याद रहेगा ..याद रहेगा...!!

photo
photo

संजूभाऊ...संजय उबाळे..  बुध्दप्रिय कबीर...कॉम्रेड... असा त्याचा प्रवास. दमदार भारदस्त आवाजाचा धनी, कधीही उदास न दिसलेला.. उत्साहानं ओतप्रोत भरलेला, व्यवस्थेविरूद्ध लढण्याची जिगर ,काळजात अन्यायाविरूध्द अंगार ,शोषणाविरूद्ध एल्गार पुकारलेला, अंतर्यामी अमृता इमरोजचं सुफियाना जगणं हळवेपणानं नोंदवून एक रोमॅटिसीझम जपणारा, जगणारा, बेदकरार वाटणारा पण टोकाचा कोमल, हळवा, मायाळू, कवी मनाचा, संगीत, वाचनवेड असलेला, व्यासंगी, प्रचंड ग्रंथसंपदा असलेला, कलासक्त आंबेडकरी अस्वस्थ "अॅग्री यंग मॅन "म्हणजे संजय उबाळे .. My Borther....
आमच्याकडे लेकीबाळींला मायेनं " बाई" असं संबोधतात. मला अशा मायेनं ओथंबलेल्या स्वरात अकृत्रिमतेनं "बाई " अशी हाक मारणारे तीनंच लोक, ते म्हणजे माझी आई (ताई), दादा (वडील) अन् संजय उबाळे.. कुठंही दिसला, भेटला की " बाई ,जयभीम ...! अशी जयभीमची ललकारी तो देत असे. 
मी एम. ए. ला मी विद्यापीठात आंबेडकर असोसिएशनकडून C R म्हणून निवडून आले होते. एन एस यु आय आणि आंबेडकर असोसिएशन अशी 'टस्सल' होती. संघटनेच्या निमीत्तानं मी विद्यापीठ विद्यार्थी चळवळीचा भाग बनले, एकदृष्टीनं माझ्या विद्यापीठीय राजकारणाशी जोडल्या जाण्याशी त्याचा आग्रह कारणीभूत आहे. 
तेव्हापासून तो आमचा संजूभाऊ होता.
त्यावेळी तो ट्रॅक सूट घालून पहाटे- पहाटे धावायला जाई, स्विमींगचं त्याला वेड होतं. तो हेल्थ कॉन्शस होता. माझ्या सर्व बहीणींच्या लग्नाला तो आवर्जून हजर होता. ताई दादाशी त्याचं मायेचं नातं होतं. एकाटप्प्याला विद्यार्थी चळवळीचा फोलपणा जाणवला तो काहीसा फ्रस्टेटेड झाला होता. मग जगनभाऊ कांबळेच्या सोबत तो रामविलास पासवान सोबत जोडला गेला, तो बोलायचाही खूप. तिथेही तो रमला नाही. त्यादरम्यान त्याचे जे मतभेद होते, त्याविषयी तो खूप पोटतिडकीनं रात्ररात्र चर्चा करीत असे, एक गोष्ट तो पुन्हा पुन्हा समाधान होईपर्यंत लिहीत राही. ललित बाबरला लिहीलेल्या पत्रांचा खर्डा तो कित्येकदा आम्हाला वाचून दाखवी, चर्चा करी तो खूप अस्वस्थ असे. राजानंदशी तर त्याच्या खूप दिर्घ गप्पा होत. त्यादरम्यान आम्ही  सोबत अनेक उपक्रम राबवले. त्यानं ढोर, भंगी, चांभार समाजात बाबासाहेब रूजवण्यासाठी वेगवेगळे मेळावे आयोजित केले. मला तो तिथं वक्ता म्हणून बोलावत असे. त्याला समाजकार्याची भूक होती. आम्ही कन्नडला आल्यानंतर  जेव्हा पहिल्यांदा जयभीम दिन साजरा केला. त्या कार्यक्रमाला त्याच्यासोबत जगनभाऊ कांबळे, रमेश गायकवाड अन् औरंगाबादची दिग्गज आंबेडकरी चळवळीतील मंडळी उपस्थित होती. मकरणपूर गावच्या वेशीमधेच कार्यक्रम लावला होता. खाटांचंच स्टेज बोललेलं होत, श्रोत्यापेक्षा वक्तेच जास्त झाले अन् स्टेज तुटून गेलं. आम्ही त्याच दरम्यान पितळखोरा लैणीवरही धम्मचक्रप्रवर्तनदिन सुरू केला. तिथ  डॉ. यशवंत