Sahitya Sammelan 2023 : मी अनुभवलेले साहित्य संमेलन, अन्...

मराठी भाषा आणि साहित्य याव्यतिरिक्त इतर विषयांवर वक्तव्य अमराठी वाचकांसाठीसुद्धा त्यांचे मत महत्त्वाचे ठरायचे.
Sahitya Sammelan 2023
Sahitya Sammelan 2023esakal

खरे तर आतापर्यंत मी एकाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास पूर्णवेळ हजेरी लावलेली नाही. इंग्रजी दैनिकाचा बातमीदार म्हणून गोव्यात आणि नंतर पुण्यात मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन किंवा समारोपाचे भाषण कव्हर करण्यासाठी मी हजर राहिलो, ते केवळ बातमी करण्यासाठी.

विशेष म्हणजे तत्कालिन उद्घाटक किंवा मुख्य पाहुण्यांनी आम्हा वार्ताहरांना कधीही निराश केले नाही. मराठी भाषा आणि साहित्य याव्यतिरिक्त इतर विषयांवर त्यांनी वक्तव्य केल्यामुळे आमच्या वृत्तपत्राच्या अमराठी वाचकांसाठीसुद्धा त्यांचे मत महत्त्वाचे ठरायचे.

कोकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन म्हणून ‘स्वामी’कार रणजित देसाई यांचे भाषण माझ्यासाठी असेच विस्मरणीय ठरले. दक्षिण गोव्यातल्या या संमेलनाचे उद्घाटन तत्कालिन केंद्रीय मंत्री मार्गारेट अल्वा यांनी केले होते. त्यांचे कानडी ढंगाचे कोकणी समजून घेताना आम्हा बातमीदारांची त्रेधातिरपीट झाली होती.

Sahitya Sammelan 2023
Sahitya Sammelan 2023 : भर साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाणांसमोर केला होता आणीबाणीचा विरोध

मात्र काही साहित्य संमेलनांना थेट हजर नसतानाही ती स्मरणात राहिली आहेत. ही संमेलने झाली, त्या वेळी म्हणजे सत्तरच्या दशकात मी शालेय विद्यार्थी होतो. तरीसुद्धा त्या संमेलनाआधी, दरम्यान आणि नंतर झालेले कवित्व, वाद आणि घडामोडी आजही आठवतात.

त्यातील पहिले म्हणजे इचलकरंजीत पु.ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले आणि त्यापाठोपाठ लगेच कराड येथे दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली ऐन आणीबाणीच्या काळात झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

Sahitya Sammelan 2023
Sahitya Sammelan 2023 : मराठी साहित्य संमेलनाचा मराठीला फायदा काय?

पुल देशपांडे यांची पुस्तके आणि त्यांच्याविषयीचे साहित्य मी प्रथम वाचायला सुरुवात केली ते इचलकरंजी येथील १९७४ सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजायला लागले तेव्हा. ते पन्नासावे मराठी साहित्य संमेलन होते आणि पु. ल. देशपांडे स्वतः संमेलनाध्यक्ष होते.

वृत्तपत्रे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्यानंतर पुल हे सर्वांत पहिलेच सेलेब्रिटी संमेलनाध्यक्ष असावेत. पुल त्यावेळी आपल्या साहित्यिक कारकिर्दीच्या आणि लोकप्रियतेच्या अगदी शिखरावर होते. त्यावेळचे ते महाराष्ट्रातील सर्वांत लोकप्रिय साहित्यिक आणि लाडके व्यक्तिमत्त्व होते.

त्यावेळी श्रीरामपूरला मी नववीला होतो. या काळात संमेलनाआधी पुलंविषयी आणि त्या संमेलनाविषयी सर्वच मराठी वृत्तपत्रात कितीतरी दिवस रकानेच्या रकाने मजकूर छापून येत होता आणि आम्ही वाचक ते सर्व अधाशासारखे वाचत होतो.

इचलकरंजीचे संमेलन पन्नासावे (१९७४) असल्याने साहित्यविश्वात खूप उत्साह होता. या काळात मी शाळेत शिकत असलो तरी वृत्तपत्रे वाचायला सुरुवात केली होती. तो जमाना वृत्तपत्रे आणि नियतकालिकांचा ‘सुवर्ण काळ’ होता, असे म्हटले तरी चालेल. याचे कारण म्हणजे त्या वेळी साक्षर झालेल्या लोकांची पहिली किंवा दुसरी पिढी दैनिके, विविध नियतकालिके आणि मासिके भरपूर, अगदी पुरवून पुरवून वाचत असे. या दैनिकांसाठी आणि इतर नियकालिकांसाठी ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ म्हणजे मोठी पर्वणीच होती.

