‘मी कधी हिजाब घातला नाही, पण मी ‘त्या’ मुलींचं दुःख समजू शकते’

Karnataka Hijab Controversy
Karnataka Hijab Controversyesakal
Summary

काही वर्षांपूर्वी मीही अशीच कॉलेजात जात होते. फरक एवढाच होता की मी बुरखा घालत नव्हते.

कर्नाटकमधील हिजाब प्रकरणासंबंधी कर्नाटक उच्च न्यायालयाने आज निर्णय देताना हिजाब ही ईस्लाम धर्मातील आवश्यक बाब नसल्याचं म्हंटलय. त्यामुळे आता कर्नाटक राज्यशासनाच्या शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीचा निर्णय कायम राहणार आहे. कर्नाटकच्या कॉलेजमध्ये एक मुस्लीम मुलगी जेव्हा बुरखा घालून येत होती आणि तिच्या दिशेने एक जमाव धावून येत होता, तेव्हा मला धडकीच भरली. काही वर्षांपूर्वी मीही अशीच कॉलेजात जात होते. फरक एवढाच होता की मी बुरखा घालत नव्हते.

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील धायगुडवाडी येथे माझं आणि माझ्या भावंडांचं शिक्षण मराठी माध्यमात झालं. आम्ही पाच बहिणी आणि दोन भाऊ. मी भावंडांमध्ये दुसरी. पहिल्या पाचही मुलीच मग मुलगा हवा या सामाजिक दबावाने आम्ही सात भावंडं, अम्मी सांगते, मुलगा नाही, म्हणून तिने अनेक टोमणे सहन केले, तिने अब्बांना तुम्ही दुसरं लग्न करा असा सल्लाही दिला होता. पण अब्बांनी तो मानला नाही. सर्व मुलांना शिकवायचं हा निर्णय अम्मी अब्बांनी घेतला होता.

अब्बा इतके पुरोगामी कसे झाले?

अब्बा सहा फूट उंच, धिप्पाड देहयष्टी असलेले , तरुणपणी पहिलवान होते. खूप मायाळू होते. त्यांचं मित्रमंडळ सुशिक्षित आणि पुढारलेलं होतं. अब्बांचं बालपण सालगडी म्हणून गेलेलं, प्रचंड दारिद्र्य अपमान सहन करत ते वाढले होते. पुढे पारंपरिक खाटीक व्यवसाय नाकारून त्यांनी ड्रायव्हर बनण्याचा निर्णय घेतला होता. मी लहान असताना अब्बा, अम्मीला गावी सोडून ड्रायव्हिंग शिकून परतले. या दरम्यान ते ट्रकवर भारतभर हिंडले. पदोपदी मुस्लिम असणं, गरीब असणं, अशिक्षित असणं याचा कटू अनुभव ते घेत होते. जे सगळं बदलायचं असेल शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांना उमजलं.

त्यांनी स्वतः घरीच बाराखडीच्या पुस्तकातून लिहिणं वाचणं शिकून घेतलं, त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या चुलत्यांनी त्यांना मदत केली होती. यामुळे पुढे त्यांनी मुलांना आणि मुलीला शिकवण्याचा निर्धार केला. पुढे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील ' राणीसावरगाव ' हे गाव सोडून ते १९९० साली पुणे जिल्ह्यात स्थायिक झाले. अनेक यश - अपयश पचवत त्यांनी आम्हाला शिकवलं आणि आत्मविश्वासाने आम्हाला ओतप्रोत केलं. अब्बांना आलेल्या अनुभवातून ते घडले. परिस्थिती हीच त्यांची गुरु होती. त्यामुळेच मी आजपर्यंत अब्बांएवढा पुरोगामी विचार असलेलं दुसरं कोणी पाहिलं नाही.

अब्बांनी वीस वर्ष ट्रक ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. ते एक उत्तम ड्रायव्हर होते. पुढे स्वतः चा ट्रक घेऊन ते वीट भट्टी व्यवसायात उतरले होते. किडनीच्या आजाराने अब्बांचं सात वर्षांपूर्वी ( फेब्रुवारी २०१५) निधन झालं. मुस्लिम म्हटलं की गॅरेजमध्ये काम करणारे, ड्रायव्हर, भाजी विकणारे, मागास हे चित्र बदलायला पाहीजे असं ते सतत म्हणत. त्यामुळेच आजारी असताना देखील आमचं शिक्षण अब्बांनी थांबवलं नाही.

