्यावरचे काजवे, आभाळात साद घालणारे रातवे आणि पूर्वेकडून उगवत आलेले चंद्राचे आकाशदिवे चमकू लागले की समजावे!
रात्र वैशाख पौर्णिमेची! स्वच्छ आकाश... एक दोन मोठे तारेच तेवढे आकाशात! सागाच्या, निंबाच्या मागून चंद्रबिंब वर सरकत होतं... समोरचा माळ छान प्रकाशला तरी प्राणी दिसायला विजेचे प्रकाशझोत आता गरजेचे होऊ लागले होते...

रातकिडे, बेडूक आणि कुठूनसे येणारे घुबड आवाज यांच्या संगीतसाथीने आम्ही पटापट जेवण उरकलं. वनविभागाने थंड पाण्याचे मोठाले thermos वेळोवेळी पुरवून आमची तहान भागविण्याची उत्तम सोय केली होती. त्यामुळे हुश्‍शार होऊन आम्ही पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीत पुन्हा सज्ज झालो!
आमच्याकडे फक्त काजवेच चमकताना दिसत होते... जोडीला रातकिड्यांची किर्रर्र अशी निःस्तब्ध शांतता... 

तोच अचानक कॉल्स सुरू झाले.
आधी माकडांच्या झाडाकडून...
जवळपास तो आहे अशी सूचना की काय? माकडांची शिकार करायची वाघाची एक युक्ती असते!
त्याच्या वस्तीच्या झाडाखाली उभे राहून मोठी डरकाळी फोडायची. कधी कधी घाबरून तर कधी हार्ट अटॅक येऊन माकड गडबडीत  खाली पडलं की मग एका पंज्यात खेळ खल्लास!
आम्ही मोठी गर्जना ऐकली नि दणाणून टाकणे या शब्दाचा अर्थ तेव्हा कळला... आम्ही एकमेकांचे नकळत हात धरले आणि डोळ्यात जीव एकवटून वाट पाहू लगलो... हरणांचेही कॉल सुरू झाले... जवळपास खात्रीने होता तो तितक्‍यात दुसरा ओरडण्याचा आवाज आला... किंकाळी आणि गर्जना यांची बेमालूम सरमिसळ... जीव घेण्याचा आनंद आणि जीव जाण्याचा विषाद एकाच वेळी त्या आवाजात जाणवला! ऐकू येत होतं त्यावरून एक किल केलाय त्याने हे कळत होतं!
साधारण २० वेळा प्रयत्न केला की एकदा शिकार होते म्हणे वाघाची. 

शिकारीवर ताव मारायच्या आधी ती ओढत नेऊन झाडीत लपवतो वाघ.  आमच्या मचाणामागेच बाबूंची झाडी होती.
अगदी उत्तम जागा शिकार रानकुत्री, तडस यांच्यापासून लपवायला आणि जवळच पाणीही होतं चंद्रप्रकाशात थंड झालेलं प्यायला आणि डुंबायलाही! एकूण काय ‘आअदब, बा मुलाहिजा, होशियार, जंगल के शेरखान पधार रहे है...’ असं म्हणत आम्ही वाटेकडे डोळे लावून बसलो होतो. दोन तास!

कॉल्स थांबले... डरकाळ्या आणि किंकाळ्या पण तो काही तळ्यामळ्यात आलाच नाही. काटेझरीच्या मचाणावर बसून रात्रीचा जंगल थरार अनुभवला तेव्हा वाघ अगदी जवळच फिरकला होता, त्याने शिकारही साधली होती पण ती आमच्या डोळ्याआड कावलची शिकार केलेला ढाण्या वाघ जवळच पहुडलाय, अशी वाऱ्यावर बातमी आली. ओढ्याकाठच्या जाळीत पाय वर करून झोपलाय म्हणे!

ही वाघाची वेगळीच झोपायची स्टाइल ऐकलीय पण बघितली नाही कधी!
लगबगीने आम्ही त्याला बघायला परतीच्या जीपमध्ये बसलो. जाळीशोध सुरू झाला... शेवटी नाद सोडून आम्ही काटेझरीतून बाहेर पडलो.
 किलचा वास येऊ लागला. हा जंगलाचा आपला आणि मारलेल्या शिकारीचा असा एकत्र होऊन एक विचित्र असा वास असतो.
रस्त्यावरून माणसाच्या चालीने जीप धावत होती आणि... आता समोरचं दृश्‍य डोळ्याचं पारणं फेडणारं...

आई ‘माया’ तिच्या ‘किरण’ आणि ‘अर्जुन’ या जवळपास फुल्ल ग्रोव्हन मुलांबरोबर राजेशाही थाटात क्रॉस करती झाली. एक नव्हे, दोन नव्हे तीन तीन वाघ रस्त्यावर...
जवळच्या तलावावर त्या तिघांचे डुंबणे, खेळणे, प्रेमाने एकमेकांच्या गळ्यात पंजे घालून लाड करणे, तलावाकाठच्या वसक्‍या झाडावरून उड्या मारणे असा फुल्ल दर्शनखेळ आम्ही २०-२५ मिनिटं दुर्बिणीतून, कॅमेऱ्यातून आणि डोळे फोडून बघत होतो!

