पुणेकरांनो, मुळशीतील `या` वाटांवरही नक्की भटका...

गोरख माझिरे
Sunday, 27 September 2020

पुण्यातील पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी मुळशीला पसंती देतात. डोंगर कड्यांवर झालेली ढगांची गर्दी, दाटलेलं धुकं आणि सरींवर सरी कोसळताना चिंब भिजायचं असेल तर आपली पावलं आपणहूनच ताम्हिणी घाटाकडे वळतात. पण, मुळशीतील अंधारबन, पळसे धबधबा, ताम्हिणी घाट व लवासा याव्यतिरिक्त दडलेली आणखीही अपरिचित ठिकाणे आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटन बंद असले, तरी सर्व खुले झाल्यावर या ठिकाणांना नक्की भेट द्या. जागतिक पर्यटन दिनानिमित्त जाणून घ्या मुळशीतील या अनोळखी वाटा... 

पुण्यातील पर्यटक पावसाळी पर्यटनासाठी मुळशीला पसंती देतात. डोंगर कड्यांवर झालेली ढगांची गर्दी, दाटलेलं धुकं आणि सरींवर सरी कोसळताना चिंब भिजायचं असेल तर आपली पावलं आपणहूनच ताम्हिणी घाटाकडे वळतात. पण, मुळशीतील अंधारबन, पळसे धबधबा, ताम्हिणी घाट व लवासा याव्यतिरिक्त दडलेली आणखीही अपरिचित ठिकाणे आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पर्यटन बंद असले, तरी सर्व खुले झाल्यावर या ठिकाणांना नक्की भेट द्या. जागतिक पर्यटन दिनानिमित्त जाणून घ्या मुळशीतील या अनोळखी वाटा... 

 

सोमजाईश्वर धबधबा अर्थात छोटा देवकुंड 
ताम्हिणी घाटाकडे जाताना निवे गावापासून पुढे गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला सोमजाईश्वर मंदिर लागते. या मंदिरापुढेच एक मोठा ओहोळ वाहतो. ओहोळातूनच साधारण वीस मिनीटे पायी गेला असता वर कड्यावरुन कोसळणारा मोठा धबधबा दिसतो. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा डोह. त्यामुळे थेट धबधब्यात भिजण्याबरोबरच डोहात डुंबण्याचा आनंदही घेता येतो. इतका मनमोहक आणि हिरव्याकंच गर्द झाडीत असलेला हा धबधबा अल्पपरिचित असल्याने गर्दी फारशी नसतेच. सुटीच्या दिवसांव्यतिरिक्त हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतकेच पर्यटक तेथे दिसतात. त्यामुळे कोणताही गोंगाट, गजबज टाळून धबधब्याच्या एकसुरी आवाजात धबधब्यात ओलेचिंब होण्याची मजा घ्यायची असेल, तर तेथे अवश्य जायला हवे. 

वळणे धबधबा 
विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे मुळशीमध्ये धबधबे खूप आहेत. त्यातील बहुतांश दुर्लक्षित आहेत. वळणे गावातील धबधब्यांची जोडी त्यापैकीच एक आहे. माले गावापासून उजवीकडे चार किलोमीटरवर वळणे गाव लागते. गावाच्या पुढे आणखी एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर समोरच धबध्यांची जोडी दिसते. धबधब्याकडे जाणाऱ्या वाटेवर विविध प्रकारचे कीटक, फुलपाखरं, पक्षी पाहण्यात, समजून घेण्यात वेगळाच आनंद असतो. पक्ष्यांचा मधुर कुंजारव ऐकत ही वाट संपूच नये, असे वाटते. पावसाळ्यातच जंगलात फुलणारी आंबेहळदची फुले मन मोहून घेतात. वाटेवर अनेकदा फुलपाखरं अगदी जवळून उडत असतात. पैशाचा अळ्या किंवा मिलीपिड भरपूर दिसतात. 

 

Image may contain: tree, plant, outdoor and nature

नांदिवली देवराई 
देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल होय. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. मुळशी धरणाच्या पायथ्यापासून वळणे मार्गे फक्त १० किलोमीटर अंतरावर नांदिवली गावाजवळ देवराई आहे. आंबा, वड, पिंपळ, साग, पळस, माड, आळू, फणस, आवळा, जांभूळ, भोकर, उंबर, आपटा, काटेसावर, पायर अशी कितीतरी आणि एकाहून एक मोठी झाडे आहेत. त्यांच्याभोवती धायटी, खुळखुळ, करवंद, कारवीसारख्या असंख्य छोटी- मोठी झुडपे आहेत. 

