शैक्षणिक स्थित्यंतरे आणि सद्यस्थिती !

डॉ. विजय एम.जाधव, वाशीम
Wednesday, 7 October 2020

जगानं आजवर जेवढी काही उल्लेखनीय अशी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली ती केवळ शिक्षणामुळेच. म. फुले आणि सावित्रीबाईंनी शिक्षण हे व्यापक व्हावं म्हणून आपल्या आयुष्याचं रान केलं;डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान गाठलं,शिवाय आयुष्यभर शिक्षणाच्या बाबतीत अधिक जोर देऊन बोलत आणि लिहित राहिले. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाशिवाय होऊच शकत नाही असं ते ठामपणे सांगत राहिले. फुले दांपत्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  शिक्षण विषयक दृष्टिकोनांना अजिबात तडे जाऊ नयेत एवढीच अपेक्षा.

पृथ्वीवर सजीव सृष्टीची निर्मिती प्रक्रिया प्रारंभ झाली हे सगळ्यात मोठं वास्तव आणि आश्चर्य आहे. त्यातही प्रामुख्यानं मनुष्य निर्माण झाला हीच गोष्ट सर्वोच्च स्थानी मानायला हवी. कारण एकूण सर्व सजीवांमध्ये मनुष्य हाच एक विचार आणि त्या विचाराप्रमाणे कृती करू शकतो. त्याचं वेगळं वैशिष्ट्य हेच की, निसर्गाने त्याला अमर्याद अशी बुद्धी बहाल केलेली आहे. त्यानं यामुळे अचाट अशा स्वसामर्थ्यावर कठीणातल्या कठीण गोष्टींवर नियंत्रण मिळवलेलं आहे.

आजवर त्याने लावलेले विविध क्षेत्रातले आश्चर्यकारक शोध हे पृथ्वीचं अप्रतिम सौंदर्य म्हणायला हवं. शिवाय निसर्गानं सजीव सृष्टीच निर्माण नाही केली, तर प्रत्येक सजीवाच्याअन्नपाण्याची,संरक्षणाची गरजही बहाल केलेली आहे.अन्नपाण्यावरच सर्व सजीव जगतात,त्यातच मनुष्यप्राण्याचाही समावेश होतो. पण अन्न,वस्त्र,निवारा,आरोग्य एवढ्याच मूलभूत गरजा म्हणून पुरेशा नाहीत.जगता यावं म्हणून पोटाचे प्रश्न सुटणं म्हणजे पूर्णत्व आलं असं होत नाही. एवढाच मुद्दा लक्षात घेतला, तर मनुष्य फक्त जगू शकतो. आणि आपल्या वर्चस्वासाठी तो हिंस्त्र प्राण्यापेक्षाही अधिक हिंस्त्र होऊ शकतो. कारण अशा जगण्यामध्ये सुसंस्काराचा अंतर्भाव होत नाही.

तो बुद्धिमान आहे आणि म्हणूनच त्याच्या गरजेतून शिक्षण ह्या अत्यंत तेजस्वी अशा ऊर्जेचा तो शोध लावू शकला. शिक्षणामुळेच भाषेला ताकदवान बनवू शकला.वैज्ञानीक सांस्कृतिक,सामाजिक,कृषिविषक आणि शैक्षणिक अशी महत्त्वाची अनेकानेक क्षेत्रं आपल्या अचाट अशा बुद्धिबळावर त्यानं समृद्धीच्या उत्तुंग शिखरांवर नेऊन पोहोचविलीत. अन्नामुळे पोटाचा प्रश्न सुटतो आणि शिक्षणामुळे मनुष्य हा प्रज्ञावंत होतो. त्यामुळे ज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये त्याला शिरकाव करता येतो. त्यामुळे मनुष्याची विचार करण्याची एकूण शैलीच बदलून त्याला वैचारिक श्रीमंतीच्या बागेमध्ये आपलं महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करता येते. पोट आणि मेंदू हे दोन स्तंभच त्याच्यासाठी अधिक महत्त्वाचे समजता येतात. एकामुळे देह जगविता येतो, दुसऱ्यामुळे मनाला संस्कारक्षम बनविता येते.