मुली आणि महिलांचा ते प्रचंड आदर करायचे. माझ्या अम्मीला प्रत्येक निर्णयात ते सहभागी करायचे. मुलींना खूप शिकवायचं हे त्यांनी ठरवलं, तेव्हा अम्मीने देखील पाठींबा दिला. त्यांना नेहमी वाटायचं मुस्लिम समाजाने पुढे जावं आणि त्यातही मुलींनी शिकून स्वतः च्या पायावर उभं राहिलं पाहिजे. अब्बांच्या निर्णयाला माझ्या आजोबांची साथ होती. मुलगा वडील हे आदरयुक्त भीती असलेले आणि प्रेमाने ओतप्रोत नातं मी पाहिलं.

अब्बानी घरातले व्यवहार आम्हा सर्व बहिणींना वाटून दिले होते, बाजारात जाऊन भाजीपाला आणणे, छोटं भावंडं आजारी असेल तर त्याला दवाखान्यात नेणे, गावातून कोणी नातेवाईक आले तर गावच्या बसने त्यांना बसवून देणं. फोन बिल भरण, गॅस संपला तर गॅसची टाकी आणायला जाणं, ही सर्व काम आम्ही बहिणी करायचो, कारण भाऊ खूप लहान होते. मला कधी -कधी अब्बा आम्हाला का पाठवतात बिल भरायला, बाजाराला दुसऱ्यांचे तर आई वडील ही कामं करतात याचं आश्चर्य आणि रागही यायचा पण आज कळतं आमच्यात धाडस यावं आणि व्यवहारज्ञान यावं हा त्यामागचा उद्देश होता.

अब्बा पुरोगामी विचारांपेक्षा बंडखोर वृत्तीचे होते. मुलींमध्ये हिंमत असावी, त्यांना कसलीही भीती वाटू नये यासाठी त्यांनी आम्हाला तयार केलं. आम्हा बहिणींना त्यांनी कराटे क्लासमध्ये पाठवलं. आम्ही सगळ्याजणी कराटे शिकलो आहोत. त्यापैकी पुणे पोलीसमध्ये कार्यरत असलेली यास्मिन ब्लॅक बेल्ट आहे. ती पोलीस भरतीची तयारी करत होती, तेव्हा अब्बा पहाटे तिला उठवायचे आणि धावायला पाठवायचे... हो , एकटी यास्मिन सहा किलोमीटर भर अंधारात धावायची.

मुलींनी नाजूक बनू नये, त्यांना प्रत्येक परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे, कितीही संकटं आली तरी तिने रडत न बसता स्वतः त्यातून मार्ग शोधले पाहिजे हे अब्बांनी शिकवलं. घराबाहेर पडल्यावर मुलांकडून होणाऱ्या छेडछाडीपासून वाचण्यासाठी, कोणी आपल्याला ओळखू नये यासाठी मुली बुरखा अथवा हिजाब स्वीकारतात. अनेकजणींना बुरखा अथवा हिजाब घातल्यावर सुरक्षित वाटतं. आमच्या अब्बांनी कधी बुरखा अथवा हिजाबची सक्ती केली नाही. पण नातेवाइकांचा विरोध असायचा.त्यांना अब्बा त्यांच्या परीने उत्तर देत आणि ते ढाल म्हणून उभे राहिल्यामुळेच आम्ही बहिणी चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवून शिकू शकलो.

अब्बांनी नेहमी शिकवलं, ''कपडे व्यवस्थित घालावे आणि परदा आपल्या नजरेत असावा." बुरखा घालून भित जगण्यापेक्षा तुमच्याकडे पाहण्याची कोणाची हिम्मत होता कामा नये, तुम्ही इतक्या पोलादी बना असं अब्बा शिकवायचे. त्यामुळे इतर चुलत, मावस किंवा इतर नातेवाईक बहिणी बुरखा घालत असतील तरी त्याचं दडपण आम्हाला कधी आलं नाही. तुम्हाला देखण्या बाहुल्या बनून घरात शो पिस व्हायचं की हिंमतीने स्वतः च्या पायावर उभं राहायचं हे तुम्ही ठरवा असा चॉईस आमच्या समोर होता. अर्थातच आम्ही हिम्मतिने पुढे जाण्याचा पर्याय निवडला. माझ्या दोन बहिणी लग्नानंतर बुरखा घालू लागल्या पण त्यांच्या मर्जीने.

