छोट्या, छोट्या गोष्टीत असतो आनंद..!

- मनीषा कोकीळ, औरंगाबाद
रविवार, 28 जून 2020

स्टेट सायकॉलॉजिस्ट असोसिएशन (स्पा) म्हणजेच राज्य मानसशास्त्रज्ञ संघटना यांच्यातर्फे मे महिन्यात म्हणजेच लॉकडाउनच्या काळात राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धा घेण्यात आली. या राज्यस्तरीय स्पर्धेला राज्याबाहेरूनही तसेच परदेशातूनही प्रतिसाद लाभला. एका आठवड्याच्या कालावधीत दीडशेच्या आसपास निबंध आले. "लॉकडाउन... मी आणि माझे मनःस्वास्थ्य' या विषयावर ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील महिला गटातील उत्तेजनार्थ पारितोषिकप्राप्त हा निबंध...

आज खूप दिवसांनंतर कपाटातील डायरी काढून वाचायला सुरवात केली. डायरीत काही नोंदी होत्या. "पाडव्याला शुभदिनी लग्नाचा मुहूर्त करणे', "अक्षय तृतीयेला दागिन्याची खरेदी करणे' अशा तीन-चार महिन्यांच्या नियोजनाच्या नोंदी त्यात होत्या. त्याला कारणही तसेच होत. डिसेंबरला 2020 ला माझ्या मुलीचे लग्न आहे, त्याची तयारी मनात चालू होती. कुठलेही काम नियोजनबद्ध काटेकोर करण्याचा स्वभाव आहे व त्याचा थोडा अहंकारपण आहे. आनंदाचा आणि उत्साहाचा मूड होता. अन्‌ अचानक बातमी आली, संपूर्ण देश lock down मध्ये गेला आहे. सगळे plans आता पुढे ढकलले जाणार म्हणून दु:ख झाले, अहंकार गळाला. नियोजनात अशी अडचण येईल अशी कल्पनासुद्धा नव्हती. इतर अडचणींचा विचार केला होता व इतर शक्‍यतांचा विचार करून ठेवला होता. पण अशी परिस्थिती येईल असे वाटले नव्हते; आता काय? साहजिकच माझ्या मनात प्रतिक्रिया आली... नेमकं यावेळेस असे का झाले? आपल्याच बाबतीत असे का झाले? वगैरे.. वगैरे.. दुसऱ्याच क्षणी जाणवले की मुलीला माझे विचार कळाले तर... बापरे! खूप निराश होईल.. नैराश्‍य म्हणजे दुसऱ्यांना दोष देणे आणि दु:ख म्हणजे घटनेमुळे निर्माण झालेली परिस्थिती. corona मुळे अनेकांचे लग्न पुढे ढकलले गेले. त्यापेक्षा आपण बरे असे वाटले आणि निराशा व दु:ख यामधला फरक लक्षात घेतला. आता मी दु:ख या भावनेवर आले. 

प्रतिक्रियेमधून प्रतिसादाकडे आले तर तणाव कमी होतो असे वाचले होते. प्रतिसादात्मक कृती करण्याचे ठरविले. lock down सुरू झाला आणि दोन-तीन दिवस खूप नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्या सगळ्यांनाच येणार हेही माहीत आहे. पण या परिस्थितीला प्रतिसाद देऊन माझे व माझ्या कुटुंबाचे मन:स्वास्थ्य कसे चांगले ठेवायचे, याचा विचार सुरू झाला. हे आव्हान मी स्वीकारले आणि येणाऱ्या संकटांना तोंड द्यायचे ठरविले. 

आव्हान माझे तुम्हाला, चालून या माझ्यावरती ! 
धैर्याचि कट्यार माझी, पाजळे तुमच्यावरी ! 
संकटांनो सावधान, गाफील मी असणार नाही .! 
मी सावधान आहे म्हणूनच...! 

या lock down नंतर ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी उत्साह कायम टिकवणे आता गरजेचे आहे. आपली उत्पादक क्षमता टिकवणे आणि त्यातून स्वत:चे बळ, आत्मविश्‍वास वाढवायचा असे मी ठरविले आहे. ही उत्पादकता कंटाळवाणी होऊ नये, यासाठी त्यामध्ये कल्पकता, सृजनात्मकता आणण्याचे ठरविले. यातून संयम वाढवून सक्षमपणे बाहेर पडायचे आहे. त्यासाठी स्वत:ला तयार करायचे, असे मी ठरविले व त्याप्रमाणे दिनक्रम तयार केला. 
शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक गोष्टीला दिवसभराचा वेळ दिला. कुटुंबाबरोबर सकारात्मक, सृजनात्मक वेळ घालवीत आहे. माझे skeches चांगले कसे होतील, माझा dance कसा चांगला होईल. त्यामध्ये गुणात्मक वाढ करीत राहिले. माझी, कुटुंबाची प्रतिकारशक्ती कशी वाढेल, याकडे लक्ष देऊन वेगवेगळ्या पाककृती चालू आहेत. मुलीच्या सहवासात राहून तिच्याशी मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे. कदाचित धावपळीत हे जमले नसते. प्रत्येक घटनेमागे डावी, उजवी बाजू असते. ती पाहायला पाहिजे. छोट्या, छोट्या गोष्टीत आनंद असतो हे नव्याने समजले आणि आनंद झाला. 
विचार, भावना, कृती यांचा मेळ घालून एकत्रित करून mindfulness साधण्याचा प्रयत्न करीत आहे. कुटुंबातून स्वावलंबन व परस्परावलंबन शिकत शिकत पुढे जायचे आहे. covid- 19 या आजाराची मनात भीती आहेच, पण काळजी करण्याऐवजी काळजी घेणे हा मंत्र शिकले. अनिश्‍चितता पूर्वी होती. आजही आहे, उद्यापण राहणार आहे. म्हणून भीतीवर मात करणे गरजेचे आहे. भविष्यात काम करण्यासाठी उत्साह, ऊर्जा टिकवायची आहे. त्याबरोबर आपोआप मन:स्वास्थ्यही टिकेल. 

विचार मनाला म्हणतात........ 
काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा 
काही दिसत नसतं 
तुमच्यासाठी कुणीतरी दिवा 
घेऊन उभं असतं 
तुम्हीच ठरवा काळोखात 
कुढायचं की प्रकाशात उडायचं...!
 

मी प्रकाशात उडायचं ठरविले आणि माझ्या मनाने भरारी घेतली. 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या