माणसाला मन आहे आणि तेच त्याच्याकडून चांगलं वाईट कर्म करून घेते. त्या मनाला चांगल्या परिणामांसाठी संस्कारक्षम बनवावे लागते आणि ती जबाबदारी शिक्षणावर येऊन पडते. एवढंच नव्हे, शिक्षणामुळे ज्ञानवृद्धी होऊन मनुष्य आपल्या पोटाचे कठीण प्रश्न सोडवू शकतो. ही सगळी प्रेरणा ज्ञानसमृद्ध झालेल्या मेंदू कडूनच माणसाला मिळत असते. म्हणूनच शिक्षण वगळून मानवी सौंदर्य आणि समृद्धीचा विचारच करता येत नाही. कारण विविध विषयांसंबंधी यथोचित ज्ञान मिळवण्याचे सर्व मार्ग शिक्षणापासूनच सुरू होतात. अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आणि इतरांनाही जगू देण्यासाठी माणसांना विविधपूर्ण क्षेत्रांतल्या सखोल आणि परिपूर्ण ज्ञानाची अत्यावश्यकता असते. प्रत्यक्ष जीवन हे माणसांसाठी विद्यापीठ असलं तरीही संशोधित,तार्किक आणि प्रत्यक्ष अनुभवांधारीत ज्ञान हे पुस्तकांमध्ये साठवलेलं असते. ते मिळवायचं असेल आणि त्यासाठी पुस्तकांपर्यंत पोहोचायचं असेल तर शिक्षणाशिवाय अन्य कुठलाही पर्याय नाही. शिक्षणामुळे नोकरी, उद्योगांपर्यंत जाता येते असं नसून त्यातून मिळालेल्या ज्ञानामुळे मनुष्य डोळसपणे जीवन जगू शकतो. याचबरोबर लाचारीचं वा दुय्यम प्रकारचं लाजिरवाणं जिणं त्यागून तो स्वाभिमानानं,म्हणजे आपल्यातला न्यूनगंड विसर्जित करून वाटचाल करू शकतो. त्याला विविध प्रकारच्या सक्रीय अडथळ्यांपासून सावध राहता यावं म्हणून पावलापावलांवर सतर्क करण्याचे महत्त्वपूर्ण कामही शिक्षणच करू शकते.

