नकुशी...? नव्हे हवी-हवीशी...! 

नकुशी...? नव्हे हवी-हवीशी...! 

खरं म्हणजे दिनेश वैतागलाच... सकाळपासनं मुलानं कहर केला होता. एकामागनं एक त्याच्या ऑर्डर येत होत्या. 'मम्मा, माझा युनिफॉर्म शोधून दे, त्याला इस्त्री केली का, ?' 'पप्पा, बुटांना पॉलिश करून द्या,' 'माझ्या स्कूलचा प्रोजेक्‍ट कोण करणार, मम्मी का पप्पा ?'... 

दिनेशला वाटलं... आता यानं स्वतःची कामं स्वतः करायला नकोत ? दहावीत गेला ना आता ? अशी मनात येणारी वाक्‍यं त्यानं गिळून टाकली. त्याला वाटायचं... दिवसभर कंपनीत उभं राहून घरी आल्यावर आपल्या दुखणाऱ्या पोटऱ्या अन डोकं कुणीतरी म्हणजे या कारट्यानंच दाबून द्यावं... पण कसचं काय अन कसचं काय... ? हा आपला रिमोट घेऊन त्याचे पॉप-रॉकचे अन डब्ल्यूडब्ल्यूईचे चॅनेल बघण्यातच दंग... मुलगा होऊ दे अशा नवसानंतर झालेला एकुलता एक मुलगा असा... वैताग आहे नुसता... 

तोच वैताग घेऊन दिनेश ऑफिसला गेला. मधल्या वेळेत डबा खाण्यासाठी ऑफिसमधला सहकारी अविनाशसमोर बसला. अविनाशनंही त्याचा डबा उघडला. 

'अरे काल एक गंमतच झाली...' अविनाश उत्साहानं गंमत सांगू लागला. 

'काल ऑफिसात कामामुळं पिट्टा पडला होता, अन मी घरी गेलो तेव्हा पूर्णपणे एक्‍झॉस्ट झालो होतो. जेवण झालं तरी डोकं जडच होतं. बेडवर आडवा झालो अन बायकोला आवाज दिला, 'जरा डोक्‍यावर तेल थाप गं...' किचनमधनं आवाज आला, 'मी कामात आहे, जमणार नाही...' नाईलाजानंच डोळे मिटले अन झोपच लागली. थोड्या वेळानं डोक्‍यावर हात पडला आणि तेल डोक्‍यात मुरू लागलं. जाग आली. आता बायकोला दया आली वाटतं... पण डोळे न उघडताच म्हटलं, 'जरा चोळ केसांना म्हणजे मुरेल', असं म्हणत तिचा हात मीच हातात घेऊन डोकं चोळू लागलो... पण तिचा हात खूपच चिमुकला झाला होता... बायकोचा हात एवढा लहान कसा ?, असं म्हणत मी डोळे उघडले, तर माझी चार वर्षांची चिमुरडी शर्मिष्ठा मला तेल लावत होती अन म्हणत होती... दमलास ना पप्पा... मी तिला जवळ घेऊन तिचे मुकेच घेतले. इतकं बरं वाटलं बघ...' 

दिनेश ऐकतच राहिला... त्याच्या डोळ्यांपुढे दोन गोष्टी आल्या. पहिली गोष्ट म्हणजे घरातलं एकही काम न करणारा अन त्याहीपुढं जाऊन त्याचीही कामं मम्मी-पप्पांनाच करायला लावणारा मुलगा... पण दिनेशच्या डोळ्यांपुढे आलेली दुसरी गोष्ट वेगळीच होती... झालं असं होतं. लग्नानंतरच्या पहिल्याच वर्षी बायको गर्भवती राहिली होती... पण करियर करायचं म्हणून त्यांनी गर्भपात केला. रूटिन वैद्यकीय तपासणीत नकळत तो गर्भ मुलीचा असल्याचं समजलं होतं... अविनाशची गंमत ऐकल्यावर दिनेशला त्या न जन्मलेल्या चिमुकलीची आठवण झाली... तिचा जन्म रोखला नसता तर ?... चिमुकले हात आपल्या डोक्‍यावरनं फिरताहेत असा भास त्याला झाला अन त्याचे डोळे पाणावले... 

एका बाजूनं बेटी बचाओ मोहिमेचे ढोल बडवले जाताहेत अन दुसऱ्या बाजूनं आपल्या पोटच्या मुलीला नदीत फेकून दिलं जातयं... हे आहे आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचं भीषण वास्तव... त्यामुळंच समाजातलं पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या झपाट्यानं कमी होतीये. आपल्या महाराष्ट्रातलचं उदाहरण घेतलं तर 2015 मध्ये एक हजार पुरूषांमागे असलेली महिलांची संख्या होती 960. ती 2016 मध्ये 899 पर्यंत घसरली. वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा, ही संकल्पना फारच जुनाट झाल्याचे बोलले जाते, मात्र प्रत्यक्षात मुलाचा आग्रह धरला जातो. एखाद्या मॅटर्निटी होममध्ये नातलग जमलेले असतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह असतं. काही वेळानं आतनं बातमी येते, 'मुलगी झाली...' मग चेहऱ्यावर उसनं हसू अन आनंद येतो. पण मुलगा झाला असं समजलं तर ते हसू आणावं लागत नाही, आपोआप येतं. यातच समाजाच्या पक्षपातीपणाची दृष्टी दडलेली आहे. पालकांना जपण्यापासनं विविध क्षेत्रं गाजवण्यापर्यंत मुली पुढं आणि पुढंच जात आहेत. 'दत्तक घेताना मुलीच पसंत केल्या जातात, त्यामुळे आम्ही पुरोगामी झालो आहोत', अशी शेखी मिरवली जाते, पण स्वतःच्या अपत्यांचा विषय आला की मात्र मुलग्याला पसंती दिली जाते. अर्थात मुलींच्या जन्माला पूर्वी असलेला तीव्र विरोध काळानुसार कमी होत गेल्याचे जाणवते. दोन्ही मुलीच असल्या तरी संततीनियमनाची शस्त्रक्रिया करवून घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. काही कुटुंबात एकच अपत्य आणि तीही मुलगी असे धोरण ठेवण्यात येऊ लागले आहे, मात्र ही संख्या एका हाताच्या बोटांवरून काही हातांच्या बोटांपर्यंत एवढी वाढली आहे. ती आणखी वाढायला हवी. मुलगी का नको, या प्रश्‍नाचं एक उत्तर असतं तिच्या लग्नासाठी करावा लागणारा खर्च. आता बदलत्या काळानुसार लग्नाचा खर्च दोन्ही पक्षांनी वाटून घेणे, अवाजवी खर्च न करणे या उपायांनी त्यावर मार्ग काढता येतो. मुलींना दुय्यम वागणूक देण्यामागे आपल्या समाजमनात घट्ट रुजून बसलेल्या कल्पना-रूढीच आहेत. मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुली कामे करताहेत असं म्हणताना कामगिरीची कमाल मर्यादा म्हणजे मुलांचे काम अशी चुकीची समजूत आपण पोसतो. मुलगी असून ती पुढे गेली, असे म्हणणेही चुकीचे असल्याची कल्पनाही आपल्याला येत नाही. त्यामुळे गरज आहे ती आपल्यावरील शतकानुशतकांचे विषमतेचे संस्कार खरवडून काढण्याची. तरच या भवनातील पुराणे गीत जाऊन नव्या युगाचा नूर येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com