भादसचे वाघजाई मंदिर 
मुळशीतील पौड या तालुक्याच्या गावापासून १० किलोमीटर अंतरावर भादस हे गाव वसलेले आहे. या गावाच्या वरच्या डोंगराला वाघजाई डोंगर म्हणतात. या डोंगरावर वाघजाईचे मंदिर आहे. येथे जाण्यासाठी एक छानसा ट्रेकही होऊ शकतो. भादस गावापासून साधारण वीस मिनिटांत आपण माचीपर्यंत पोहोचते, ही पायवाट आहे. येथून पुढे वीस मिनीट पायऱ्यांवरून वर गेल्यास मंदिरापर्यंत आपण पोहोचतो. वाटेत पावसाबरोबर छोट्या धबधब्यांचाही आनंद घेता येतो. मंदिराजवळ एक लहानसे कुंड आहे. त्यात बारामाही पाणी पिण्यायोग्य असते. भादस गावालाही ऐतिहासिक वारसा असून अनेक अवशेष गावामध्ये पाहायला मिळतात. 

जांभूरदेव शिवमंदिर 
मुळशीतील खुबवली व नाणेगाव या गावाच्या डोंगरावर हे ऐतिहासिक जांभूरदेव शिवमंदिर आहे. मंदिराचा परिसर हा पूर्ण गर्द झाडीत असून, मंदिर पूर्णपणे पडले आहे. मंदिराचा फक्त गाभारा शिल्लक आहे. मंदिराजवळ वेगवेगळ्या कालखंडातील विरगळ असून, त्या मातीत गाडल्या गेल्या आहेत. मंदिर बनवताना खूप मोठ मोठ्या दगडी शिळा वापरल्या असून, त्यावर विविध कोरीव काम केलं आहे. या मंदिराच्या पश्चिमेच्या डोंगरावर वाघजाई देवीचे मंदिर असून, डोंगर हा हिरवाईने नटलेला आहे. या डोंगराचे कडेही नयनरम्य असून, आजूबाजूचा परिसरही हिरवागार दिसतो. या दोन ठिकाणी छोटासा ट्रेकही होऊ शकतो. 

कुर्डुगड 
मुळशीच्या पश्चिमेला मुळशी आणि रायगडच्या सीमेचा शिलेदार असलेला हा कुर्डुगड किल्ला माणगाव तालुक्यात मोडतो. पण, पुण्यातून जाताना मुळशीमधील सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरच हलकेच डोके वर काढून खुणावत असल्यासारखा हा किल्ला मुळशीला जास्तच जवळचा आहे. फारसा परिचित नसलेला कुर्डुगड मोसे खोऱ्यातील पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अखत्यारीत होता. किल्ल्याच्या पायथ्याशी कुर्डाई देवीचे मंदिर असल्याने याला कुर्डुगड म्हणत असावे. किल्ल्यावर जातांना वाटेतच एक भग्न झालेला दरवाजा आढळतो. किल्ल्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळकाच आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच १ मीटर उंचीची हनुमान मूर्ती नजरेस पडते. मूर्तीच्या मागच्या बाजूस १०० ते १५० माणसे सहज बसू शकतील, अशी एक निसर्गनिर्मित घळ आहे. किल्ल्यातच दोन भलेमोठे सुळके आहेत. सुळक्याला पूर्ण फेरी मारता येते, पण काही ठिकाणी वाट पूर्णपणे ढासळलेली आहे. किल्ल्यावर पाण्याची एक दोन टाकी आहेत. किल्ल्यावरून संपूर्ण कोकण परिसर न्याहाळता येतो. 

प्राचीन सावळ्या घाट 
देश व कोकण यांना जोडणाऱ्या अनेक घाटवाटा अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. असाच एक घाट म्हणजे आपल्या मुळशी तालुक्यातील सावळ्या घाट. या घाटात आपणास आजही कोरीव पायऱ्या, पाण्याच्या टाकी अशा प्राचीन खाणाखुणा दिसतील. 

कासारसाई धरण 
हिंजवडीपासून फक्त 17 किलोमीटर अंतरावर कासारसाई धरण आहे. भूमकर चौकातून कासारसाई धरणावर पोहोचायला फक्त अर्धा तास लागतो. येथे असलेल्या पुलावर उभं राहून सूर्यास्त पाहण्याची मजाच वेगळी आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबईतील पर्यटकांनीही कासारसाई धरणाला अधिक पसंती दिली आहे. त्यातच धरणातील बोटिंग, हिरव्यागार पिकांनी बहरलेली शेती, प्रदूषणमुक्त परिसर, चुलीवरील खमंग मावळी जेवण, धरणाच्या बॅक वॉटरजवळ सह्याद्रीच्या उंच रांगांनी त्यात भरच घातली आहे. डोंगररांगांमधून डोकावणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांसमवेत सेल्फी काढण्याचा आनंद काही औरच. त्यामुळेच धरण परिसर पर्यटकांनी फुलून जातो

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या