शिक्षण हे एक सामाजिक स्तरावरही संघर्ष आणि विरोधाचा विषय होत गेलं. शिक्षणानं मनुष्य सज्ञान होतो. त्यामुळे राष्ट्रविकासात मदत होते. सामाजिक उन्नती मध्येही प्रभावी असं साधन शिक्षणाशिवाय अन्य कुठलंच नाही. तरीही शिक्षणाला जाणीवपूर्वक पक्षपातीपणाची अतूट अशी जोड दिली गेली. शिक्षणामुळे माणसं विशेषत:  तळागाळातलीही  चलाख होतात आणि तसं होऊ नये म्हणूनच शिक्षणाचा मक्ता प्राचीन काळापासून आपल्याकडंच ठेवणा-यांनी आधुनिक काळातही भेदभावाला जिवंत ठेवलेलं आहे.शोषणव्यवस्था टिकावी यासाठीच त्याला मर्यादित करण्याच्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. प्राचीन काळीही शिक्षण काय करू शकते हे तेव्हाच्या धूर्त लोकांना कळलेलं होतं. त्यामुळेच त्यांनी त्रैवर्णीयांना शिक्षणाचा हक्कच नाकारून आपलं अग्रस्थान मोठ्या हुशारीने टिकविलं. शिक्षणाअभावी अज्ञान कायम राहिलं. त्यामुळे वरच्या वर्गाला पिढ्यान् पिढ्या विनासायास शोषण करता आलं आणि या ना त्या प्रकारे त्यांच्यावर लादलेली गुलामी जगविता आली. केवळ ऐतिहासिकच नव्हे तर पौराणिक ग्रंथांतूनही विषय आणि जाचक अशा वर्णव्यवस्थेचे भरपूर दाखले मिळतात. एकलव्याला शिक्षण नाकारलं गेलं तेव्हा द्रोणाचार्यांचा गुरु म्हणून त्यानं पुतळा बनवला आणि त्यापुढे तो स्वयंप्रेरणेनेतून धनुर्विद्या शिकत राहिला.पौराणिक ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, त्याकाळी शिष्यानं गुरूला विद्या संपादनानंतर गुरुदक्षिणा द्यावी अशी प्रथा होती. प्रत्यक्षात त्या तथाकथित गुरुचा एकलव्याशी कसलाही संबंध नसताना केवळ श्रद्धेमुळे तो गुरुदक्षिणा द्यायला तयार झाला.त्याचा गैरफायदा घेत डाव्या हाताच्या अंगठ्याची मागणी करण्यात आली.यावरून भयानक वास्तवाची कल्पना करता येऊ शकते. मनुस्मृतीत तर कैक कठोर कायदे केलेले होते. या कायद्यांनी त्रैवर्णीय आणि अवर्णीयांच्या कैक पिढ्या शिक्षणाअभावी उद्ध्वस्त करण्यात आल्या.

पुढं ब्रिटिशांच्या काळात मात्र परिवर्तनानं आपलं डोकं काहीसं वर उचललं. पण जाचक रूढी-परंपरांच्या निर्मात्यांचे वंशज आपलं पारंपारिक हित अबाधित राहावं म्हणून शिक्षण क्षेत्रातही हस्तक्षेप करीतच राहिले.सर्वांनी शिक्षण घेण्याच्या नवमार्गनिर्मितीला ते  विरोधच करत राहिले. परिणामी व्यवस्थेतल्या विषमतेची दादागिरी माणसाळण्याच्या प्रक्रियेत सामील व्हायला नकारार्थी भूमिकेत राहिले. त्यात अशा काळात म. फुले यांनी स्वतः शिक्षित होऊन व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारलं. त्यांनी लोकजागृती आणि ऐतिहासिक संशोधनावर आपलं लक्ष केंद्रित केलं. दडपलेलं सत्य बाहेर काढून स्वैर असत्याच्या विषारी अस्तित्वावर त्यांना जबरदस्त आसूड ओढायला सुरुवात केली. ते दाहक लेखनाबरोबरच प्रत्यक्ष कृतिशील राहून सामाजिक कार्य पुढंपुढं प्रचंड ताकदीनिशी रेटत राहिले. त्याकाळी कुठल्याच स्त्रियांना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता. ती उणीव भरून काढणं ही त्या काळाची अत्यावश्यक अशी गरज होती. त्यांनी पारंपारिक नियमांना तडे देऊन आपली पत्नी सावित्रीबाईंना स्वतः मातीची पाटी बनवून साक्षर बनविले आणि पुण्यात देशातली पहिली मुलींची शाळा सुरू केली. असह्य झाल्यानंतर कर्मठांचा विरोध टोकाला गेला. त्यातूनच त्यांना ठार मारण्याचाही प्रयत्न झाला पण म. फुले यांच्या महान आणि अभूतपूर्व कार्यापुढं खुद्द मृत्यूनंही मान टाकून आपला पराभव झाल्याचं मान्य केलं.तरीही एक प्रश्न अजूनही कायम आहे भारतातल्या किती स्त्रियांना महात्मा फुले यांच्या ऐतिहासिक कार्याची जाण आहे? किती स्त्रिया त्यांना आपल्या उद्धारकर्त्याच्या भूमिकेत बघतात?  सावित्रीबाईंनी आपल्या पतीच्या कार्याशी स्वतःला जोडून स्त्री उत्थानासाठी किती खस्ता खाल्ल्यात आणि किती अपमानाच्या तोफांना त्या सामोरे गेल्या ? अशा प्रश्नांच्या अचूक उत्तरांपर्यंत किती स्त्रिया पोहोचतात? खेदजनक गोष्ट हीच दिसते की बलाढ्य संकटाशी निकराने झुंज देऊन वाटा निर्माण करणाऱ्यांना चांगले यशस्वीपणे दूर गेलेले लोक विसरतात वा  वाटानिर्मात्यांचा शोधच घेत नाही. 

