शिक्षणामध्ये गुगलमॅप्सचा प्रभावी पध्दतीने होणारा वापर

राजकिरण चव्हाण,
गुरुवार, 25 जून 2020

दिवसागणिक शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय आणि याचा सकारात्मक परिणामसुद्धा आज वाढताना दिसून येतोय. खासकरून कोरोनाच्या काळातील ऑनलाईन शिक्षणात तर हे जास्तच अधोरेखित होत आहे असं दिसतंय. आजच्या लेखात आपण 'गुगल मॅप्स'चा शिक्षणात किती नाविन्यपूर्ण उपयोग करता येऊ शकतो याविषयी समजून घेणार आहोत. 

दिवसागणिक शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय आणि याचा सकारात्मक परिणामसुद्धा आज वाढताना दिसून येतोय. खासकरून कोरोनाच्या काळातील ऑनलाईन शिक्षणात तर हे जास्तच अधोरेखित होत आहे असं दिसतंय. आजच्या लेखात आपण 'गुगल मॅप्स'चा शिक्षणात किती नाविन्यपूर्ण उपयोग करता येऊ शकतो याविषयी समजून घेणार आहोत. 
'गुगल मॅप्स' हे नाव आज अनेकांना परिचित आहे. आज प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये हे ऍप बाय डिफॉल्ट आपल्याला पाहायला मिळतं. कारण आता अनेक कंपन्यांना हे ऍप मोबाईलमध्ये इन्स्टॉल असण्याची गरज वाटते. पण आपण याला शैक्षणिक दृष्टिकोनातून कसं वापरावं? यासंदर्भात विचार करणार आहोत. गुगल मॅप्स हे असं अप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये आपण कोणत्याही दोन ठिकाणातील अंतर सहजरित्या शोधून काढू शकतो. त्याचबरोबर या दोन ठिकाणांना सर्वात जवळच्या कोणत्या मार्गानं जाता येईल हे आपण पाहू शकतो. या मार्गात येणारे वाहतुकीचे, रहदारीचे अपडेट्‌स अर्थात 'ट्राफिक अपडेट्‌स' आपल्याला लगेच मोबाईलवर कळू शकतात. तसंच या दोन ठिकाणात कोण कोणत्या वाहतूकमार्गानं (पायी चालत, मोटारसायकल, बस, ट्रेन आदी) जाऊ शकतो हेही पर्याय इथं पाहायला मिळतात. या दोन ठिकाणांना मॅप मध्ये आपण झूम करून सुद्धा पाहू शकतो. 
भूगोलमध्ये तर गुगल मॅप्सला खूप खुबीनं उपयोग करून घेऊ शकतो. कारण यामध्ये भूरूपे, वाहतुकीची साधनं, नकाशा वाचन, क्षेत्रभेट, शैक्षणिक सहली आदी गोष्टी येत असतात. त्या आपण गुगल मॅपच्या मदतीनं समजून घेऊ शकतो. 
गुगल मॅप्स च्या माध्यमातून दोन व्यक्तींना त्यांचं सध्याचं लाईव्ह लोकेशनही शेअर करता येतं. आपण ज्या वेळेस शाळेच्या शैक्षणिक सहली आयोजित करतो, त्यावेळेस आपण कोणकोणत्या ठिकाणी जाणार आहोत किंवा जायचं आहे याचं पूर्वनियोजन गुगल मॅप्सच्या माध्यमातून करू शकतो. वाटेमध्ये कुठं थांबायचं? कुठं जेवण करायचं? प्रवासासाठी किती कालावधी जाणार आहे? आपण हे सर्व पाहून परत कधी येऊ?, अंदाजे खर्च किती होऊ शकतो? (या गोष्टी वाहतुकीची साधने व अंतर याच्या माध्यमातून अंदाजे खर्च सुद्धा काढू शकतो), त्याचबरोबर गुगल मॅपच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला असलेले एटीएम, पेट्रोल पंप, शाळा दवाखाने, विविध प्रार्थना स्थळं, तसेच विविध प्रेक्षणीय स्थळं आदी गोष्टी शोधणं, त्यांच्यातील अंतर काढणं, त्यासाठी लागणारा अंदाजे वेळ या सगळ्या गोष्टी आपण गुगल मॅप च्या माध्यमातून काढू शकतो. 
एकदा का तुम्ही एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी ठरवलं तर त्याचं जर तुम्ही नेव्हिगेशन अर्थात दिशादर्शक चालू केलं तर आपल्याला मार्गक्रमण करताना पुढं कोणत्या दिशेला वळायचं आहे, कुठला रस्ता कुठं बदलायचा आहे याचे अपडेट्‌स आपल्याला आवाजाच्या माध्यमातून गुगल मॅप वर उपलब्ध होऊ शकतात. आपण चालत, मोटरसायकलवर, बस किंवा ट्रेनने गेल्यावर अंदाजे किती वेळ लागू शकतो हेही यातून आपल्याला कळू शकतं. 
गुगल मॅप्समुळे विद्यार्थ्यांना आपलं आसपासचं जग कसं आहे याचं एक दृश्‍यस्वरुप डोक्‍यामध्ये तयार होतं. ज्यामुळं हे जग समजून घेण्यास त्यांना उपयोगी होऊ शकतं. गुगल मॅप्स भूगोलच्या शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या दरम्यान आंतरक्रिया करण्यास खूप मदत करतं. कारण गुगल मॅप्स मधून मिळालेली माहिती, त्याच्यातून आपलं ज्ञान पक्क होतं आणि त्यातून एखाद्या गोष्टीबद्दल विचार करण्याची व निर्णय घेण्याची क्षमताही विद्यार्थ्यांमध्ये वाढू शकते. म्हणून मला असं वाटतं की, गुगल मॅप्स चा शिक्षणामध्ये वापर करणं खूप उपयोगी गोष्ट ठरु शकते. 

मोबाईल क्र. 
7774 883388 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या