गोफण| तुमची 'केरळ स्टोरी' वेगळी आमची वेगळी... Gofan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gofan Article

गोफण| तुमची 'केरळ स्टोरी' वेगळी आमची वेगळी...

'मातब्बर-श्री' गडाचे राजे उधार ठाकूर सकाळपासूनच अवस्थ होते. उशिरा उठल्यामुळे त्यांना घराबाहेर पडायचं मन होत नव्हतं. नाहीतरी घरात बसण्यासाठी त्यांना किरकोळ कारणही पुरेसं असे. आजची त्यांची घालमेल निराळी होती. एका सिनेमानं त्यांची पुरती झोप उडवलेली. सिनेमा बघून आल्यापासून त्यांची स्थिती बिकट झाली. अन्न-पाण्यावरुन वासना उडाली होती, खानसामे कमरेत वाकून वाकून दोन घास खाण्याचा आग्रह करीत. परंतु रात्रीपासून त्यांनी अन्नाचा कण घेतला नव्हता.

शेवटी वैतागून भल्या पहाटे त्यांचे जिवश्च कंठश्च बोलभांडे रौत यांना सांगावा धाडला. तिकडून रौतांनी त्याच सांगाव्यासोबत परतीचा निरोप धाडला, 'प्रहरी होणाऱ्या नऊच्या वार्तालापानंतर कूच करु, उधार राजेंनी जरा धीर धरावा' बोलभांडेंचा हा निरोप ऐकून उधार ठाकुरांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. 'हे जरा अति होतंय' असं म्हणून त्यांनी बागेत येरझाऱ्या घालायला सुरुवात केली.

कधीकाळी याच 'मातब्बर-श्री' गडाला अभेद्य तटबंदी होती. गडासमोरच्या वाटेनं जाणाऱ्यास मान उंचावून बघण्यास परवानगी नसे. पण आज काळ बदलला. गडावर इतके हल्ले झाले की तटबंदीच्या नावाखाली मोठमोठे तडे गेलेली भग्न भींत उभीय नुसती. ११ महिन्यांपूर्वी त्या तड्यांमधून ४० शिलेदार पळून गेले होते म्हणे.

तेव्हापासून उधार ठाकुरांना एका महाशक्तीची भीती बसलीय. कधी-कधी ते रात्रीही दचकून उठतात. मांजर जरी अचानक पुढ्यात आलं तर त्यांना वाघ आल्याचा भास होतो. मागे एकदा जाहीर सभेत फटाका वाजला म्हणून ते जरावेळ बेशुद्ध झालेले. असं असलं तरी महाशक्तीच्या आक्रमणापुढे आपला सवता सुभा अढळ ठेवण्याचा निश्चय उधार राजेंनी केला.

रात्री केरळदेशीचा एक सिनेमा बघितला अन् त्यांची झोप उडाली. चित्रपट आवडला होता की नव्हता? याचं उत्तर त्यांच्याच मनाने त्यांना दिलं नव्हतं. परंतु भूमिका काय घ्यावी, याचं कोडं सुटत नव्हतं. म्हणूनच त्यांनी भल्या पहाटे सांगावा धाडून बोलभांडे रौत यांना बोलावलं होतं. रौत अजूनही आले नव्हते. आताशी कुठे नऊ वाजलेले. अजून तासभर तरी त्यांचा 'वृत्तप्रसुती'चा कार्यक्रम चालेल, जमलेले मंत्रमुग्ध झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, हे उधार राजेंना चांगलं ठाऊक होतं. म्हणून त्यांनी मोबाईल काढून सुरु असलेलं थेट प्रक्षेपण बघायला सुरुवात केली तर बोलभांडे महाशय तावातावानं त्याच सिनेमाबद्दल बोलत होते. ते ऐकून इडकच्या स्वारींचा संताप अनावर झाला...

जरावेळ वाट पाहिल्यानंतर बोलभांडे भिंतीच्या एका भगळीतून झपाझप पावलं टाकत आत आले. शर्टच्या बाह्या दुमडल्या, नाकावर घसरलेल्या चष्म्याला दोन बोटांनी अत्यंत शानदारपणे डोळ्यांवर सरकवलं. खुर्चीत बसतानाही ऐटीत बसले.

'हं आता बोला, काय झालं?'

उधार राजे आधीच चिडलेले होते. त्यात हा पुढ्यातला सगळा रुबाब बघून वैतागले. त्यांना कळत होतं, हे जरा जास्त होतंय. पण नाईलाज!

'बोला काय बोला? इथं रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही की अन्नाचा कण घेतला नाही.. त्यात तुमची ऐट अन् तोरा कमी व्हायचं नाव घेत नाहीये'

'बरं राजे काय झालं ते तर सांगाल की नाही?' रौतांनी हे बोलतांना मात्र जराशी कमी ऐट दाखवली.