मनोहर, बापूराव जगताप, हरी नरके याची व्याख्यान लावली. राजानंदनी हातात मशाल घेऊन चालणारा बुध्द रेखाटला तेंव्हा वादंग माजलं तेव्हाही तो आमच्यासोबतच होता. माझ्या कवीतासंग्रहाच्या प्रकाशनाला फुलनदेवीला आणण्याची व्यवस्था त्यानं केली होती, कारण तो फुलनदेवीलाच अर्पण केला आहे. पण त्या येऊ शकल्या नाहीत. तो त्याचा उमेदीचा काळ होता. खूप आनंदी असे, कंटाळा आला की गाडी काढे, एखाद्या मित्राला सोबत घेई अन् कन्नडला निघे. कधी कधी पहाटे आम्ही कन्नडला येताना त्याला भेटायला जयभीमनगरला जात असू. चल कन्नडला म्हटलं की लगेच तयार होऊन निघत असे. घाटातून वळण घेत घेत अमिताभ स्टाईल गाडी चालवताना 
 "याद रहेगा याद रहेगा,
वो प्यार का रंगीन जमाना याद रहेगा " 
हे गाणं प्रसन्नपणे म्हणत असे. मग आमच्यासोबत गौताळा भटकंती. तो मस्तमौला खुश असे. तो नार्सीसस होता, स्वतःच्या पर्सनॅलीटीवर तो जाम खुश असे. त्यानं राजानंदकडून एक स्केच करून घेतलं होतं, त्या स्केचच्या तो खूप प्रेमात होता, आल्यागेल्याला ते दाखवतो असे, एक सुगरणीचा खोपासुद्धा त्यानं रेखाटून घेतला होता. आमच्या सहजीवनाचं त्याला खूप अप्रूप होतं असं जगणं पाहिजे हे तो नेहमी बोलून दाखवे."अमृता इमरोज "ही त्याच्या जगण्याशी संवादी जाणारी एक हळवी, दुखरी जागा होती नक्कीच. तो इमरोज़ बनला होता, कदाचित पण त्याच्या सखीला अमृता बनता असं नसावं किंवा कुणास ठाऊक काय ? पण  त्याची एक अधुरी कहानी काळजात निग्रहीपणे जपत तो एकटाच जगत राहिला..मरत राहिला..! 
एकदा असाच उन्हाळ्याच्या दरम्यान निघून आला कन्नडला, महिना दिड महिना राहिला. गप्पा मारीत असे पण काहीतरी बिनसलंय हे आमच्या ध्यानात आलं होतं पण आम्ही ते काही कधीच जाणवू दिलं नाही. कधी अचानक कुठून प्रवासातून आला की 'बाई, भूक लागली, जेवण दे बरं !'असं हक्कांनं सांगे. बाई आपली जेवणाची वेळ झाली, चित्रकार, आणा लवकर. अशी त्याची ऑर्डर असे. चळवळ कशी चालेल?  गाडीच्या इंधनाचं काय? असं हसत मिश्किलपणे हक्कांनं म्हणायचा, खरंतर त्याचा तो हक्कच होता. तो सच्चा कार्यकर्ता असल्यानं नंतर तर जनतेनंच आंदोलनासाठी त्याला गाडी अन् पेट्रोल साठी ही निधी गोळा करून दिला. जिथं कुठं दलितांवर अन्याय झाला तिथं तो खमकेपणानं  शेवटपर्यंत लढत असे. आमच्याकडे आलेल्या केलेस आम्ही त्याच्याकडे पाठवीत असू. मितवा (आमचा मुलगा) च्या पहील्या वाढदिवसाला आम्ही वामनदादाची गाणी कार्यक्रम ठेवले होता. ह्यानं त्या रात्री त्याच्याकडले (कदाचीत) सगळेच पैसे त्यांना ओवाळणी त संपवून  टाकले,"अपने भांजे का बर्थडे है "म्हणाला.आईची षष्ट्यब्दीपूर्ती होती. बरोबर पोहोचलाच. वामनदादाचीच गाणी होती, बंधू रं, शिपाया या गाण्यावर आईच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडला. एकही कार्यक्रम त्यानं कधीच चुकवला नाही, तो कुठंही असला तरी उगवायचाच धूमकेतूसारखा.. तो मायाळू होता.
