मराठी भाषा, माणूस व महाराष्ट्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dr dnyaneshwar mule

भाषा, संस्कृती, इतिहास यांचं जनत करण्याच काम आपापल्या परीनं चालू आहे. तथापि, अधुमधून मराठी भाषा लयाला जाणार काय ?

मराठी भाषा, माणूस व महाराष्ट्र

पुणे येथे 6, 7 व 8 जानेवारी 2023 रोजी 18 वे जागतिक मराठी सम्मेल्लन झाले. त्याचे अध्यक्षीय भाषण सम्मेलनाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी दिले. त्यातील त्यांचे मराठी भाषा, माणूस व महाराष्ट्र या विषयीची मते पाहिली, की मराठी समाज, साहित्यिक व शासन यांनी या तिन्ही गोष्टींच्या समृद्धीसाठी काय करावयास हवे, याचा एक आलेखच वाचायवयास मिळतो.

महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र, केंद्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गेली अनेक वर्षे मराठी भाषाविषयक सम्मेलने होत आली आहेत. त्यामधून भाषा, संस्कृती, इतिहास यांचं जनत करण्याच काम आपापल्या परीनं चालू आहे. तथापि, अधुमधून मराठी भाषा लयाला जाणार काय ?

तिचं भविष्य काय आहे ? असे प्रश्न सातत्याने विचारले जातात. त्याची उत्तरं नव काव्य, नाटक व साहित्यनिर्मिती यातून मिळत असलं, तरी उज्वल भविष्यासाठी नव्या पिढीचा, मराठी अयवजी इंग्रजी शिकण्याकडे कल आहे, हे नाकारून चालणार नाही. म्हणूनच मराठीच्या संवर्धानासाठी खास प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.

सम्मेलनाचे मूख्य सूत्र `शोध मराठी मनाचा’ हे होते. त्यावर डॉ मुळे यांनी दिलेलं उत्तर मोठं मार्मिक होय. ते म्हणाले, ``मराठी मनाचा शोध घेता येईल का, ते ब्रह्मदेवाला कळणार नाही. शोध घ्यायचा कसा ? कोण घेणार? अशा शोधाला लागणारे पर्यावरण महाराष्ट्रात आहे का? मराठी माणूस जागतिक दृष्टी बाळगून आहे का?

भाषणाच्या ओघात त्यांनी या व अन्य प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, आजच्या वातावरणातील तृटीही मांडल्या आहेत. अर्थात त्यातील काहींची मराठी माणूस व महाराष्ट्राला कल्पना आहे, तथापि, त्या कमी करण्यासाठी जितक्या कसोशीने प्रयत्न व्हावयास हवेत तेवढे होताना दिसत नाही. त्याचे वैषम्य वेगळेच आहे. म्हणूनच त्यांच्या भाषणातील काही मुद्यांची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे.

ते म्हणाले, ``दिल्लीत शंभर वर्षांचा इतिहास असलेले नू.म.विद्यामंदीर आहे. तिथले सातशे आसनांचे नाट्यगृह मोडकळीस आले आहे. एके काळी तिथं बृहनमहाराष्ट्राच्या अंतिम फेरीतील नाट्यस्पर्धा होतं.’’

मी ही अर्ध शतकापेक्षा अधिक वर्ष दिल्लीत राहात आहे. डॉ मुळे म्हणतात, त्यात बरेच तथ्य आहे. या नाट्यगृहात सुमारे पंचवीस तीस वर्षापूर्वी महाराष्ट्र परिचय केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या वतीनं दरवर्षी महाराष्ट्रात गाजलेल्या संगीत व अऩ्य नाटकांचे प्रयोग व्हायचे.

दिल्लीकरांना ती साहित्यिक मेजवानी असे व तीन दिवस चाललेल्या या नाट्योत्सवात सभागृहातील एकही खुर्ची मोकळी राहात नसे. त्या निमित्ताने दिल्लीतील मराठी बांधवांचे छोटेखानी सम्मेलनच भरत असे. या सभागृहाचे नूतनीकरण्याबाबत, ते वातानुकूलित करण्याबाबात तेथील व्यवस्थापकांनी वर्षानुवर्षे आर्थिक साह्याची मागणी केली.