त्याचा पाणखेळ संपला आणि आल्या वाटेने मंडळी परत रस्ता ओलांडून झाडीत आली.जेवून झोपा काढायला आणि जेवण तरी काय? एक मोठ्ठं सांबर. आणखी एक ‘मनका’ नावाचे मायाचे तिसरे पिल्लूही झाडीत होते!

मुलं जेवायला बसली की आई कशी बाजुला बसून कौतुकाने पाहत असते तशीच ही आईही पिलांचे विभ्रम बाजूला बसून न्याहळत होती! आईने लेकरांना शिकार करण्याचेच नव्हे तर शिकारीवर ताव मारण्याचे उत्तम धडे दिले होते यात शंकाच नाही! असं दृश्‍य क्वचित दिसतं. एका अनोख्या उपक्रमाची इतकी अतिविशिष्ट अखेर होईल हे आमच्या कोणाच्या स्वप्नातही नव्हतं...

टेटनचे कलरफुल राष्ट्रीय उद्यान

देश - अमेरिका
जवळचे शहर - जॅकसन
एकूण क्षेत्र - ३ लाख १० हजार चौरस एकर
२०१६ मध्ये ३२ लाख २७ हजार पर्यटकांनी भेट दिली
सुमारे ६४ किलोमीटर लांबीची पर्वतरांग पसरलेली आहे.
या जंगल प्रदेशात ११ हजार वर्षांपूर्वीपासून आदिवासी राहत आहेत.
उष्णतेपासून बचावासाठी येथे अनेक शिकारीही येऊन राहत
१८१० ते १८४० दरम्यान येथून व्यापार सुरू होऊन हा प्रदेश जगाच्या नकाशावर ठळक झाला.
१९२९ ला टेटन राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.
या माध्यमातून टेटन पर्वतरांगेतील महत्त्वाच्या शिखरांचे संवर्धन सुरू करण्यात आले.
या परिसरातील प्रसिद्ध जॅकसन होल १९३० पर्यंत खासगी मालकीचे होते त्यानंतर ते सरकारने ताब्यात घेतले आणि राष्ट्रीय उद्यानात त्याचा समावेश केला.
राष्ट्रीय स्मारक स्थळ म्हणून या परिसराचा समावेश करण्यात आलेला आहे.
टेटन पर्वतरांगेतील उंच शिखरांवरून या उद्यानास टेटन उद्यान असे नाव दिले आहे.
येथील सर्वात उंचीचे शिखर ४१९९ मीटर उंचीचे आहे.
येथे अत्यंत सुंदर असे जॅकसन नावाचे तळे आहे.
या रांगेतच स्नेक नदीचा उगम झालेला आहे.
वाहणारे झरे आणि कोसळणारे धबधबे हे येथील हाय पाईंट आहेत.
येथे अनेक छोट्या हिमनद्या असून त्या प्रवाही आहेत.
या पर्वतरांगेमध्ये अडीच लाख वर्षांपूर्वीचेही काही खडक आढळतात. या खडकांच्या संशोधनासाठी अभ्यासक येथे भेट देतात.
या उद्यानात रक्तवाहिन्यांसंबंधीच्या एक हजारावर प्रजाती आढळतात.
अनेक सस्तन प्राणी येथे वास करतात.
रेनडियर, हिमबिबटे, हत्ती, हरणे आदी प्राणीही या उद्यानात आहेत
वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींमुळे हे उद्यान अगदी कलरफूल झालेले आहे
तीनशेवर पक्ष्यांच्या प्रजाती येथे विहरत असतात.
येथील तळ्यांमध्ये पन्नासवर माशांच्या प्रजाती आढळतात.
अनेक दुर्मिळ होत जाणारे सरपटणारे प्राणीही येथे आढळतात.
पांढरी साल असलेले अनेक प्राचीन देवदारचे वृक्ष येथे आढळतात.

साहसवीरांसाठी पर्वणीचे ठिकाण
या राष्ट्रीय उद्यानात एकीकडे घनदाट जंगलाने व्यापलेले आहे तर दुसरीकडे उंचच उंच हिमाच्छादित शिखरे सोबतीला आहेत. साहसवीरांसाठी हे शब्दशः पर्वणीचे ठिकाण आहे. येथे गिर्यारोहण, मासेमारी, हायकींग आदींसाठी पर्यटक येथे गर्दी करतात. येथे सुमारे एक हजारांवर ट्रेक उपलब्ध आहेत. येथील स्नेक नदीमध्ये ट्रॉउट नावाचे मासे मारण्यासाठी पर्यटक खास भेट देतात. नदीमध्ये अनेक जण नौकानयनाचा आनंद घेतात. अनेक जण येथील बर्फाच्छादित भागामध्ये स्किईंगचा आनंद घेण्यासाठी पोचतात.अमेरिकेच्या वायव्य भागामध्ये टेटन पर्वतरांग पसरली असून या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले घनदाट जंगल म्हणजे येथील टेटन राष्ट्रीय उद्यान. 
 - प्राजक्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com