गावाकडची कोरोनाची धास्ती... 

मतीन शेख
सोमवार, 23 मार्च 2020

ये गावाकडे, बघ सुट्टी मिळतेय का ते, नाय तर राहू दे ती नोकरी...

  घराकडून रोज दोन तीन वेळा फोन येतो... 
ये गावाकडे, बघ सुट्टी मिळतेय का ते, नाय तर राहू दे ती नोकरी... महापूराच्या वेळी पण हीच घालमेल, कसं तरी समजवायचं... 
मी नाही मिळणार सुट्टी म्हणुन सांगुन टाकतो... पण काळजी करु नका मी ठिक असतो असं ही नमुद करतो... सध्या बंधू पण कोल्हापूरातच आहे... त्यामुळे त्यांना दुहेरी काळजी... 
 विद्यापीठ बंद झालं अन् मी आसऱ्याला परत गंगावेश तालीम गाठली, पण तालीम ही आता ओस पडत चाललीय... सगळी मुलं गावाकडे परतलीत. शाळा, वसतिगृहे सर्व रिकामी झालीत... 

कोरोना नावाच्या व्हायरस ने ही सगळी प्रत्येकाच्या मनात धडकी भरवणारी कृती केलीय. चीनच्या हूआन शहरा पासुन या व्हायरसचा संसर्ग वाढत चालला आणि पाहता पाहता संपुर्ण जगाला त्याने वेढा घातला. आंतरराष्ट्रीय जगतात याचे स्पष्ट आणि गंभीर असे परिणाम जाणवु लागले आहेत. मग घटने मागची कारणे शोधतात हे एक Iindustrial War चा एक भाग आहे किंवा Biological Weapon चा परिणाम आहे अशी अनेक धक्कादायक अंदाज समोर येत राहिले परंतु या व्हायरसमुळे अनेक राष्ट्रातील वित्तीय तसचे मनुष्यांची हानी होत आहे. जगभरात ३ लाख ४१ हजार लोकांना या जीवघेण्या व्हायरसची लागण झाली तर आत्ता पर्यत १४ हजाराच्या पुढे मृत्यूचा आकडा गेला आहे. या सर्व धक्कादायक आकडेवारीतील दिलासा देणारी बाब म्हणजे १ लाखाच्या आसपास लोक कोरोना व्हायरसच्या संक्रमणातुन पुर्ण बरी झाली आहेत.चीन नंतर इटली या देशात सर्वांधिक लोक या व्हायरसच्या गर्तेत आले आहेत. भारतात महाराष्ट्र राज्यात या व्हायरसची सर्वांधिक लागण झालीय.ही गोष्ट आपली चिंता वाढवणारी आहे. 

या संकटातुन सावरण्यासाठी प्रशासन महत्त्वाची पावले उचलत असताना लोक मात्र त्याला योग्य तो प्रतिसाद देत नाहीत असं पुढे येत आहे. संचार बंदी असतानाही लोक बाहेर समुहाने फिरत आहेत.यात एक काळजीची गोष्ट अशी घडतेय की गेल्या काही दिवसात पुणे, मुंबईला राज्यभरातील ग्रामीण भागातील लोक रोजगाराच्या,नोकरीच्या तसेच शिक्षणासाठी असणारी लाखो लोकांचे लोंढे गावाकडे परतत आहेत. गेल्या दोन तीन दिवसात रेल्वे स्थानक, बस स्थानक ही गर्दीनी व्यापली होती. यात अनेक मंडळी अशी होती ज्यांना होम क्वारेन्टाइन सांगितलं होतं तरी ती भिनदास्त प्रवास करताना दिसुन आली. हा सर्व बिगरकाळजीचा जीवघेणा खेळ लोक खेळत आहे.अगदी गावात जत्रा भरावी अशा प्रकारे शहराकडून मिळेल त्या वाहनाने माणसांचे थवेच्या थवे गावाकडे उतरत आहेत. जर यातुन संक्रमण वाढत गेलं तर गावगाड्यांनाही हा विषाणु आपल्या कवेत घेण्याचा खुप मोठ्ठा धोका पुढे येत आहे. लोकांनी अधिक जागृत होत स्वतःची आणि त्या बरोबर इतरांची ही काळजी घेणं गरजेचं आहे.गावाकडे परतलेल्या माणसांची प्रशासनाने योग्य ती आरोग्य चाचणी करत त्यांना गावातल्या लोकांपासून काही दिवस लांब ठेवण्याची गरज भासत आहे. कारण गावाकडे राहणारी लोकं शहरातून आलेल्या आपल्या लोकांनाची धास्ती घेत आहेत. 

या कोरोना व्हायरस ने संपुर्ण जगाची गती मंद केली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी अधिक जागृत होत स्वतःची काळजी घेत, घाबरुन न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याची खरी गरज सध्या आहे...

इतर ब्लॉग्स