परंतु, एका मागून एक आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासने देण्यापलिकडे काही केले नाही. अखेर, कालांतराने महाराष्ट्र सरकारने वार्षिक नाट्योत्सव बंद केले. त्यामुळे राज्याच्या जबाबदारीचा प्रश्नही आपोआप सुटला. सत्तापालटासाठी होणाऱ्या कोट्यावधी रूपयांच्या चुराड्यातील एक टक्का जरी निधी या नूतनीकरणासाठी मिळाला असता, तरी बरेच काही साध्य झाले असते.

मराठी साहित्यवर्धन, महाराष्ट्रेतर राज्यात राहाणाऱ्या मराठी बांधवाच्या सांस्कृतिक संस्था, देशाबाहेरील मराठी संस्था यांच्या अत्यावश्यक आर्थिक गरजांसाठी राज्याच्या प्रतिवर्ष सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद केल्यास बरेच काही साध्य होईल. यासाठी राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्याने अधिक स्वारस्य दाखवावयास हवे.

तृटींवर दाखवित मुळे म्हणतात, ``आज मराठीला आणि निरनिराळया राज्यातील पूर्वाश्रमीच्या राजघराण्यातील छत्रपतींच्या वंशजांनाही अऩेक आव्हाने असली, तरी महाराष्ट्राचे तिथं अजिबात लक्ष नाही. अलीकडच्या काळात पानिपतमध्ये उभारलेल्या छोट्याशा स्मारकाशिवाय अन्यत्र अनेक अयतिहासिक स्थळांवर महाराष्ट्राची आठवण देणारे फलक किंवा स्मारक दिसत नाही.’’

मलाही दिल्लीत फेरफटका मारताना त्याची वेळोवेळी जाणीव होते. उदा. मंदिर मार्गावर दिसतो, तो `पेशवा रोड’ असा फलक. पण कोणता पेशवा, पहिला की दुसरा याबाबत काही उल्लेख नाही. कॅनॉट प्लेसच्या मिंटो रोड जवळ असलेल्या तिकोना पार्कमध्ये महाराज छत्रपती शिवाजी यांचा अश्वारूढ पुतळा आहे. शिवजयंतीला त्यावर हार चढविला जातो.

परंतु, वर्षभर त्याची सफाई व देखभाल होत नाही. मी एकदा पाहाण्यास गेलो असता, पुतळ्याच्या पाठीवरील ढालीत पक्षांची घरटी पाहण्यास मिळाली. पुतळ्याच्या हातातील तलवार अर्धी तुटलेली होती. तिचा काही भाग चोरांनी पळवून नेला होता. नंतर झाशीमधील झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या अश्वारूढ पुतळ्यात कानातील आभूषणे चोरीला गेल्याचे कळले. पुढे काय झाले ठाऊक नाही. या हेळसांडीकडे कुणाचे लक्ष नाही.

डॉ मुळे म्हणतात, ``महाराष्ट्राच्या बाहेर राहाणाऱ्या मराठी माणसाला उपेक्षित ठेवणे, हे हेतुपुरस्सर झाले नाही, तर, एकंदरीतच महाराष्ट्र आत्मकेंद्री आणि झाल्यामुळे अशी उदासीनता आली आहे.’’

ते म्हणतात, ``स्वातंत्र्यानंतरच्या काळातही हमीद दलवाई, बाबा आढाव, नरेंद्र दाभोळकर अशी सामाजिक नेतृत्वाची परंपरा सुरू राहिली. आज देश एका विचित्र वैचारिक वावटळात सापडला आहे. त्यातून बाहेर पडून नवीन मार्ग कोण दाखवू शकेल, असा प्रश्न मला पडला आहे. तंत्रज्ञानामुळे आणि त्यातून विकसित केल्या गेलेल्या अयाप मुळे समस्या सुटण्याअयवजी अधिक गंभीर होत चालली आहे.’’

खंत व्यक्त करताना डॉ मुळे म्हणाले, ``माध्यमांमध्ये विशेषतः इंग्रजी माध्यमे आणि टी.व्ही. माध्यमात अँकर म्हणून मराठी माणूस दिसत नाही. मराठी माणसाचे इंग्रजी टी.व्ही चॅनेल असले, तरी त्याची मला कल्पना नाही. इंग्रजी मुद्रीत माध्यमांमध्ये मराठी स्तंभलेखक व किंवा पत्रकारांची उपस्थिती जुजबी किंवा नगण्य आहे.