उधार राजे वैतागून बोलले, 'रात्री तो केरळदेशीचा सिनेमा बघितला. कळला नाही अशातला भाग नाही.. पण भूमिका काय घ्यावी ते कळेना. 'लव्ह जिहाद'आहे म्हटलं तरी अडचण अन् नाही म्हटलं तरी अडचण! काय करावं काही उमजेना.'

हे ऐकून बोलभांडे खुद्कन् हसले आणि बिनधास्त बोलले, 'त्यात काय? प्रपोगंडा आहे हा! हीच भूमिका घ्यायची. विषय संपला. मी तर बोललोच की-'

उधोराजे रागात म्हणाले, 'तुम्ही बोलून बसता आम्हाला निस्तरायला लावता. असं थेट प्रपोगंडा वगैरे, नाही म्हणता येणार. एका बाजूचे नाराज होतील आणि नाही म्हटलं तर दुसऱ्या बाजूचे लांब जातील. शिवाय वज्रमुठीतले मनी निसटतील ते वेगळं. काय करावं काहीच सुचेना.'

बोलभांडे रौत थेट शून्यात गेले. त्यांना काहीतरी सुचत होतं. तेवढ्यात अचानक ओरडले. 'सुचलं..सुचलंS'

उधार राजे चमकले. 'काय सुचलं? सांगा लवकर, उगा आमचा अंत पाहू नका. बोला बोलभांडे बोला..'

बोलभांडे बोलते झाले- 'लव्ह जिहाद आहे, पण तो तुम्ही सांगताय म्हणून नाही. तर आम्ही सांगतोय म्हणून आहे. तुम्ही आम्हांला-'

'थांबाS थांबाSS.. कळलं. सगळं कळलं. याच्यात तर आस्मादिकांचा हातखंडा आहे. आता आम्हीच तुम्हाला सगळी भूमिका विषद करतो. बघा कशी वाटतेय ती.'

असं म्हणून 'मातब्बर-श्री' गडाचे उधार राजे जागेवर उभे राहिले. भाषणाच्या आर्विभावात बोलायला लागले-

'आजकाल एका सिनेमाची चर्चा होतेय. हो होतेय चर्चा.. व्हायलाच पाहिजे. का नको चर्चा? चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही. पण त्यांना चर्चाच करायची नाही.. मी म्हणतो चर्चा-'

'मुद्द्याचं बोला!' बोलभांडेंनी गतिरोधक लावला. तसे उधार राजे मुद्द्याकडे वळले-

'आम्हीही बघितला तो सिनेमा. लव्ह जिहाद आहे का तर आहे. पण तुम्ही सांगताय म्हणून नाही. आम्ही सांगतोय म्हणून. तुमचा लव्ह जिहाद विखारी आहे, आमचा लव्ह जिहाद मायाळू आहे. एकट्या केरळचं काय घेऊन बसलाय. इतर राज्यांमध्ये बघा.. सगळीकडेच आहे. आमच्याकडे आहे, ह्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडेही आहे. पण तुमचं लक्ष फक्त केरळवर. म्हणून ठणकावून सांगतो, ठणकावणारच. मीच ठणकावणार. का नाही ठणकवायचं? ठणकावणं हा तर माझा-'

'आलं आलं..लक्षात आलं. नेमकं बोला!!' रौत त्यांना मध्येच थांबवत बोलले. रौत जाम वैतागले होते. एरव्ही ते बोलून-भांडून इतरांची डोकेदुखी ठरतात. आज मात्र तेच वैतागले.. डोकं दुखत होतं पण पर्याय नव्हता. उधार राजे पुढे बोलले-

'मी म्हणतो, लव्ह जिहादच्या नावाखाली एकाच समाजाला टार्गेट का? सगळ्याच धर्मात लव्ह जिहाद असतो, असायलाच पाहिजे. का नको? आमक्या धर्माचा लव्ह जिहाद-तमक्या धर्माचा लव्ह जिहाद, असं म्हणण्यापेक्षा सर्व जाती-धर्मात लव्ह जिहाद पाहिजे. पण तुम्ही सांगताय म्हणून आम्ही मान्य करणार नाही. आम्ही आमचा वेगळा लव्ह जिदाह मांडू. सगळे गुण्यागोविंदाने राहतील, असा लव्ह जिहाद देशाला हवाय? तो तुम्ही देणार आहात का? सांगा ना? देणार आहात का-आहात का देणार? बोला-'

बोलभांडे रौत एकटक उधार राजेंकडे बघत होते. त्यांच्या या 'आधुनिक' विचारांचं काय करावं? हे त्यांना सुचत नव्हतं. तरीही त्यांनी 'बहोत-खूब, बहोत खूब.. महाशक्तीला घाम फुटणार' असं म्हणत तिथून काढता पाय घेतला. उधार राजे स्वतःवरच जाम खूश झालेले गडावरच्या अनेकांनी निर्विकारपणे पाहिलं.

टॅग्स :politicalarticle