मला वाटते, पुलंच्या अध्यक्षतेखाली भरलेले इचलकरंजीचे साहित्य संमेलन पहिलेच मोठे गाजलेले संमेलन. ते होण्यापूर्वी कितीतरी दिवस आधी नियकालिकांची पानेच्या पाने व रकाने त्याविषयीच्या मजकुराने भरत होती. संमेलनाध्यक्षांचे संपूर्ण भाषण पान एकवरून आतल्या पानावर आणि उद्घाटकांच्या भाषणाचा वृत्तान्त पान एकवरची पहिली बातमी म्हणजे लीड न्यूज होती. त्याशिवाय दैनिकांची इतर सर्व पाने संमेलनाविषयीच्या बातम्यांनी भरलेली होती.

मात्र त्यानंतरच्या वर्षी कराड येथे झालेले मराठी साहित्य संमेलन त्याहूनही अधिक गाजले, वादग्रस्त ठरले आणि ऐतिहासिकही ठरले. आजवरच्या इतिहासात हे सर्वात अधिक गाजलेले मराठी साहित्य संमेलन ठरले. त्याचे कारण म्हणजे हे संमेलन आणीबाणीच्या काळात म्हणजे १९७५ साली भरत होते कराडचे ५१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (१९७५) भरण्याआधी त्याभोवती वादाचे ढग जमायला सुरुवात झाली होती. संमेलनाध्यक्षा होत्या विदुषी दुर्गा भागवत. मावळते अध्यक्ष म्हणून नव्या संमेलनाध्यक्षांकडे सूत्रे सोपविण्यासाठी पुलंदेखील संमेलनाच्या व्यासपीठावर असणार होते. या निमित्ताने दोन ज्येष्ठ, दिग्गज साहित्यिक एकाच व्यासपीठावर असणार होते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि यजमान होते कराडचे सुपुत्र व तत्कालिन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण.

राजकारणी लोकांनी मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असू नये अशा त्यावेळच्या मागणीमुळे स्वतः साहित्यिकही असलेले यशवंतराव संमेलनात श्रोत्यांमध्ये बसले होते.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे संमेलन होत होते, त्या वेळचा काळ आणि परिस्थिती. हा काळ होता पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशभर लादलेल्या आणीबाणीचा. देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे बहुतेक नेते तुरुंगात होते. प्रसारमाध्यमांवर ‘सेन्सॉरशिप’ होती.

तरी या संमेलनातल्या सर्व बातम्या वाचकांपर्यंत पोहोचत होत्या. मावळते संमेलनाध्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी संमेलनाध्यक्षा दुर्गा भागवत यांच्याकडे सूत्रे सोपवताना केलेल्या भाषणाच्या वृत्तांताने वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले होते. “खूप वापर झाला तर मेलेल्या कातडीपासून बनवलेले वहाणसुद्धा कुरकुरायला लागते,” अशा आशयाचे या संमेलनात पुलंनी म्हटलेले आणि दैनिकांत वाचलेले एक वाक्य मला अजून आठवते.

त्याकाळात आजारी असलेल्या जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीस आराम मिळावा म्हणून काही वेळ उभे राहण्याची सूचना करून त्यावेळी दुर्गाबाईंनी भर सभेत बॉम्बगोळाच टाकला होता. त्यावेळी दुर्गाबाईंंच्या सूचनेस मान देऊन यशवंतरावांना उभे राहणे भाग पडले होते. त्यानंतर दुर्गाबाईंना झालेली अटक आणि पुलंनी आणीबाणीस जाहीर सभांमधून केलेला विरोध वगैर घटनाक्रम हा तर इतिहासच आहे.

मला आठवते इचलकरंजी आणि कराड या दोन्हीही शहरांतील संमेलनांच्या अध्यक्षांची आणि प्रमुख्य पाहुण्यांची भाषणे वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर पहिली बातमी म्हणून वापरली होती.

हे संमेलन अनेक कारणांनी आणि अर्थांनी आतापर्यंतचे सर्वांत गाजलेले आणि ऐतिहासिक म्हणता येईल. ते पार पडल्यानंतरसुद्धा त्याचे कवित्व लगेच संपले नाही.

संमेलनानंतर काही दिवसांनी दुर्गाबाईंना अटक झाली आणि आणीबाणी शिथिल झाल्यावरच त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्यानंतर जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पु.ल. देशपांडे आणि दुर्गाबाई भागवत हे सत्तारूढ काँग्रेस पक्षाच्या विरोधात हिरिरीने उतरले आणि निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाल्यावर दोघेही पडद्याआड झाले.