पुढल्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी उपेक्षितांच्या शैक्षणिक आणि नोकरी विषयक हक्कांसाठी पुढाकार घेतला. पहिल्यांदाच आरक्षणही सुरू केलं. त्यांच्या निर्णयांवरही कर्मठवर्ग संतुष्ट नव्हता.पण तत्वतः खंबीर असलेले महाराज त्या कर्मठांच्या उचापतीना भीक घालत नव्हते. ज्यांना व्यवस्थेने माणूस म्हणून स्वीकारायलाच विरोध केलेला होता अशा सर्व उपेक्षितांचे महाराज स्वतः मार्गदाते आणि आश्रयदाते बनले. तेव्हाच्या त्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विदेशात उच्चशिक्षणाची एक एक पायरी चढत होते. अनेक विषयात उत्तुंग भरारी घेत होते. सोबतच जनजागृतीचं कार्य म्हणून पत्रकारीताही करीत होते. त्यांचं उगवत्या सूर्यासारखे स्थान नेमकेपणानं हेरून महाराज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सर्व प्रकारचे सामाजिक,आर्थिक,राजकीय आणि शैक्षणिक हक्क नाकारलेलाही कुणीतरी एक प्रत्यक्ष तथाकथित हक्कदारांपेक्षाही किती पुढे जाऊ शकतो हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं शिक्षण क्षेत्रात सर्वोच्च स्थान पटकावून प्रत्यक्षात दाखवून दिलं.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा काळ प्रामुख्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसाठी अतिमहत्त्वाचा आणि तितकाच तो जोखमीचाही होता. त्यांना वाटायचं की,देश उज्ज्वल भवितव्याच्या दिशेनं वाटचाल करू शकेल अशी सामर्थ्यवान संविधान निर्मिती व्हायला हवी. सोबतच,जनजागृतीचीही अत्यावश्यकता होती. त्यांची पक्की धारणा होती की, शिक्षणाशिवाय कुठलीच उन्नती होणे शक्य नाही. केवळ शिक्षणच महत्त्वाचं नाही, तर शिक्षणाला शीलाची त्यांनी जोड दिलेली होती. शीलाशिवाय शिकलेली माणसं अतीघातक असतात असं ते संगायचे. तेच एकमेव असे होते की, त्यांच्याइतकं शिक्षणाचं महत्त्व अन्य कोणीच पटवून दिलेलं नाही आणि त्या क्षेत्रात त्यांच्याइतके कष्ट इतर कोणीही घेतलेले नाहीत. मोठ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष व्हायची संधी त्यांच्याकडं चालून आली. सोबतच,त्यांनाच घटना निर्मितीची जबाबदारी पार पाडावी लागली.त्यांनी घटनेची उंची वाढवत नेत नेत ती जगातली एकमेव अशी सर्वोत्कृष्ट घटना म्हणून मानांकित केली. त्यात त्यांनी सर्वांसाठी शिक्षण खुलं केलं. आणि व्यवस्थेने दुबळ्या केलेल्या कोट्यावधी लोकांसाठी अडथळ्याशिवाय मुलांना शिकवता यावं म्हणून विशेष तरतुदीही केल्या. वंचितांना त्यांनी काळ्याकुट्ट इतिहासातून लख्ख उजेडात यायला संधी उपलब्ध करून दिली.