त्याची आजी त्याच्यावर खूप माया करी.ती बरेचदा मला म्हणे  'बाई, त्याला समजावून सांग लग्न कर म्हणून' आम्ही अखेरपर्यंत प्रयत्न करत राहीलो. पण त्याच्या स्वप्नातल्या अमृतासोबत त्याला खोपा नाही करता आला. खरंतर आंबेडकरी चळवळीतील वाढती पोटार्थी वृती पाहून तो उबगला, उदास, निराश झाला. राजानंदशी चर्चेनंतरच त्यानं डाव्या चळवळीत काम करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू त्याचं आमच्याकडे येणं कमी होत गेलं. मग तो बिझी झाला. आम्ही धावपळीतच.अधून मधून धावत्या भेटी होत. दिर्घ काळानंतर एकदा धूमकेतूसारखा उगवला, पुन्हा नव्यानं स्केच करून घेतलं, केस विरळ झालेले, थकलेला. विझत चालल्यासारखा. खोप्याच्याच नव्या स्केचचा आग्रह त्यानं धरला. आम्ही त्याला खोपा बांधण्याचा आग्रह केला पण त्याचा निग्रह कायम होता. या दुनियेत त्याची अमृता भेटत नसल्याचं विषण्ण पणे हसत म्हणाला.
अचानक काही दिवसापूर्वी तो अॅडमीट असल्याचं कळावं. MGM मधे होता, बेडवर एक हाडाचा सापळा, अंगावर मांस नाही, डोळे  लागलेले होते. त्याची ती अवस्था पाहून डोळे पाझरायला लागले. त्याला चाहूल लागली मला पाहून हातानीच खुणावून रडू नकोस म्हणाला. त्याला बोलता येत नव्हतं. अन्न नलीकेचा कॅन्सर होता, वहीवर लिहून "मी आजारी आहे, हे ताईदादांना कळवू नका" म्हणाला. ट्रिटमेंट कशी सुरू आहे ते डिटेल सांगीतलं. आम्ही ताईदादांना कळवलं दोघांना घेऊन गेलो तेव्हा त्याला कॅन्सर हॉस्पीटलला हलवलं होतं, त्या दोघांच्याही  कुशीत शिरून लहान मुलासारखा रडला. मग केमोथेरपी, ऑपरेशन...पण त्यातून बरा झाला होता. एकदा गेलो तर म्हणाला,'चित्रकार, मला मंकी कॅप आणा, पण निळी अन् लाल अशा दोन्ही रंगाची पाहिजे. तशी शोधून आणून दिली. मोर्चा आंदोलनात, रस्त्यावर, गर्दीत तो एरव्हीही नजरेत भरायचा, साडे सहा फूट उंचीचा देह..पण डाव्या चळवळीत गेला तेव्हापासून त्यानं या दोन्ही प्रवाहांना एकत्र बांधण्याचा सांधण्याचा  ध्यासच घेतला होता. तो लाल आणी निळा असलेला झेंडाच काय पण झब्बा सुद्धा घालू लागला होता. तो स्वतःच निळ्या नभातील लाल तारा बनला होता. तो बनला होता मूर्तीमंत प्रतीक "जयभीम  -लाल सलाम" त्याच्या या झेंडा अन झब्ब्यामुळे तो लक्षणीय ठरला होता. 
असा मला जीव लावणारा, सतत सोबत करणारा, मायेनं "बाई "म्हणून साद घालणारा, माझा कोणताही कौटुबीक कार्यक्रम न चुकवणारा, नोकरीच्या अडचणीत उभा राहणारा, भूक लागलीय, बाई जेवायला काय आहे विचारणारा. चित्रकार म्हणून राजानंदला कौतुकानं मिठी मारणारा असा माझा भाऊ आज या जगातून निघून गेला.
कडक आवाजातला जयभीम आता कानावर पडणार नाही. तो हसण्याचा आवाज येणार नाही. शहरातले सारे मोर्चे- आंदोलन आता सुनेसुने वाटतील, यामध्ये आपल्याही उंचीपेक्षा आभारभर फडफडणारा निळा अन् लाल रंगाचा झेंडा घेऊन कोण उभं राहील ?
भावा ,
अरे ही काय वेळ आहे का रे जायची? तूच फक्त प्रोटोकॉल पाळायचास का? तु सगळेच कार्यक्रम अटैंड करायचे? आम्हाला मात्र तुझ्या अंतिम प्रवासालाही  निरोपाला येणं अशक्य..ही असहायता....
  
भावा...
कॉम्रेड ...
या संचारबंदीच्या दिवसात 
भुरभुरत्या निराश पावसात 
 उंचावलेले हात रित्या उदास आभाळात 
फडफडणारा निळा लाल झेंडा
जयभीम लाल सलामच्या घोषणा
सुगरणीचा उगीच हेलकावणारा रीता खोपा
अन कुठतरी अबोलपणे निरोप देणारी अमृता असेल उभी  असेल का रे ?
तुझ्या जळत्या चितेपासून दूर. . 
आता
चिरंतन काळीज कुरतडणारी हुरहुर....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com