जिल्हा बँक, सहकार, शिवसेना आणि राष्ट्रवादी

Gulabrao Patil, Eknath Khadase and Girish Mahajan
Gulabrao Patil, Eknath Khadase and Girish Mahajan google

जिल्हा बँकेच्या निवडणुकांची खलबतं सुरू झाली आहेत. सहकारात जळगावातही राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने जिल्हा बँकेतही महाविकास आघाडीची सरशी राहील, अशी चिन्हे आहेत. पहिल्यांदाच पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. गुलाबरावांचं वैशिष्ट्य, हे की ते स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही बँकेच्या राजकारणात उमेदवार म्हणून सक्रिय नसताना गुलाबरावांकडे नेतृत्त्वाची धुरा आली आहे. मात्र, ही चर्चा करत असताना आमचे सूत्र असं सांगतात, की जिल्हा बँकांच्या निवडणुका ठरलेल्या कार्यक्रमानुसार न होता, पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

निवडणुका केव्हाही झाल्या, तरी जिल्हा बँकेचं राजकारण हा राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय असतो. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन स्वतः बँकेच्या राजकारणात सक्रिय होते. त्यांनीही बँकेचे नेतृत्व केले आहे. आता गुलाबरावांपुढे जिल्हा बँकेच्या निवडणुका बिनविरोध करण्याची सूत्रं आली आहेत. निवडणूक बिनविरोध करायची झाल्यास गुलाबराव पाटील यांचा कस लागणार हे निश्‍चित. आपल्या शिष्टाईला यश यावं, यासाठी त्यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या दिलजमाईचे प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी या संदर्भातील सर्वपक्षीय बैठक होईल. तोपर्यंत जिल्हा बँकेच्या निवडणुकांसंदर्भात काही निर्णय आलेला नसल्यास खडसे-महाजन बैठकीस उपस्थित राहतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

पैशाचा चुराडा रोखायचा झाल्यास बिनविरोध निवडणुका घेणं कधीही श्रेयस्कर ठरतं. पण काँग्रेसनं वेगळं लढण्याचा नारा दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार उल्हास पाटील आणि जिल्हाध्यक्ष संदीप पाटील या निर्णयावर किती ठाम राहतात, यावर बरंच काही अवलंबून आहे. ताकद वाढवून मिळावी, यासाठी हा अट्टहास असल्यास तडजोडीचीही शक्यता इथे नक्कीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, सतीश पाटील बिनविरोधसाठी अनुकूल आहेत. अगदी गिरीश महाजनदेखील बिनविरोधसाठी अनुकूल होऊ शकतात, अशी माहिती आहे. मात्र भाजपतील एक गट स्वतंत्र लढण्यासाठी उत्सुक आहे.

बँक बिनविरोध करायची झाल्यास पक्षाच्या ताकदीचा आणि कामाचा विचार गुलाबराव पाटील यांना करावा लागणार आहे. महसूलमंत्री असताना गेल्या टर्ममध्ये नाथाभाऊंनी हे शक्य करून दाखवलं होतं. शिवाय कन्या रोहिणी खडसे यांच्या अध्यक्षपदासाठीही त्यांनी सगळ्यांना राजी केलं होतं. भाजपा आणि काँग्रेस अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी उत्सुक आहेत. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर पकड प्रस्थापित करण्यासाठी गुलाबराव पाटील कितपत यशस्वी होतात, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. या निमित्ताने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील शिवसेनेचा प्रवेश मात्र महत्त्वाचा ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com