शिक्षणानंतर दुबळेपण कायम राहू नये म्हणून त्यांनी विशेष लोकांसाठी नोकरीविषयक आरक्षणाचीही घटनात्मक तरतूद केली.याचाच चांगला परिणाम म्हणून सर्वच वर्गातल्या मुलींही शिकायला लागल्या. दलितांबरोबर भटके-विमुक्त शिक्षणाकडं वळले. जे जे शिकले आणि ज्यांना ज्यांना नोकऱ्या मिळाल्या त्या सर्वांच जीवनमान उंचावलं.परंपरेनं शतकानुशतकं चालत येऊन अधिक घट्ट झालेला लोकांच्या मनातला न्यूनगंड जाऊन त्या ठिकाणी स्वाभिमान रुजला. हे घडायला लागलं केवळ शिक्षणामुळे. इतिहास नजरेपुढे येत राहिल्याने त्यांना वास्तव आणि अवास्तवाची जाणीव व्हायला लागली.शिक्षणामुळं ह्या देशातली अनेकविध दुर्लक्षित क्षेत्रं कमालीची प्रभावीत होत गेली. बाबासाहेबांमुळे सर्वच उपेक्षितांना सशक्त पंख आणि त्या पंखांना पुरेपूर बळ मिळालं.उच्चस्तरीय स्वप्न मिळालीत. पारंपारिक जीवनातली घाण आणि दुर्गंधी त्यागायला लोकांची मनं प्रवृत्त होत गेली. माणूस आणि माणूसकीचं मूल्य लोकांना नव्यानेच कळायला लागलं. बाबासाहेब हे ऊर्जाशील साहित्याचे प्रेरक झालेत. म्हणजे,वर्षानुवर्षांची कुजलेली मढी जिवंत होऊन ती नवप्रकाशात न्हाऊन निघायला लागली. शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत राहिला. खेडीपाडीच नव्हे, तर अतिदुर्गम आदिवासी,बंजा-यांच्या वस्त्यांपर्यंत शिक्षण पोहोचू शकलं.नोकऱ्या,उद्योग,विविध कलाक्षेत्रं,आणि इतरत्रही लोकांची दमदार पावलं पडायला लागली.

स्वतंत्र भारताच्या नव्या स्वतंत्र घटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत देशात सातत्याने कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात स्थित्यंतरं घडत राहिलीत. आपल्या संवैधानिक जबाबदारीपासून राजकीय क्षेत्र हळूहळू स्वतःला वेगळं करीत गेलं आणि त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम हळूहळू सर्व क्षेत्रावर होत राहिलेत. त्याला शिक्षणही अपवाद नाही.स्वातंत्र्यपूर्व भारताची प्रतिमा नव्याने निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. त्यामुळे तिथल्या संविधानप्रेमी असलेल्या जनतेला परकीयांविरुद्ध नव्हे, तर स्वकीयांविरोधातच लढण्यातच आपली शक्ती खर्ची करावी लागत आहे. आपल्या हक्कांसाठी भांडतांना प्राण गमवावे लागत आहेत, काहींना कारागृहांमध्ये मरण यातना भोगाव्या लागत आहेत. पूर्वी कधीही न घडलेलं आता उघड्या डोळ्यांनी बघावं लागत आहे.देश संकटात पडलाय केवळ नेतृत्वाच्या संविधानविरोधी भूमिकांमुळेच. अशा या अस्वस्थतेच्या गंभीर काळात सर्व जगाबरोबर आपल्याही देशावर कोरोना व्हायरसनं झडप घालून आधीच्या महासंकटात आणखी नवी भर घातलेली आहे.

