ST ज्येष्ठ नागरिकांना का छळते...

विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या हक्काचं वाहतुकीचं साधन म्हणजे एसटी.
MSRTC bus
MSRTC busesakal

संपाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडत एसटी रस्त्यांवर धावू लागली आहे. एसटी मागचं शुक्लकाष्ठ एकदम कमी होणार नाही. एसटीला ऊर्जितावस्थेत आणायचं झाल्यास त्यासाठी सर्वच पातळीवर भरपूर कष्ट घ्यावे लागणार आहेत. पण एसटीची ओळख म्हणजे ‘गाव तेथे एसटी’. राज्यातील खेड्या-पाड्यांवर एसटी जाते, सामान्यांचा ती आधार ठरते. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या हक्काचं वाहतुकीचं साधन म्हणजे एसटी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनं जगभर मान्य केलेलं तत्त्व म्हणजे प्रसंगी तोटा सहन करत सामान्यांची सोय या व्यवस्थेद्वारे व्हावी. याचा अर्थ तोटा सहन करत रडतकढत सगळ्या वाहतूक व्यवस्था चालायला हव्यात, असं अजिबात नाही. फायद्यात येण्यासाठी जी तंत्रे वापरावी लागतील, ती सगळी वापरण्याची मुभा नक्कीच आहे.

MSRTC bus
मराठी टक्का घसरला, भाषा बदलली...

सुरवातीला उल्लेख केलेल्या दोन घटकांपैकी ज्येष्ठ नागरिक हा असाच एक सार्वजनिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील घटक आहे. देशभरातील सगळ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचं वय ६० गृहित धरलं जातं. अगदी रेल्वेच्या सवलतीसाठीही ६० वर्षांची वयोमर्यादा आहे. सरकारी, निमसरकारी सगळ्या आस्थापनांमध्येही ६० वर्षांवरील नागरिक ज्येष्ठ नागरिक मानले जातात. एसटीमध्ये मात्र ही वयोमर्यादा ६५ वर्षे आहे. बरं हे असं का आहे, याचं कोणतंही तार्किक उत्तर एसटीकडे नाही. जेव्हा निम्न आर्थिक गटातील ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न येतो, तेव्हा त्यांच्यासमोर एसटीच्या प्रवासाशिवाय अन्य कुठलाही मार्ग नसतो. साधारणपणे निवृत्तीनंतर सुरवातीच्या वर्षांमध्ये तब्येतीची स्थिती उत्तम असल्यानं फिरण्यासाठी हा सर्वोत्तम वयोगट आहे. मात्र एसटीच्या प्रवासात सवलतीत प्रवास करता येत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण होते. केंद्राची आणि देशभरात सर्वच राज्यात ६० वर्षांची मर्यादा असताना राज्यात एसटीमध्ये ६५ वयोमर्यादा आकलनापलीकडची आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी या संदर्भात लक्ष घातल्यास हे मुद्दे चुटकीसरशी सुटणारे आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणारा एसटीच्यासंदर्भात अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे स्मार्ट कार्ड योजना. पूर्वी असलेली सवलतीची पद्धत एसटीनं बंद केली आहे. स्मार्ट कार्ड प्रीपेड असल्याने रक्कम आगावू एसटीकडे जमा करावी लागते. अनेकदा स्मार्ट कार्डची प्रीपेड रक्कम संपेपर्यंत प्रवास होतही नाही. बरं हे स्मार्ट कार्ड घेण्यासाठी लांबच लांब रांगांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना उभे राहावे लागते. त्यामुळे तहसीलदाराच्या शिक्क्याने मिळणारी आधीची सवलतीची योजना पुन्हा सुरू करावी, अशी ज्येष्ठ नागरिकांची आग्रही मागणी आहे. जेवढा प्रवास करू तेवढे पैसे एसटीच्या तिजोरीत पडणार आहेतच. मग आगावू पैसे जमा करून घेण्याचा खटाटोप एसटीने करू नये, असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.

MSRTC bus
राहुल गांधींचं चुकतं कुठं?

‘सकाळ माध्यम समूहा’च्या माध्यमातून काही महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिक संवाद कार्यक्रम सुरू आहे. या प्रत्येक कार्यक्रमात एसटी संदर्भातील उपरोक्त दोन मुद्यांचा आवर्जून उल्लेख ज्येष्ठ नागरिक करत आहेत. एसटीच्या वयोमर्यादा संदर्भातील अट तर अतिशय जाचक असल्याचे अनेक ज्येष्ठांनी कथन केले. ऐरवी अनेकदा अनेक मार्गांवर बस रिकाम्या धावतात. पण जर सवलतीत प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक एसटीने प्रवास करणार असतील, तर ते एसटीला नकोय का, अशी भावनाही अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. स्मार्ट कार्ड योजनेमुळेही ज्येष्ठ एसटीकडे पाठ फिरवण्याच्या मानसिकतेत आहेत. हा हक्काचा प्रवासी वर्ग एसटीला गमवायचा नसेल, तर या दोन्ही विषयांत एसटी प्रशासनाने बदल केल्यास एसटीला तोट्याऐवजी काही प्रमाणात का होईना फायदा नक्कीच होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीददेखील सार्थ ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com