नाटक करायला शिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाटक करायला शिक

त्या दिवसांनंतर मला जवळ-जवळ अनेक महिन्यांनी फोन आला. मी कऱ्हाडमध्ये जॉबला लागले आहे व मुलीला इंग्लिश माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला आहे. कऱ्हाडमध्ये रूम घेऊन आम्ही राहतोय. सासूला पण आता बरं वाटतं, की मला कामाचा त्रास होतोय; पण खर तर मला नाही त्रास होत; पण त्यांचं मन राखायला मला तुम्ही शिकवले होते, तस नाटक करायला लागते. तुमच्यामुळे आज हे सगळं शक्‍य झाले... एक तासासाठी शेजारी बसलेली एक अनोळखी व्यक्ती आपल्या बोलण्यामुळे एवढं समाधानी होत असेल तर यापेक्षा मोठा आनंदी प्रवास काय असेल...

नाटक करायला शिक

हा प्रसंग आहे तेव्हाचा, जेव्हा मी पुण्याला गावाकडून सुटी संपवून जाता असतानाचा. कऱ्हाडच्या बस स्टॅंडवर पाठीवरील बॅगेत शिक्षणाचा संसार भरून बसची वाट पाहात होतो. नुकताच कोवळा पाऊस पडून गेलेला होता. स्टॅंडचे काम चालू होते. त्यामुळे पडलेल्या खड्ड्याड पाण्याने लवकर जागा भरून घेतली होती. बसची वाट पाहात बसण्यापेक्षा मी माझा आसपासच्या माणसांना त्यांच्या हालचाली पाहण्याच्या कामात दंगून गेलेलो. तेवढ्यात माझ्याशेजारी एक साधारण वयाची महिला एका हातात मोठी भरलेली बॅग, खांद्यावर पर्स आणि दुसऱ्या हाताला त्यांच्या लहान मुलीला घेऊन माझ्याजवळ आल्या आणि बोलल्या, ‘पुण्याला जाणारी गाडी इथेच लागती का?’ मी मान हलवली आणि पुन्हा वाट पाहण्यास लागलो. त्यांनी पुन्हा मला सांगितले, की ‘जर गाडी लागली तर माझी जागा पकडाल का?’ मला क्षणभर विचित्र वाटले. मी अनोळखी अन्‌ मला कोणत्या भरवशाने ही स्त्री जागा पकडायला सांगत होती. विचार करण्याच्या नादात बस जेव्हा लागली समजलं नाही. सगळे धावपळ करायला लागले. ही बिचारी आपली पर्स, बॅग आणि मुलीला एकाच वेळी घेऊन बसमध्ये चढण्याची कसरत करू लागली. मग मी त्यांची बॅग मागितली आणि गर्दीत शिरत जागा पकडली. ती मुलीला घेऊन सगळ्यात शेवट आल्या आणि बसल्या माझ्याजवळ. साधारण काही मिनिटांचा प्रवास झाल्यावर त्यांनी मला माझे नाव आणि माझ्याबद्दल माहिती विचारायला लागल्या. तसं मला प्रवासात फारस बोलायला नाही आवडत, जर एखादा महत्त्वाचा विषय असला तरच... त्यांच्या साधारण प्रश्नाची उत्तरे देण्यात मला अजिबात रस नव्हता. मी कानात हेडफोन घालून गाणी ऐकत होतो आणि त्यांना असं सुचवत होतो, की मला बोलण्याचा कंटाळा आलाय. तुम्ही माझ्याशी अजिबात बोलू नका, तरी सुद्धा त्या माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. ते स्वतः न विचारता त्यांची माहिती मला सांगत होत्या. मग मला अंदाज आला, की जर एखादी व्यक्ती स्वतःहून काही तरी सांगत असते, तेव्हा खरंच त्याला एक तर त्याच्या महत्त्वाचं काम असते नाही तर आपल्या तरी..

सुरवातीला त्यांनी माझ्या तब्येतीवर चर्चा केली आणि बोलले की ‘ॲमवे’चे प्रॉडक्‍ट वापरत जा तब्येत वाढायला. मला वाटलं या मार्केटिंग करणाऱ्या आहेत की काय... मी बोललो मी काय तसलं वापरत नाही. तुम्ही मला काय विकू नका. मग त्या बोलल्या की मी तसलं काही विकत नाही; पण असाच सांगू वाटलं म्हणून सांगितले. मला त्यांचा या वागण्यामुळे त्यांच्याशी बोलण्याची इच्छा झाली. मी मग त्यांना विचारले की, ‘तुम्ही कोठे राहता?’, ‘पुण्यात का चाललाय’, माझ्या या दोन प्रश्नांवर त्यांनी त्यांची सगळी कथा माझ्यासमोर मांडायला सुरवात केली.