कोरोना व्हायरस विषयी गरजेपेक्षा जरा अधिकच भीती निर्माण करून ती माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्यात आली.त्याला रोखण्यासाठी उपाययोजना अचूकपणे अमलात आणल्या गेल्या  नाहीत.शिवाय,नंतर कुठलंही व्यवस्थित नियोजन न करताच संपूर्ण देशावर अचानक जाचक स्वरूपाचं लॉकडाउन लादण्यात आलं. त्यामुळे गोरगरिबांचं कंबरडंच मोडलं, त्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या बलाढ्य लोकांना कसलीच झळ पोहोचली नाही. हवं ते सर्व काही त्यांना वेळच्या वेळी मिळत गेलं. त्यातच प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली.देशभरातला उदरनिर्वाहासाठी अनेक सोयीच्या राज्यांमध्ये गेलेला श्रमिकवर्ग जागच्या जागी अडकला.केवढी मोठी शिक्षा म्हणावी ती ! कारखानेही बंद पडले. कोट्यावधी गरजवंतांच्या नोक-या हातातून निसटल्या. नवीन रोजगारांची दारे कुलूपबंद करण्यात आली. श्रमिकांपाठोपाठ छोटे छोटे व्यापारी आणि कसलेसे इवलाले उद्योग करणारे हवालदिल झाले.लोकांच्या प्रश्नांच्या फौजा उध्वस्त करीत राहिल्या. त्यात किराणेवाले,इतर जीवनोपयोगी वस्तूंचे पुरवठादार, दवाखाने आणि औषध विक्रेत्यांना चांगले हंगामाचे दिवस राहिले. एकूणच, नुकसान तसं पुष्कळ क्षेत्रांमध्ये झालं; परंतु त्याहीपेक्षा सर्वाधिक नुकसान शिक्षणक्षेत्राचं झालं.शाळा आणि महाविद्यालये बंद पडली. काहींचे परीक्षांचे निकाल उशिरा आल्याने पुढील प्रवेश प्रक्रिया अद्याप थांबलेली आहे. महाविद्यालयांच्या परीक्षा तर आणखीच लांबणीवर पडल्या.त्यात प्रवेश मिळालेल्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उभा करण्यात आला;पण त्याचा फायदा केवळ श्रीमंतांनाच होत आहे.महागड्या मोबाईल फोनचे उपकरणं अर्धपोटी राहणाऱ्यांना विकत घेता येणे असे शक्य होणार ? म्हणजे, पुन्हा इतिहासात गेलेले जुने त्रासदायक दिवस येणार! अशा परिस्थितीत गोरगरिबांना शिक्षण म्हणजे दुर्मिळ स्वप्नासारखं होईल. श्रीमंतांशी हा वर्ग स्पर्धाच करू शकणार नाही. अशा पार्श्वभूमीवर सरकार आपलं कर्तव्य पार पाडीलच याची कुठलीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. खरंतर, ही मुलं शिक्षणवंचित होणं ही फार मोठी राष्ट्रीय हानी म्हणावी लागेल.

आणखी,इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणारी मुलं ही केवळ श्रीमंतांचीच असतात.त्यांच्या शाळा म्हणजे गोरगरिबांच्या स्वप्न मर्यादेपलीकडली गोष्ट! त्या शाळा ऑनलाईन सुरू करण्यात आलेल्या आहेत.मुलं-मुली घरच्या घरी राहून शिकताहेत,पण त्या मोबाईल फोन नावाच्या उपकरणाचेही दुष्परिणाम त्या मुला-मुलींच्या डोळ्यांवर आणि मानसिकतेवरही होतात. अशी मुलं सवयीच्या आहारी गेलेली असल्यामुळे भविष्यात एकलकोंडी होऊ शकतात.ती माणसं आणि माणुसकी पासून स्वतःला वेगळे समजू शकतात.अशा मुलांमुलीचं भवितव्यही अपेक्षेपेक्षा वेगळे आणि तकलादू असेल. ही अतिशय गंभीर बाब दुर्लक्षित करून चालणार नाही.