इचलकरंजी आणि कराड इथल्या संमेलनांना केवळ काही हजार साहित्य रसिक मंडळी आली असणार. मात्र वृत्तपत्रांच्या विस्तृत वार्तांकनांमुळे, लक्षवेधी क्षणचित्रांमुळे आणि फोटोंमुळे तेथे प्रत्यक्ष उपस्थित नसलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्यासारख्या लाखो वाचकांनी ती दोन्ही संमेलने अनुभवली असणार.

ही दोन्ही संमेलने प्रत्यक्ष संमेलनस्थळी न जाताही अशा प्रकारे वृत्तपत्रांच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले. योगायोगाने केवळ एका वर्षांतच जेसुईट ख्रिस्ती धर्मगुरू होण्यासाठी मला कराडलाच जावे लागले. तिथे टिळक हायस्कूलात अकरावीचे शिक्षण घेताना नुकत्याच पार पडलेल्या संमेलनाची आठवण येणे साहजिकच होते. त्या वेळी आणीबाणीही चालूच होती.

१८७८ साली पुण्यात मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन पार पडले. महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांत मुहूर्तमेढ उभारणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडे या संमेलनाचा शुभारंभ करण्याचा मान जातो. नंतरच्या काळात ग्रंथकारांचे संमेलन ‘साहित्य संमेलन’ झाले. त्यानंतर ते ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ झाले. कालांतराने विद्रोही, विचारवेध, ग्रामीण, दलित, मुस्लीम, नास्तिक अशी विचारनिहाय आणि कोकण, मराठवाडा अशी प्रदेशनिहाय संमेलने सुरू झाली.

मराठी साहित्य संमेलनापासून पहिल्यांदा वेगळी चूल मांडण्याचे धाडस ‘ख्रिस्ती साहित्य संमेलना’ने शंभरेक वर्षांपूर्वीच केले होते, हे मात्र अनेकांना माहीतही नसेल.

पहिले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन १८-१९ एप्रिल १९२७ रोजी नाशिकमध्ये शरणपुरातल्या चर्च मिशनरी सोसायटीच्या मराठी शाळेत पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष होते- रेव्हरंड निकल मॅक्लिकल. या महाराष्ट्रीय ख्रिस्ती लोकांच्या पहिल्या साहित्य संमेलनाला १५० लोक हजर होते.

मालवणला १९९४ साली झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाला एक ख्रिस्ती आणि वाचक म्हणून मी हजर होतो. संमेलनाध्यक्ष होते कवी निरंजन उजगरे, तर तत्कालिन शिवसेना नेते नारायण राणे प्रमुख पाहुणे. संपादक नारायण आठवले मुख्य पाहुणे होते. संमेलनाध्यक्ष निरंजन उजगरे होते.

विशेष म्हणजे अखिल भारतीय साहित्त्य संमेलनांप्रमाणे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे आणि मराठी दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनांचेसुद्धा दस्तऐवजीकरण झालेले आहे. या दोन्ही प्रवाहांच्या संमेलनाध्यक्षांची भाषणे संकलित करण्याचे आणि त्यावर समीक्षणात्मक टीकाटिपण्णी करण्याचे महत्त्वाचे काम सुनील श्यामसुंदर आढाव यांनी केले आहे. ‘धर्म ख्रिस्ताचा, विचार साहित्याचा! - शतकातील ख्रिस्त संमेलनाध्यक्षीय भाषणे व त्यावरील समीक्षा’ या शीर्षकाचा ४१० पानांचा जाडजूड ग्रंथ आढाव यांनी पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यादृष्टीने हा ग्रंथ केवळ एकंदर मराठी साहित्यक्षेत्रासाठीही एक मौलिक ऐवज ठरतो.  

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आणि मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने यांच्यात काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. मराठी साहित्यात महिलांचे योगदान फार पूर्वीपासून आहे. स्त्रीसाहित्याची मोठी परंपरा आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आणि आता शंभरीच्या जवळ आलेल्या मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष होण्याचा मान मात्र एका हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच स्त्रियांना मिळाला आहे. याउलट केवळ ३५ संख्येच्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या मात्र आतापर्यंत सहा स्त्रिया संमेलनाध्यक्षा झालेल्या आहेत. त्यापैकी पाच मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष होत्या आणि एक दलित ख्रिस्ती साहित्य संमेलनाध्यक्ष.

आणिबाणी पर्वातले कराडचे ते संमेलन केवळ मराठीच नाही तर सर्व भारतीयांनी सदा स्मरणात ठेवावे असे आहे. आणीबाणीच्या काळात हे संमेलन होत होते, तरीसुद्धा ‘सर्व काही अलबेल आहे’ असे मानणारे आणि सांगणारे बहुसंख्य लोक होते.

सध्याच्या विविध क्षेत्रांतील अनेक अर्थांनी भरकटलेल्या परिस्थितीत तर कराडचे ते संमेलन एखाद्या दीपगृहासारखे दिशा दाखवणारे झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com