चांद के पार चलो...

हेमंत जुवेकर
गुरुवार, 4 जानेवारी 2018

सुपरमून ही तांत्रिक टर्म तसंच काहीतरी सांगते की... चंद्र (अनावर आकर्षणामुळे) पुथ्वीच्या कधी कधी जवळ येतो नी त्यामुळे मोठा दिसतो. पण तो पुन्हा दूर जाणारच असतो.

सूपरमुनमुळे चंद्र आजपासून अंमळ मोठा दिसणाराय. यानिमित्ताने सहज म्हणून सिनेमातली चंद्राची गाणी आठवायला बसलो तर गुलजारचं "मोरा गोरा रंग लई ले, मुझे शाम रंग देई दे' आठवलं. खरंतर या गाण्याच्या मुखड्यात चंद्र नाही. अंतऱ्यात आहे. पण या गाण्याबरोबर आठवला तो नुतन नाही साधनाचा चंद्रासारखा मुखडा. तो ही "ओ सजना, बरखा बहार आयी' या गाण्यातला... पण ते गाणं आहे पावसाचं आणि विषय होता चंद्राच्या गाण्याचा... मुखचंद्रम्याचा नाही! 

पण परखं सिनेमातलं "ओ सजना बरखा बहार आयी' गाणं अनेकांना त्याच्या चित्रिकरणासाठीही आठवतं. आहेच ते तसं. त्या काळच्या चित्रपटाच्या मर्यांदा ओलांडून त्यातला पाऊस पहाणाऱ्यांच्या मनात रुणझुणतो. सिनेमाचं हेच तर आहे. भावलेल्या सिनेमातली दृष्य नजरेतून थेट मनात वस्तीला येतात. त्यामुळेच "परख'मधल्या त्या पावसाच्या गाण्यातला ब्लॅक-व्हाईट पाऊसही रंगीत आठवणी जागवतो, आणि अशा सिनेमाच्या गाण्यातून भेटणारा चंद्रही. धवलशुभ्र असला तरी तोही असेच रंगीत क्षण सजवतो! 

तर, सांगत होतो त्या गुलजारच्या "मोरा गोरा रंग लईले' या सुंदर गाण्याबद्दल. त्यात रात्रीचा उल्लेख आहे आणि चंद्राचाही. त्यात ती विरहिणी म्हणते, 
"बदली हटाके चंदा, 
चुपकेसे झाके चंदा, 
तोहे राहू लागे बैरी 
मुस्काए जी जलाईके...' 

गुलजार यांचं हे पहिलंच गाणं. बंदिनीतली बाकी सगळी गाणी शैलैद्रसारख्या दिग्गजाने लिहिलीत. हेच गाणं त्यावेळच्या तरुण गुलजारला मिळालं. पण इतकी सुंदर हिंदी वापरलीय गुलजारने ना, की त्या विरहणीची अवस्था... "इक लाज रोके पैया, इक मोह खिचे बैया' अशा शब्दांतून परफेक्‍ट व्यक्त होते. बहुधा त्यामुळेच हेच गाणं फायनल झालं असणार... या गाण्यात चंद्राचा उल्लेख एकाच ठिकाणी असला तरी गाण्याच्या चित्रिकरणात साक्षीला असलेला चंद्र जाणवत रहातो. 

मराठीत "चंद्र आहे साक्षीला' याच नावाच्या सिनेमात हेच शब्द साक्षीला असलेलं गाणं मराठी गाण्याच्या मैफलीत पुर्वी हमखास वाजवलं जाई. "लाजरा बावरा हा मुखाचा चंद्रमा' असा मुखचंद्रम्याचा उल्लेख चंद्राला साक्षीला ठेवणाऱ्या खेबुडकरांनी त्यात केला आहेच. 

सिनेमातली गाणी म्हणली की अशी तिच्या चेहऱ्याची चंद्राची उपमा मिळणं किंवा "दम भर जो उधर मुह फेरे, ओ चंदा, मै उनसे प्यार कर लुंगी'(आवारा) अशी नाजुक विनंती चंद्राला करण्याचेच प्रकार जास्त दिसतात. "हम किसेसे कम नही' मध्ये मात्र नायक नायिकेला सांगतो की (तू नव्हे) माझं ह्रदयच चंद्र आहे... "चांद मेरा दिल, चांदनी हो तुम, चांदसे है दूर चांदनी कहॉं'. 

"ये चांदसा रोशन चेहरा' हे (काश्‍मीर की कली) टाळ्यांच्या ठेक्‍यात वाजणारं नाचरं गाणं पिकनिकमध्ये गायलं जातंच, पण अशी चंद्राची हसरी गाणी कमीच. "वो चांद खिला ये तारे हसे' सांगणाऱ्या तिच्या मनातलं त्याला कळलं नाही तर "ना समझे वो अनाडी है' असा कृतक कोपही कधी चंद्राच्या साक्षीने व्यक्त होतो. कधी एखादी विरहणी आळवते "चांद फिर निकला, मगर तुम न आये (पेईंग गेस्ट), लाखो मे एक नावाच्या सिनेमातही चंद्राचं एकटेपण दाटून येतं. "चंदा ओ चंदा, किसने चुरायी, तेरी मेरी निंदिया' अशी सुरुवात असलेलं हे गाणं "तेरी और मेरी एक कहानी, हम दोनो की कदर, किसीने न जानी, साथ ये अंधेरा, जैसे मेरा, वैसे तेरा' असं भावनिक होत जातं. 

पण काही वर्षापुर्वी आलेल्या काजोलच्या "सपने' नावाच्या सिनेमातलं "चंदा रे चंदा रे कभी तो जमी पे आ... बैठेंगे बाते करेंगे' हे गाणं चंद्राला चक्क गप्पा मारायलाच बोलावतं. हा जो सपने नावाचा सिनेमा होता ना तो म्हणजे डोळ्याला आणि कानांना ट्रिट होती. रहेमानचं संगीत वेगळंच होतं आणि त्याचं पिक्‍चरायझेशन सुंदरच होतं. मग ते "आवारॉं भॅंवरे' असो की हे "चंदा रे'. 

या "चंदा रे' गाण्यात डान्सिंग स्टार प्रभुदेवा आणि काजोल यांना एकमेकांविषयी वाटणारं आकर्षण आणि त्यातून आलेलं अवघडलेपण काय सुंदर व्यक्त होतं. कितीही जवळ आले तरी चंद्र आणि पुथ्वीमधलं कायम राहणारं अंतर कायम राहणारच आहे हेही त्यातून जाणवतं. 

सुपरमून ही तांत्रिक टर्म तसंच काहीतरी सांगते की... चंद्र (अनावर आकर्षणामुळे) पुथ्वीच्या कधी कधी जवळ येतो नी त्यामुळे मोठा दिसतो. पण तो पुन्हा दूर जाणारच असतो. 

पण शायर-दिलवाल्यांसाठी चंद्र कधी दूर नसतोच. त्यांच्या मनात वस्तीला आलेला चंद्र कायमच "चौदहवी'चा असतो. त्यातून "कभी तो जमी पे आ' ही विनंती ऐकूनच चंद्र यदाकदाचित पुथ्वीवर उतरलाच तरी ते म्हणतील "चलो दिलदार चलो, चांद के पार चलो...' 
आणि तेच खर्रखुर्र सत्य हो... 

कारण, सूपरमुनच्या पूर्णचंद्र दर्शनाचा आनंद या साऱ्या कविकल्पनांच्या मदतीने घेता येतोच... पण कधी त्याच्या पार जाऊनही तो मिळवता यायला हवा!​

इतर ब्लॉग्स