आम्हाला जसे अम्मी- अब्बा लाभले तसेच सगळ्यांना लाभतील असं नाही. अनेक मुस्लिम मुली संकटांना तोंड देत शिकत असल्याचं मी पाहिलंय. मी बारावी नंतर बारामती येथे शिकायला गेले. शिक्षण घेणारी आमच्या कुटुंबातली आमची पहिलीच पिढी. त्यातही शिक्षणासाठी बाहेर जाणारी मी पहिलीच मुलगी होते. त्यामुळे मोठं दडपण आणि जबाबदारी देखील होती. मुलींना शिकवून काय करायचं, त्या घरातच बसणार आहेत, अशा भाषेत अनेक नातेवाईक अम्मी-अब्बांना बोलायचे, पण आम्ही बहिणी अतिशय चांगलं शिक्षण घेऊन स्वतः च्या पायावर उभ्या राहिलो. नातेवाईकांचे टोमणे, एकटेच कमावणारे असल्याने त्यांच्यावर मोठा ताण यायचा. पण त्यांना आम्हा सगळ्यांवर प्रचंड विश्वास होता. अब्बा एकटे कमावणारे असल्याने ते पाठवतील तितक्या पैशांमध्ये काटकसर करून आम्ही खर्च भागवत होतो. कमवा - शिका योजनेत कामही करत होतो.

Karnataka Hijab Controversy
'हिजाब वाद' नेमका काय, याची सुरुवात कशी झाली?

आमच्या नातेवाइकांमधील अनेक मुली उर्दू माध्यमात हिजाब घालून शिकल्या. त्यातील अनेक जणींची वयात आल्यावर शाळा सुटली. मुस्लिम समाजात आजही दहावीच्या पुढे शिकणाऱ्या मुलींची संख्या प्रचंड कमी आहे. अनेकींची लग्न वयात येताच ठरविली जातात. त्यातही जर काही मुलींना शिकायच असेल तर आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण थांबत. शिक्षणापेक्षा लग्नासाठी खर्च केला जातो. अनेकदा मोहल्ल्यातील नातेवाइकांच्या दडपणामुळे त्या ईच्छा असुनही शिकू शकत नाही. त्यामुळे हिजाब घालून शिकण्याच्या अटीवर त्या शिकायला बाहेर पडतायत.

आम्ही बहीणींनी दुसऱ्या गावात, शहरात जाऊन उच्च शिक्षण घेतलं. माझ्या दोन बहिणी बुरखा घालतात. कारण ती त्यांची चॉईस आहे. (बहिणी घालतात, मग आपणही घालावा, असा कधी विचार आला का मनात? न घालण्याचं का ठरवलं?) मला लग्नानंतर देखील कुठलेही सक्ती नाही. (सासरचे-नवरा पुढारलेले कसे? त्यांची पार्श्वभूमी काय?)

कराटे प्रशिक्षणामुळे माझ्यातील आत्मविश्नास आणि धाडस वाढलं. त्यामुळे कोणी आपल्याला त्रास देईल याची भीती निघून गेली. वाचनामुळे आणखी धीट बनले. त्यामुळे कदाचित मला बुरख्याची गरज भासली नाही. वडीलांचा परदा नजर मे चाहीए हा मंत्र जपला. लग्नाचा निर्णय घेताना उच्च शिक्षित मुलगा आणि सासर याला प्राधान्य दिलं. माझे सासु -सासरे खुप संघर्षातून पुढे आले आहेत, ते दोघेही सरकारी खात्यात चांगल्या पदावर होते, दोघेही खूप समजुतदार आहेत. मला कुठल्याही प्रकारची सक्ती नाही.