या संदर्भात थोडी दुरूस्ती करताना सांगावे लागेल, की टी.व्ही माध्यमातून रोज झळकणारे राजदीप सरदेसाई हे नाव घ्यावे लागेल. त्यांचा स्तंभ नियमीत `हिंदुस्तान टाइम्स’ या इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध होत असतो. दुसरे नाव घ्यावे लागेल, ते समाज शास्त्रज्ञ सुहास पळशीकर. ते सातत्याने `इंडियन एक्प्रेस’ मध्ये स्तंभलेखन करीत आहेत.

शिवाय `लोकसत्ता’चे संपादक गिरिश कुबेर हे `इंडियन एक्प्रेस’मध्ये राजकारणावर अधुनमधून भाष्य करीत असतात. निवेदिता खांडेकर गेली अऩेक वर्षे `हिंदुस्तान टाईम्स’मध्ये वार्ताहर होत्या. आता त्या इंग्रजी वर्तमान पत्रातून पर्यावरण या विषयावर लिहितात. पत्रकार व खासदार कुमार केतकर गेली अनेक वर्षे इंग्रजी वृत्तपत्रातून लिखाण करीत आहेत.

दिल्लीतील मराठी पत्रकारितेविषयी बोलायचे तर बीबीसीमध्ये सुमारे वीस एक मराठी पत्रकार काम करीत आहेत. या व्यतिरिक्त, महाराष्ट्रातील वृत्तपत्रे व माध्यमे मिळून दिल्लीतून काम करणाऱ्या मराठी पत्रकारांची संख्या दीडशेच्या आसापास पोहोचली आहे. पण डॉ मुळे म्हणतात, त्याप्रमाणे ``एकेकाळी हिंदी सकट अनेक राष्ट्रीय वृत्तपत्रांचे संपादक मराठी होते. ते युग आता संपल्यासारखे वाटते.’’

यात मात्र बरेच तथ्य आहे. काही वर्षांपूर्वी इंदूरहून प्रसिद्ध होणाऱ्या `नई दुनिया’ या दैनिकाचे संपादक राहुल बारपुते यांचे नाव हिंदी पत्रकारितेतील मानदंड म्हणून समजले जायचे. अनेक वर्षांपूर्वी, सुभाष किरपेकर `द टाइम्स ऑफ इंडिया’ व पूर्वाश्रमीचा `पॅट्रिऑट’ मधील विनोद टाकसाळ यांनीही इंग्रजी पत्रकारिता गाजविली.

टाकसाळ हे तर तब्बल आठ वर्षे पॅट्रिऑट चे रशिया (मॉस्कोतील)तील परदेशी पत्रकार (फॉरेन करसपाँडन्ट) होते. पण, अलीकडच्या काळात इंग्रजी वृत्तपत्रातून काम करणाऱ्या मराठी पत्रकारांची संख्या उल्लेखनीय राहिलेली नाही, हे खरे.

आणखी काही तपशील देताना डॉ मुळे यांनी बोट ठेवले, ते इतर राज्यांच्या विकासात सढळ हाताने मदत करणाऱ्या महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे केंद्राचे तुटपुंजे अर्थसाह्य यावर. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील मोजक्या मराठी नेत्यांच्या कारकीर्दीचा तपशील दिला व केंद्रातील सत्तेत महाराष्ट्राच्या घटणाऱ्या वाट्याकडे निर्दॆश केला.

त्यांच्या भाषणातील प्रत्येक मुद्यावर महाराष्ट्रात विचारमंथन झाले पाहिजे. महाराष्ट्रात भाजप व शिवसेने सरकार आल्यापासून कोट्यावधी रूपयांचे महाराष्ट्रातील प्रकल्प पंतप्रधान मोदी यांच्या कृपेने गुजरातमध्ये गेले. इकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना हात चोळत बसण्याशिवाय काही करता आले नाही. महाराष्ट्राचे आर्थिक व राजकीय वस्त्रहरण होताना महाराष्ट्र फक्त शक्तीहीन होऊन दुबळेपणे पाहात आहे, हे ही मोठे खेदजनक होय.

टॅग्स :marathi