BLOG : फिल्मी चौकशीचा रंगलेला तमाशा

BLOG : फिल्मी चौकशीचा रंगलेला तमाशा

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर विविध चर्चा आणि वादविवादांना तोंड फुटले. नेपोटिझम - घराणेशाहीच्या - मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. मग हत्या की आत्महत्या हा वाद सुरू झाला. आता ते सारे मागे पडले असून, टीव्ही चॅनेलांच्या न्यायालयात चर्चा सुरू आहे ड्र्ग्ज माफियाची. या प्रकरणात सातत्याने सुशांतची ‘पार्टनर’ आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे नाव घेण्यात येत आहे. तिची चौकशी सुरू आहे. त्यातून ड्रग्जचे प्रकरण पुढे आले आणि तिला
अटक झाली.  या चौकशीत हिंदी चित्रपटसृष्टीतील काही आघाडीच्या नायिकांची नावे समोर आली आणि बाॅलीवूडमध्ये खळबळ माजली. सारा अली खान, श्रद्धा
कपूर, राकुल प्रीत सिंग, दिया मिर्झा, नम्रता शिरोडकर आणि आता दीपिका पदुकोन यांच्या नावांची चर्चा सुरू असून, एनसीबीने त्यातील काहींना चौकशीसाठी समन्स पाठविले आहे.आता त्यांची चौकशी होईल. पण एकूणच या प्रकरणाआडून जे काही राजकारण सुरू आहे ते पाहता ते नेमके कोणते वळण घेईल हे सांगणे कठीण. कदाचित यात आणखी काही जणांची नावेही समोर येतील आणि त्यांचीदेखील चौकशी होईल. यात दोषी असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण तत्पूर्वी सर्वांनीच आरोपी आणि दोषी यातील फरक समजून घेतला पाहिजे.

हा नशाबाजीचा मुद्दा चित्रपटसृष्टीला तसा नवा नाही. परंतु हेही खरे की कोणत्याही क्षेत्राला तो नवा नाही. अमली पदार्थांचे सेवन चित्रपट कलाकारच करतात आणि बाकीचा समाज हा पूर्ण निर्व्यसनी आहे असे मानून चालणे हा तद्दन बावळटपणा झाला. चित्रपटसृष्टीबद्दल सारेच जरा जास्त संवेदनशील बनलेले दिसतात याची कारण मोठ्या प्रमाणावर राजकारणात आहे. तशीच ती या क्षेत्राबद्दल लोकमानसात असलेल्या आकर्षणातही आहे. या क्षेत्रालाही पार्टी कल्चर नवीन नाही. पूर्वी मोठमोठ्या पार्टा होत असत. तेथे मद्याचे चषक खणाणत असत. आताही तशा पार्ट्या होतात. त्यातील काही जरा अधिक खासगीत होतात. अशा पार्टीतच गुपचूप ड्रग्जचे सेवन केले जाते. ते कुणाच्याही लक्षात येणार नाही याची खबरदारी काटेकोरपणे घेतली जाते. जसे अन्य क्षेत्रांतील नशेबाज करतात तसेच हे. ते चुकीचेच आहे. सुशांत सिंग प्रकरणातून चित्रपटसृष्टीतील हे कल्चर उघड झाले. तेही योग्यच झाले. पण असे करणारे सडके आंबे थोडेच आहेत. त्यांच्यावरून अख्खी आढी सडकी आहे असे म्हणणे अयोग्य आहे. तसे कोणी म्हणत असेल, तर तो निव्वळ इंडस्ट्री बदनाम करण्याचा राजकीय प्रयत्न म्हणावा लागेल.चित्रपटसृष्टी हे मनोरंजनाचे माध्यम असले तरी या इंडस्ट्रीने समाजोपयोगी कामेही अनेक केली.आहेत. निव्वळ कला आणि कलेवर प्रेम करणारी माणसे या इंडस्ट्रीत आहेत. अशा काही प्रकरणामुळे चांगल्या मंडळींकडेही संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढून एकदाचा सोक्षमोक्ष लावणे आवश्यक आहे. अर्थात त्यात आपल्या यंत्रणांना किती रस आहे हा प्रश्नच आहे. त्यांना खरोखरच चित्रपटसृष्टीतील नशेखोरीबाबत काळजी असती, तर यापूर्वीच त्यांनी याबाबत पावले उचलली असती. आता या सृष्टीला कोण ड्रग्ज पुरवतो, तेथील ड्रग्ज माफिया कोण आहेत याची माहिती मिळवून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

बाॅलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शन हे पहिल्यांदा उघड झाले ते संजय दत्तमुळे. त्यानंतर आदित्य पांचोली, फरदीन खान, सूरज पांचोली, अध्ययन सुमन....अशा
अभिनेत्यांची नावे समोर आली. त्याची तेव्हा खूप चर्चा रंगली. अभिनेता फरदीन खानचा प्यार तुने क्या किया हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चारेक दिवसांनी त्याला अमली पदार्थ घेताना अटक झाली आणि नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्याच्यावर एक ग्रॅमसाठी ठपका ठेवण्यात आला व रिहॅबला पाठविण्यात आले. नऊ ग्रॅम अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणातून मात्र तो निर्दोष सुटला.  अभिनेत्री ममता कुलकर्णीही अशा प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे. त्याबाबतचा निकाल लवकरच लागेल अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर आता सहा -सात नायिकांची नावे समोर आली आहेत. मात्र त्यांना केवळ चौकशीला
बोलाविले आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यांना लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे आणि त्यांच्यावर भलतेसलते आरोप करणे चुकीचे आहे. त्यांची आता चौकशी होईल आणि त्यातून नेमके काय माहिती बाहेर येईल ते आपण पाहायचे. गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलला आहे. चित्रपटांची निर्मिती वाढलेली आहे. अनेक हौसे व नवशे मंडळी चित्रपटसृष्टीत येऊन चित्रपट काढीत आहेत. हिंदी चित्रपटांना केवळ भारतातूनच नाही तर परदेशातूनही अमाप पैसा मिळत आहे. एकेक चित्रपट कोट्यवधी रुपयांची कमाई करीत आहेत. त्यामुळे एकूणच मिळणारा पैसा आणि त्यातून वाढत जाणारी बेफिकीर वृत्ती अशा व्यसनाला आमंत्रण देते. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात जग खूप जवळ आले आहे.

सोशल मीडियाचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्याद्वारे होणारी काही जणांची मैत्रीही त्याला कारणीभूत आहे. या मैत्रीमुळेच इंडस्ट्रीत ड्रग्जसारख्या घातक पदार्थाचे आगमन सुलभ झाले. केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नाही तर टीव्ही इंडस्ट्रीतील काही कलाकार ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे.अशी चर्चा आता रंगली आहे. काही टीव्ही कलाकारांची नावे समोर आली आहेत आणि आणखी काही कलाकारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. या सगळ्या चर्चांमुळे चित्रपटसृष्टीला गालबोट लागले हे नक्की. यातून या क्षेत्राची काही साफसफाई झाली तर ते चांगलेच होईल. ती व्हायला हवी. त्यासाठी यंत्रणांनीही अमली पदार्थ सेवन करणारे कोण याऐवजी त्यांनी ते पुरवणारे आणि मुळात ते पदार्थ भारतात आणणारे कोण येथपर्यंत जाण्याची तसदी घेतली पाहिजे. चार अभिनेत्रींची चौकशी करून फार फार तर टीव्ही चॅनेलांना तमाशा दाखवायला मिळेल आणि प्रेक्षकांना कैफ.

---------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com