
Ghar Banduk Biryani : 'बिरयानी' आवडली तर खायची, नाही आवडली तर...? पण...
Ghar Banduk Biryani Nagraj Manjule marathi movie : तुम्ही अमूक एखाद्या दिग्दर्शकानं तयार केलेल्या त्याच्या मास्टर कलाकृतीचे चष्मे त्याच्या प्रत्येक कलाकृतीला कसे काय लावू शकता, अशानं त्याच्याविषयीच्या अपेक्षांचे ओझे वाढून आपला भ्रमनिरास होण्याची शक्यता अधिक असते. एखादा चित्रपट, त्याचा आशय, विषय, संवाद, संगीत, कलाकार आणि त्याचे सादरीकरण हे पूर्वीच्या त्या कलाकृतीपेक्षा वेगळे असू शकते की, त्याला काही कारणेही असतील. कोणतीही कलाकृती त्याला एक वेगवेगळे संदर्भ असू शकतात.
मग तो संदर्भ तत्कालीन घडामोडींचा असेल, भूतकाळातील काही घडामोडींचा असेल, राजकीय, सामाजिक संदर्भ असेल पण त्याचा आपण थोड्या संयमानं विचार करावा लागतो. चित्रपटामध्ये दिग्दर्शकाला जे काही सांगायचे आहे ते त्यानं कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडले आहे. ते त्यानं गाणी, कथा, पटकथा, कलाकार आणि त्यांचा अभिनय यातून आपल्यापुढे ठेवले आहे.
यासगळ्या मांडणीमध्ये, सादरीकरणामध्ये फरक असू शकतो. त्या सादरीकरणातच खरी मजा आहे. प्रत्येक दिग्दर्शकाची ती शैली मात्र वेगळी आहे. काहींना वेगवान पद्धतीनं ती गोष्ट मांडायला आवडते काहींनी ती थोड्याशा वळसा घालून संथ गतीनं सांगण्यात गंमत वाटते.
आपल्यापर्यत आशय कशाप्रकारे पोहचला तो तितकासा प्रभावी होता का, त्या आपल्याला प्रभावी वाटण्यामागे काय कारणं होती, चित्रपट त्यातील चित्रप्रतिमा, खुणा, वेगवेगळे संकेत, यातून आपल्यापर्यत अर्थ पोहचला का, वेशभूषा, रंगभूषा, छायाचित्रण, संकलन याचीही भूमिका तितकीच महत्वाची आहे. हे सारे आपल्यापर्यत आशय पोहचविण्याचेच तर काम करत असतात.

Ghar Banduk Biryani
तांत्रिकदृष्ट्या अनेकदा आशय वेगळ्या सापटीत सापडतो तेव्हा मात्र प्रेक्षकांचा गोंधळ होतो. पूर्वीची त्याची कलाकृती आवडली मात्र आताची नाही. त्यामागे प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, त्यात वाद नाही. पण अनेकदा आपण पूर्वीच्याच गोष्टी डोक्यात ठेवून त्या कलाकृतीचा आस्वाद घेत असू तर मग गोंधळ नक्कीच होणार. त्यामुळे नवं काही पाहताना जुन्याचा संदर्भ खिशात असावा, डोक्यात नको. चित्रपटाच्या विषयाशी संबंधित जुना संदर्भ पड़ताळून पाहण्यासाठी तो खिशात असावा असे वाटते. डोक्यात असला की मग दिग्दर्शकानं नवं सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्याला जुनेच वाटायला लागते.

Ghar Banduk Biryani
कोण काय म्हणते यापेक्षा आपल्याला काय वाटते, काय जाणवले हे जास्त महत्वाचे, चित्रपटाचा विषय नवीन आहे का, पठ़डीतल्या चित्रपटांपेक्षा तो काही वेगळे सांगू पाहतो आहे का, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजवर असा प्रकार झाला आहे का, कलाकार कोण आहेत, त्यांच्या भूमिका कशा आहेत, गाणी, संवाद, संगीत, सादरीकरण, इतर तांत्रिक बाजू याकडेही थोडं लक्ष दिलं की, बऱ्याचशा गोष्टींबाबतचा राग कमी होण्यास मदत होते. आपण चांगलं म्हणो किंवा वाईट त्यामागे आपली स्वताची कारणं हवीत. स्वताचे मत हवे. दुसऱ्याचं नको. यातून किमान आपल्याला काय कळले आहे याची जाणीव होते हे जास्त महत्वाचे.
बाकी कोण दिग्दर्शक, कोण कलाकार, कोण निर्माता, हे सगळं प्रत्येकवेळी बदलत असतं. पण आपण नवनवीन कलाकृतींना थोडासा माईंड सेट बदलून सामोरं गेलो की, अनेक गोष्टी नव्यानं कळतात. प्रयोगशीलता जपली पाहिजे असे आपण म्हणतो, पण ती प्रत्यक्षात आपल्या समोर आल्यावर आपण त्याला वेगळाच रंग देतो. हेही दिसून आले आहे. जे आहे ते मुक्तपणे, कोणतेही आढेवेढे न घेता पाहायला शिकलं पाहिजे. मत, प्रतिक्रिया नोंदवण्याची घाई कशाला, जमलं तर मोठ्या मनानं कौतूक करुया, नाही जमलं तर का नाही आवडलं हेही संयमानं सांगूया, एवढं सोप्पं आहे.
पूर्व अनुभवातून कोणत्याही कलाकृतीकडे पाहणे हे प्रेक्षक म्हणून आपल्यासाठी देखील निरस करणारे आहे. त्यामुळे आनंदासाठी कला आहे. चांगला प्रेक्षक, श्रोता, वाचक, रसिक होण्यासाठी आपल्या स्वताला देखील अभ्यास करावा लागतो. ते काही इतक्या सहजासहजी येत नाही. आपली तेवढी तयारी झाली की मग काय हरकत नाही कुणालाही उभं आडवं फैलावर घेण्याची. पण एवढं पुढं जाण्यापूर्वी समोर आलेली बिरयानी खायला काय हरकत आहे?