माझं गाव मसूरजवळच. घरात नवरा, सासू, सासरे आणि एक मुलगी एवढे गावात राहतो. दोन मोठे दीर आणि त्यांच्या दोन जावा या पुण्यात राहत होते. तिघांची शेती एकटा माझा नवरा करत होता. दोन्ही जावा कमी शिकलेल्या; पण राहायला पुण्यात. मी एमकॉम झालेली आणि इतर कोर्स झालेली असून, गावात नवऱ्यासोबत शेतात जाते आणि घरातील कामे करते. माझा जन्म पुण्यात झाला. लहानापासूनच शहरात वाढले. त्यामुळे शेतीचा मुळीच संबंध नाही; पण अचानक गावात लग्न करून आल्यावर नवऱ्याने काम सोडले आणि तिघांची शेती करायला लागला. माझ्या दोन जावा, पुण्यात वापरलेल्या साड्या गावाला येताना सासूला घेऊन येणार आणि सासूबाई मग मला टोमणे मारणार की माझ्या पुण्याचा सुना लय चांगल्या म्हणून... एखादा कार्यक्रम घरात असला तर मी दिवसभर काम करून मरणार आणि या पुणेकर येऊन एक दिवस ऐट मारणार आणि सगळं कार्यक्रम झाल्यावर असा आव आणणार की सगळं काम आम्हीच केली. मला शेतातील काम माहीत नसल्यामुळे जमत नाही तर सासू त्यावरून भांडणार आणि बोलणार आई-बापाने काही शिकवले का? आता मला जे शिकवले ते इथे नाही काय कामाचं. मग मी काय करायचं. आमचा नवरा साधा आणि प्रामाणिक. ते पण आईच ऐकायचं की बायकोचं, कोणाची बाजू घ्यायची म्हणून गपगुमान बसनं हाच पवित्रा त्यांनी सुरवातीपासून घेतलेला. काय करायचं मी. एक वर्ष झाल की माहेरी गेलेली नाही. आज पण घरातून भांडण करून निघाली आहे, नवरा साधा सोडत पण आला नाही स्टॅंडवर. हे सांगत असताना बिचारीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरू व्हायला लागल्या. क्षणभर तो प्रसंग पाहून मला काय करावे काय सुचेना. कस सांगावं रडू नका म्हणून. मी मग त्यांना त्यांचं काय चुकत ते सांगाय सुरवात केली.

पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नाटक करायला शिका म्हणजे रानातून काम करून आला, की सासूसमोर अंग दुखत आहे. त्रास होतोय अस ओरडायला सुरवात करा. तुमच्या सासूला तुम्ही किती काम करता हे नाही बघायचं तर त्या कामापासून तुम्हाला किती त्रास होतोय हे पाहायचं आहे. दुसरी गोष्ट जास्तीतजास्त महिन्यातून एकदा तरी माहेरी जात जावा. माहेरी गेल्यामुळे तुम्ही फ्रेश होशिला आणि पुन्हा संसार करायला एक नवी ताकद मिळेल. राहिला प्रश्न मुलीच्या शिक्षणाचा आणि तुमच्या कामाचा तर तुम्ही कऱ्हाडमध्ये एक रूम घ्या आणि मुलीला शहरात शिक्षणाला ठेवा आणि तुम्ही जॉब करा. नवरा गावातील शेती येऊन-जाऊन करील. आठवड्यातून एकदा गावाला राहायला जात जावा आणि सणासुदीला सुद्धा...

पुढचे अर्धा तास मी त्यांना नाटक करून आनंदी कसं राहायचं यावर लेक्‍चर द्यायला लागलो आणि रडणाऱ्या त्या कधी खळखळून हसायला लागल्या समजलेच नाही. बघता-बघता कात्रज आले. फोन नंबरची देवानं घेवाण झाली. कात्रजवरून आमचा प्रवास वेगवेगळा होता. आम्ही तिघे खाली उतरलो आणि चक्क त्यांनी मला एक किलो सफरचंद आणून दिले आणि जबरदस्ती माझ्या बॅगेत टाकून खायला सांगितले आणि तब्येत वाढवायला सांगितले. एक वेगळेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्या पुन्हा- पुन्हा माझे आभार मानत बोलत होत्या, की बरे झालं तुम्ही भेटला. माझा पूर्ण मूड चांगलं केला आणि माझा आयुष्यात न विसरणारा प्रवास म्हणून आठवणीत ठेवला.

त्या दिवसांनंतर मला जवळजवळ अनेक महिन्यांनी फोन आला. तिकडून सांगितले की मी कऱ्हाडमध्ये जॉबला लागली आहे व मुलीला इंग्लिश माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला आहे. कऱ्हाडमध्ये रूम घेऊन आम्ही राहतोय. सासूला पण आता बर वाटत, की मला कामाचा त्रास होतोय; पण खर तर मला नाही त्रास होत; पण त्यांचं मन राखायला मला तुम्ही शिकवले होते, तस नाटक करायला लागते. आता सणासुदीला तिघी मिळून काम करतो. thank you so much... तुमच्यामुळे आज हे सगळं शक्‍य झाले आणि कऱ्हाडमध्ये माझ्या पुण्याच्या आईला मुलीचा अभ्यास घेण्यास मदत व्हावी म्हणून त्यामुळे रोज फ्रेश होते आणि सासूबाईंना पण पगारातून काही तरी घेत असतेच. बाकी माझी विचारपूस केली आणि फोन ठेवला. एक तासासाठी शेजारी बसलेली एक अनोळखी व्यक्ती आपल्या बोलण्यामुळे एवढं समाधानी होत असेल तर यापेक्षा मोठा आनंदी प्रवास काय असेल...

Edited By : Siddharth Latkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top