
Blog: तत्त्वज्ञान;मुलांसाठी गीता
बालमित्रांनो
श्रीमद्भगवतगीता हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. आपण तत्त्वज्ञान म्हणजे काय, ते बघूया. आपण आपल्याभोवती पसरलेले हे विशाल विश्व पाहतो.
सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी ग्रह, उपग्रह पाहतो. समुद्र, नद्या, पर्वत झाडे, वेली, पशु-पक्षीही आपल्याला दिसतात. हे सर्व बघितल्यावर तुम्हाला कधी असा प्रश्न पडतो का, की हे सर्व कोणी आणि कसं निर्माण केलं?
विश्वातील प्रत्येक वस्तू विशिष्ट नियमांवर चालताना दिसते. उदाहरणार्थ, सूर्य उगवतो, मावळतो. पृथ्वी, मंगळ, गुरू इत्यादी ग्रह अंतराळात कोणत्याही आधाराशिवाय राहतात. या सर्वांचे नियंत्रण कोण करतं? मनुष्य का जन्माला येतो? का मरतो?
तो सुखी का होतो? दुःखी का होतो? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण शोधू शकत नाही. विज्ञानात हे सर्व कसे कार्य करते त्याचा शोध लावला जातो. उदाहरणार्थ, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यापासून पाणी बनते.
हा शोध लागला परंतु, असेच का हे कळत नाही. पाणी तयार करणे सुद्धा अजून शक्य नाही झाले, पक्षी आकाशातच का उडतात? मासे पाण्यातच का राहतात? या सर्वांच्या मागे कोणती अज्ञात शक्ती कार्य करत असते?
ज्याला आपण निसर्ग नियम म्हणतो, ते सर्व शोधण्याचा अभ्यास म्हणजे ‘तत्त्वज्ञान!’ या विश्वाचे मूळ कारण कोणते? कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. ते मूळ कारण शोधणे म्हणजे ‘तत्त्वज्ञान’....
फार प्राचीन काळापासून हे तत्त्व शोधण्याचे प्रयत्न जगातील सर्व विचारवंत करत आले आहेत. त्यांना त्यांच्या अभ्यासातून, चिंतनातून जे काही ज्ञान प्राप्त झालं, ते त्यांनी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला.
त्यातूनच तत्त्वज्ञानाच्या विविध शाखा निर्माण झाल्या. असे अनेक तत्त्ववेत्ते भारतामध्ये होऊन गेले. आपण त्यांना ऋषी, मुनी, तपस्वी असे म्हणतो.
महाभारताचे रचनाकार वेदव्यास हे असेच तत्त्ववेत्ते होते. कपिल नावाचे एक मुनी होऊन गेले, त्यांनी सांख्य तत्त्वज्ञान मांडले. याचा विचार आपण मागच्या काही लेखांमध्ये केला आहे. आता बुद्धियोग म्हणजे काय? ते आपण पाहणार आहोत.
- श्रुती आपटे