महिला सक्षमीकरणाचे कुंठीत यश 

महिला सक्षमीकरणाचे कुंठीत यश 

गेली काही दशके 'महिला सबलीकरण', 'महिला सक्षमीकरण' असे शब्द आपल्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. वृत्तपत्रामध्ये अथवा वृत्तवाहिन्यांवर असे शब्द आणि त्यांची उदाहरणे तर नित्याचीच झाली आहेत. तरीदेखील आजच्या महिला सक्षम आहेत का, हा प्रश्‍न उभा ठाकल्यावाचून राहत नाही. उच्चशिक्षित असणे, नोकरी करणे, पाहिजे ते कपडे घालण्याची मुभा असणे म्हणजे 'स्री स्वातंत्र्य' आहे का? हे सगळे त्या ध्येयाचा एक भाग किंवा एक टप्पा जरूर आहेत; पण आपण त्याच्या पलीकडे पाऊल कधी टाकणार? 

एका मराठी वाहिनीवर एका महिला लोकप्रतिनिधीची मुलाखत चालू होती. बोलताना विषय निघाला स्त्री आरक्षणाचा! निवडणुकांच्या रिंगणांत महिला उमेदवार बहुतेकवेळा नाममात्रच असतात, ही सत्य परिस्थिती त्यांनी मांडली; पण त्याच बरोबर 'काही उमेदवार महिला असूनसुद्धा चांगले काम करतात' अशी स्तुती केली. एका स्त्रीने आणि तेदेखील एका लोकप्रतिनिधीने केलेले हे विधान झाले एक प्रासंगिक उदाहरण. पण आपण जर आपल्या आजुबाजूला पाहिले, तर हा दृष्टिकोन आपल्याला सर्वत्र दिसेल. आई-वडील मुलींना हौसेने शिकवितात; पण इतक्‍या उच्चशिक्षित मुलींनादेखील लग्नाच्या बाजारात अजूनही 'मी लग्न झाल्यावरही काम करणार' अशी परवानगीवजा पूर्वकल्पना द्यावी लागते. तिच्या आयुष्यातील निर्णय- छोटे वा मोठे- तिला घेण्याचे स्वातंत्र्य आणि ते निर्णय घेण्यासाठी लागणारे पाठबळ आपण तिला देतो का? आजही आपल्या आजूबाजूला कित्येक बायका किंबहुना आपणदेखील अगदी रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी, समस्यांसाठी आपल्या नवऱ्यावर, वडिलांवर किंवा भावावर अवलंबून आहोत. अशा छोट्या प्रश्‍नांपासून ते मातृत्वाच्या निर्णयापर्यंत कित्येक निर्णय घेण्याची क्षमता महिलांमध्ये नक्कीच असते; पण त्यांची जडणघडण तशी झालेली नसते, असे मला वाटते. 

मुला-मुलींमध्ये भेद करू नये, असे म्हणत आपण नकळत त्यांच्यात कित्येक भेद करत असतो. वयाच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापासून गुलाबी रंग मुलीचा आणि निळा रंग मुलाचा, भातुकली हा मुलीचा खेळ आणि गाड्या हा मुलाचा खेळ अशी शिकवण आपणच त्यांना देतो. थोडी मोठी झाल्यानंतर आपण नकळत मुलीला स्वयंपाक शिकवतो, घरातली छोटी छोटी कामं सांगतो. पण मुलांना मात्र यापासून अलिप्तच ठेवतो. तेव्हा या गोष्टी अतिशय क्षुल्लक वाटतात; पण कोवळ्या वयात हा भेदभाव मनावर कोरला गेला, की मोठे झाल्यावर 'ती मुलगी असूनही नोकरी करते' आणि 'तो मुलगा असूनही स्वयंपाक करतो' असा विचार मनात येणे स्वाभाविक नाही का? 

मी आमच्या घरातील एकुलती एक मुलगी! भेदभावाचा प्रश्‍नच आला नाही. मला जे काही करायचे होते, ते सगळे करायला माझ्या पालकांचा मला पूर्ण पाठिंबा होता. पण प्रत्येक वेळी मी पुढचे पाऊल टाकत असताना माझ्या पालकांना कित्येक प्रश्‍न विचारले गेले. त्यापैकी एक उदाहरण मला खूप सुन्न करून जाते. 

मी काही महिने फ्रान्समध्ये नोकरी करत होते. फ्रान्सला जाण्याआधी अगदी तरुण म्हणवणाऱ्या तिशीतील लोकांनीदेखील 'तुम्ही तुमच्या मुलीला एकटीला फ्रान्सला पाठवत आहात का?' असा आश्‍चर्याने ओतप्रोत भरलेला प्रश्‍न माझ्या आई-बाबांना विचारला. परत आल्यापासून तर माझ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्या कौतुकाचा मला नक्कीच अभिमान आहे; पण 'तु मुलगी असूनही तिथे व्यवस्थित राहून परत आलीस' या वाक्‍याने किंवा या गर्भितार्थाने मन मात्र खट्टू होतं. त्यावर मी एकदा उत्तर दिलं, 'त्यात काय विशेष? दादा (माझा चुलत भाऊ) नाही का जाऊन आला?'. त्यावर 'त्याचं वेगळं गं.. तो मुलगा आहे' असं उत्तरही मला मिळालं. 

पूर्वीपेक्षा आजचं चित्र नि:संशय सुखावह आहे; पण आपण एका पायरीवर अडकून पडलो आहोत, असे मला वाटते. तिथून पुढे पाऊल टाकणे आता महत्त्वाचे आहे. ते पाऊल फक्त महिलांनीच टाकण्याऐवजी सगळ्या समाजाने एकत्र टाकायला हवे. स्त्री आणि पुरुष यांच्यातील नैसर्गिक फरक समजावून सांगण्याऐवजी आपण त्या फरकांची लक्षणे सांगण्यात जास्त गढून गेलो आहोत. विख्यात फ्रेंच लेखिका आणि स्त्रीवादी चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या सिमोन द बोवूआर म्हणतात त्याप्रमाणे, 'आपण स्त्री म्हणून जन्माला येत नाही. आपण जन्मल्यावर स्त्री बनतो!' आपला समाज सर्वांना माणूस बनविण्यापेक्षा स्त्री व पुरुष बनविण्याच्या जास्त मागे लागला आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने आजच्या घडीला सर्वांत पहिली गरज आहे, ती आपले आचार-विचार महिला सबलीकरणाच्या, महिला सक्षमीकरणाच्या निर्धारित चौकटीतून बाहेर काढण्याची. कारण मुळात जी नैसर्गिकदृष्ट्या सबला होती, अबला कधीच नव्हती- जिला आपण अबला केले- तिला आता पुन्हा सबला करण्यात आपण गुंतलेलो आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com