 महाविद्यालयीन परीक्षांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. रोज नवीन नियम जाहीर होत असल्याने विद्यार्थी पूर्णतः गोंधळून गेला आहे.विशेष म्हणजे, शिक्षणाच्या क्षेत्रातही सरकारने घेतलेले निर्णय अचुकच असतात असंही नाही. बरीच धोरणं ही विसंगत असल्याने या क्षेत्रांवर गंभीर झाले आहेत. कोरोनापूर्वी परीक्षा घेतली गेली नाही.आता कोरोनाचं कार्यक्षेत्र आणि दुष्परिणाम अधिकाधिक वाढत चाललेल्या या काळात म्हणतात की, परीक्षा घ्या. तरीही जर परीक्षा घ्यायचीच आहे तर मग महाविद्यालय बंद कशाला ठेवली गेली ? दुसरी गोष्ट,जर ती बंद ठेवायची तर वर्षभरासाठी बंद ठेवायला हवीत.कारण सध्याची शिक्षणव्यवस्था विद्यार्थ्यांसाठी अतिशय घातक ठरू शकेल अशीच आहे. याचे दूरगामी परिणाम अतिशय भयंकर असतील. वास्तव हे आहे की, महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांबाहेर राहून विद्यार्थी खरेखुरे शिक्षण घेऊ शकत नाहीत. यात विशेषत: गरिबांच्या मुलांचे होणारे नुकसान हे भविष्यातही भरून निघू शकेल असं वाटत नाही.

ऑनलाइन शिक्षण पद्धती बंदच ठेवायला हवी. असं चाललं तर भविष्यात शिक्षकांच्या नोक-या धोक्यात येतील. पर्याप्त नोकर भरतीची गरजच उरणार नाही. शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारतींना जीर्ण पडक्या वाड्यांचे स्वरूप प्राप्त होईल. त्यात,नेमका देशविकासाचा पाया म्हणून जो विद्यार्थी आहे तोच घडणार नाही आणि त्यामुळे देशाचं भवितव्यही काळोखलेलं असेल. संभाव्य अराजक देशापुढं अतिबलाढ्य शत्रू म्हणून उभे राहिल आणि मग त्याला नियंत्रणात आणणे अशक्य होईल. 

सध्या ऑनलाईनच्या पर्यायांचा आणखी विचार केल्यास गंभीर वास्तव नजरेस पडते. पहिली गोष्ट म्हणजे गरिबांकडं आणि खेड्यापाड्यांतल्या बहुतांश लोकांकडं हवेत असे मागडे मोबाईल फोन नाहीत. ज्यांच्याकडं आहे अशांची संख्या अगदीच नगण्य किंवा अत्यल्प आहे. शिवाय आर्थिक स्थिती ही बळकट नसल्यामुळे नेटबॅलन्सचाही मोठा प्रश्न उभा राहतो. खेड्यात आणि अति दुर्गम भागांत नेहमीसाठी वीजही उपलब्ध नसते. तशातच हवं तेव्हा नेट असेलच याची शाश्वती नसते. यांवरून एवढेच मान्य करावं लागते की ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय हा वरून आकर्षक वाटत असला तरी प्रत्यक्षात तो हानिकारकच आहे.

शेवटी सारांशरुपात बोलायचं झाल्यास, जगानं आजवर जेवढी काही उल्लेखनीय अशी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली ती केवळ शिक्षणामुळेच. म. फुले आणि सावित्रीबाईंनी शिक्षण हे व्यापक व्हावं म्हणून आपल्या आयुष्याचं रान केलं;डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान गाठलं,शिवाय आयुष्यभर शिक्षणाच्या बाबतीत अधिक जोर देऊन बोलत आणि लिहित राहिले. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाशिवाय होऊच शकत नाही असं ते ठामपणे सांगत राहिले. फुले दांपत्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  शिक्षण विषयक दृष्टिकोनांना अजिबात तडे जाऊ नयेत एवढीच अपेक्षा.

(लेखक - राजस्थान महाविद्यालय, वाशीम येथे कार्यरत. भ्रमणध्वनी:-९८८१५२७६६०)

(Edited By Pratap Awachar)

इतर ब्लॉग्स