जगाला समृध्द, सक्षम बनवण्याचं काम शिक्षक करताहेत!

जगाला समृध्द, सक्षम बनवण्याचं काम शिक्षक करताहेत!

हानपणी 'शिक्षक दिन' म्हटलं की, फार आनंद व्हायचा! याचं कारणही तसंच आहे. वर्षभर शाळेमध्ये शिक्षकांकडून शिक्षण घेत असताना स्वाभाविकच आम्ही अनुकरणातून जास्त शिक्षण घेत होतो. एखाद्या विषयाचे शिक्षक कसे बोलतात, कशाप्रकारे हावभाव करतात, एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या चुकीची शिक्षा कशाप्रकारे देतात? या सर्व गोष्टी सुद्धा आम्ही बारकाईने अनुभवायचो आणि पहायचोही! या अनुकरणात्मक शिक्षणातूनच आम्हाला प्रत्येक वर्षी पाच सप्टेंबर शिक्षक दिनाला शिक्षक बनण्याची संधी मिळायची. तेव्हा आम्ही जणू शिक्षकच आहोत असे वाटायचे.. 

माझे प्राथमिक शिक्षण आडी (ता. निपाणी) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा येथे झाले. दरम्यान, शिक्षक दिनाविषयी विविध विषयाच्या शिक्षकांकडून आम्हाला संधी दिल्या जात होत्या आणि आम्ही स्वतः तो एक दिवस 'शिक्षक' म्हणून शिकविण्याचे काम करत होतो. हा अनुभव आठवला की, आजही चेहऱ्यावर आनंद झळकतो. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नैतिक बदल घडवून आणणारा एकमेव घटक आहे. माझ्या वर्गातही अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी होत्या. आम्हाला विविध विषयांसाठी वेगवेगळ्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्येकांनी आमच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला. लहानपणीच्या या आठवणी आजही आमच्या जीवनात बदल घडविण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. आमच्या शिक्षकांकडून सर्वात मोठा गुण शिकायला मिळाला, तो म्हणजे 'नैतिकता'! खऱ्या अर्थाने आजही केवळ शिक्षकच समाजाचे मुख्य घटक आहेत. त्यांच्याकडून शाळेमध्ये जे संस्कार घडतात, त्यातूनच विद्यार्थी घडत असतात. जगाला समृध्द, सक्षम बनवण्याचं कामही शिक्षक करत आहेत!

माझ्या व्यक्तीगत जीवनाविषयी बोलायचे झाले, तर घरी कोणीही शिक्षित नव्हते, त्यामुळे शैक्षणिक मार्गदर्शन कधी मिळाले नाही. पण, घरातील आम्हाला जे संस्कार मिळायचे ते अतिशय चांगल्या प्रकारचे होते आणि याच संस्काराचे बीज आम्हाला शाळेतल्या मातीमध्ये रोपटं तयार करण्यासाठी फार उपयोग ठरले. आम्हाला शाळेमध्ये कधी-कधी विचारले जायचे, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे? आम्हाला कोणत्याही गोष्टीची कल्पना नव्हती कोणी सांगायचे इंजिनिअर व्हायचंय, वकील, डॉक्टर ,पोलीस, सैन्यात भरती व्हायचाय, अशी अनेक उत्तरे अनेक विद्यार्थ्यांच्याकडून येत होती. पण, जेव्हा माझा नंबर यायचा त्यावेळा माझ्या तोंडातून एकच उत्तर असायचे मला शिक्षक बनायचे आहे. समाजात शिक्षक या घटकाला मिळणारा मानसन्मान, आपुलकी आणि शिक्षकांविषयी असणारा आदर हा खूप मोठा असायचा, कारण आजही सगळे म्हणतात 'उद्याचा भारत हा शिक्षकांच्या हाती' आहे. 

कारण, आज समाजामध्ये ज्या-ज्या व्यक्ती असतात, त्याला योग्य आकार देण्याचे काम फक्त शिक्षकच करत असतो. समाजातील प्रत्येक घटकाला परिपूर्ण बनविण्याचे काम शिक्षकच करतात, असे मला वाटते आणि मला शिक्षक बनायचे आहे हे स्वप्न अगदी उराशी बाळगून मी वाटचाल केली. योग्य त्या पात्रतेबरोबरच दहावी-बारावी आणि डी.एड'चे शिक्षण पूर्ण केले. इंग्रजी विषयांमध्ये प्रथम श्रेणीतून पदवीधर झालो. पण, शिक्षक म्हणून सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न आजही तितकेच प्रबळ आहे. मला नेहमी स्वतःला वाटतं शिक्षक हा अष्टपैलू असावा म्हणून मी प्रत्येक गोष्टींचे ज्ञान घेण्यासाठी नेहमी आतुर असायचो आणि नवनवीन शिकण्याकडे माझा कल असायचा. जेणेकरून माझ्याकडे ज्ञान घेणार्‍या विद्यार्थ्यांना चांगले विद्यार्थी म्हणून घडता येईल. मला मराठी, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी विषयांची चांगलीच पारख असून या भाषा माझ्या जीवनात वेळोवेळी बदल घडवत गेल्या आहेत. 

मी कोणत्याही शालेय कार्यक्रमासाठी फलक लेखन करणे, उत्कृष्ट वक्तृत्व, लेखन शैली, संगीत क्षेत्रातील तबला वादनाचे ज्ञान, आधुनिक पद्धतीनुसार काॅम्प्युटर क्षेत्राचे ज्ञान, विविध खेळांविषयी आवड या सर्व गुणांनी युक्त असण्याचं कारण एवढेच की, मला माझ्या शिक्षकी सेवेमध्ये आदर्श शिक्षक बनता येईल. माझ्याकडून विद्यार्थ्यांना सर्व गोष्टींमध्ये पारंगत करता येईल हे खूप मनापासून वाटते. परिपूर्ण शिक्षक बनण्याची खरी प्रेरणा माझ्या शिक्षकांकडून मिळाली. मला आजही अष्टपैलू शिक्षक म्हणून रात्री झोपेत जरी कोणी मला प्रश्न केला, तरी माझ्याकडून अचूक उत्तर येईल एस. एस. मोरे सर! यांच्याकडे पाहूनच मला वाटायचं मलाही असेच सर्व क्षेत्रात प्राविण्य मिळवायच आहे. ही प्रेरणा आजही जिवंत आहे. आजच्या शिक्षकांनाही मी एवढाच संदेश देऊ इच्छितो, शिक्षक हा सर्व विषयांत आणि विविध क्षेत्रात पारंगत असला पाहिजे. जेणेकरून आपल्याकडे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी व्हावा. त्या आदर्श विद्यार्थ्यांसोबत मीही एक आदर्श शिक्षक बनावा, यासाठी सर्व शिक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. सर्व शिक्षकांना व मला मार्गदर्शन लाभलेल्या सर्व गुरुवर्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com