तिसरी लाट : भीती नको, तयारी हवी

corona
corona Google
Summary

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सर्वाधिक फटका बसला तो गाफिल राहिल्याने. आताही तिसऱ्या लाटेबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेवेळी सर्वाधिक फटका बसला तो गाफिल राहिल्याने. आताही तिसऱ्या लाटेबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. अनेक अफवांना ऊत आलाय. लहान मुलांना धोका होऊ शकतो, असा अंदाज काहींनी वर्तवला. त्यामुळे पालकांत भीती निर्माण झाली आहे. तिसरी लाट आणि मुलांसाठीच्या संभाव्य धोक्याबाबत जागरूक नक्कीच असलं पाहिजे. त्यासाठीची तयारीही करायलाच हवी, पण त्यामागे भीती पसरविण्याचा उद्देश असता कामा नये. लहान मुलांनाच नाही, तर अनेक लोकांना यापू्र्वीच कोरोना होऊन गेला आहे. मात्र त्यांची प्रतिकारक्षमता चांगली असल्याने त्यांच्यातील लक्षणं समोर आली नाहीत. मात्र, भीती हा असा विकार आहे, ज्याचा परिणाम मनावर, शरीरावर आणि आपसूकच प्रतिकार क्षमतेवरही होतो.

आरोग्य आणि त्याभोवतीची सर्व व्यवस्था हा पुढच्या काळात कळीचा मुद्दा ठरणार आहे. किंबहुना शहरी आणि ग्रामीण राजकारणही आरोग्य या विषयाभोवतीच केंद्रित असेल. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत ज्यांना समाजकारण आणि त्यातून राजकारण करायचं असेल, त्या लोकप्रतिनिधींना आरोग्य विषयाभोवती कामाचं जाळ गुंफावं लागेल. या काळात अगदी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांनी त्यांच्याकडील अधिकाधिक निधी कोविड आणि अन्य आरोग्य सुविधांसाठी मुक्तपणे वापरायला हवा. आपल्या निधीतून उभ्या राहणाऱ्या सोयी-सुविधांवर या लोकप्रतिनिधींनी बारीक लक्ष ठेवायला हवं, ही काळाची गरज आहे, लोकप्रतिनिधींची ही गुंतवणूक त्यांना निवडणुकीत व्याजासह मतांच्या रूपात मिळण्याची शक्यता नक्कीच आहे.

तिसरी लाट ही संभाव्य आहे; पण त्यात लहान मुलांत संसर्ग अधिक होईल, याला कुठलाही आधार नसल्याचं ‘आयसीएमआर’ने स्पष्ट केलं आहे. ही लाट अधिक भयावह असेल, यालाही कोणताच ठोस पुरावा नाही. जी आहेत, ती भाकितं आहेत. दुसरी लाट अमेरिका आणि ब्राझीलमध्येही पसरली, तेव्हा त्यातून आपण बोध घ्यायला हवा होता. पण आता जर तिसरी लाट अन्य देशांत किंवा आपल्याकडे निर्माण होणार असेल, तर त्यासाठी आपण सज्ज असू, अशी आशा करायला हरकत नाही. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याची आपली परंपरा मोडीत काढण्याची संधी आपल्याकडे यंदा आहे. कारण आपल्याला जेव्हा जे हवं असतं ते कधीच उपलब्ध नसतं, हे वास्तव आहे. ऑक्सिजन लागला तेव्हा तो नव्हता, रेमडेसिव्हिर लागले तेव्हा ते मिळाले नाहीत, बेड्स हवे होते-तेव्हा उपलब्ध नव्हते, सध्या ॲम्फोटेरिसिन हवे आहे. ते मिळत नाहीत. जेव्हा या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतील तेव्हा निसर्गानं चकवा देऊन विषाणूचं स्वरूप बदललं, तर पुन्हा गडबड होऊ शकते. येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय आपल्याकडे अन्य मार्ग नसला, तरीदेखील दोन लाटांनी शिकवलेल्या धड्यांतून जर यंत्रणा उभी राहिली, तर भविष्यातील अन्य कुठल्याही संसर्गजन्य आजाराशी आपण लढण्यास सक्षम होऊ शकतो. वेगवेगळ्या संसर्गांचा धडका या पुढील काळातही बसणार आहे, हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची आवश्यकता नाही. त्यामुळे आपली तयारी वाया गेली, असं म्हणण्यास वाव उरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com