माझ्या सासुंनेदेखील कधीही बुरखा परिधान केला नाही. तशी सक्तीही सासऱ्यांनी केली नाही. उलट ते सासुबाईंच्या मागे ठाम उभे राहीले. माझी नणंद देखील उच्च शिक्षित आहेत. एकंदरितच खुल्या विचारांचं सासर मला मिळालं. माझा दोडीदार दानिश खुल्या विचारांचा आणि सामाजिक उपक्रमात सहभागी होणारा आणि अब्बांसारखा विचार करणारा असल्याने मला नेहमी त्याचा पाठींबा असतो.

मुस्लीम मुली दुहेरी कोंडीतः

अनेक सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करत मुस्लीम मुली विद्यालयांपर्यंत पोहोचतात. एकदा वयात आलात की बुरखा अथवा हिजाब आयुष्यात येतो. मोहल्लयात राहणाऱ्या आणि नातेवाइकांच्या जवळ राहणाऱ्या मुलींना हिजाब घातल्याशिवाय शिकायला बाहेर पडता येत नाही. तसं दडपण त्यांच्यावर अनेकदा असतं. जर शिकायचं असेल तर हिजाब बुरख्याशिवाय पर्याय नाही, आणि आता बुरखा - हिजाब घातला तरी शिक्षणापासून दूर रहावं लागणं हा मोठा पेच प्रसंग मुस्लीम मुलींसमोर आहे. प्रबोधनाने आणि शिक्षणाचं महत्व पटल्यामे आता आई-वडील आपल्या मुलींना शिकायला पाठवत आहेत.

Hijab Row Karnataka
Hijab Row Karnatakaesakal

मुस्लीम मुलींना शिकता येतंय, त्या ज्ञानार्जनापासून दूर नाहीत, याचा मला आनंद आहे. पण त्यातल्या फार कमी जणींना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचता येतं. अशातच जर या मुलींना कॉलेजमध्ये विरोध होत असेल तर त्यांच्या मनाची स्थिती काय असेल, याचा विचार करून मला काळजी वाटते. हिंदुत्ववादी संघटनांचा जमाव एका मुलीच्या दिशेने धावून जातानाचा व्हीडिओ व्हायरल झाला. तो पाहून अनेक मुस्लीम पालक आपल्या मुलींना कॉलेजात पाठवण्याआधी विचार करतील. मुळात समाजातून होणारा विरोध आणि आता कॉलेजात सुरक्षिततेचा प्रश्न अशा दुहेरी कात्रीत मुस्लीम मुली अडकल्या आहेत. मुस्लिम समाजाची अर्थिक परिस्थिती म्हणजे दोन वेळच्या जेवणाची तजवीज करण्यापर्यंत आहे. सच्चर समितीच्या अहवालात या विषयीची सर्व माहिती आहे.

सच्चर समितीच्या अहवालात नमूद केल्यानुसार :-

1. ग्रामीण भागात मुस्लिमांमधील शिक्षणाचं प्रमाण दलितांपेक्षाही कमी असल्याचं म्हटलंय.

2. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मुस्लीम मुलींचं शिक्षण बंद होतं.

4. उर्दू शाळेत शिकण्याचा टक्का जास्त आहे, पण उर्दू माध्यमांच्या शाळांची अवस्था मात्र दयनीय आहे.

Karnataka Hijab Controversy
शैक्षणिक संस्थात हिजाब बंदी योग्यच - कर्नाटक हायकोर्ट

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाला एक शतक पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम मुलींच्या शाळा गळती बद्दल माहिती देताना सांगितलं, " मुस्लिम मुलींच्या शाळा गळतीचं प्रमाण 70% होतं, आता ते 30-35% पर्यंत खाली आलं आहे." पण महाराष्ट्राबद्दल बोलायच असेल तर मुस्लिम मुलींच्या शाळागळतीची कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. पंतप्रधानांच्या वक्तव्यापेक्षा प्रत्यक्षात मात्र परिस्थिती भिन्न आहे.

30 नोव्हेंबर 2007 रोजी सच्चर समितीचा रिपोर्ट संसदेत सादर करण्यात आला होता. मागील 15 वर्षात मुस्लीम मुलींच्या शिक्षणासाठी त्यांची शाळेतील गळती थांबवण्यासाठी किती प्रयत्न झाले हा सवाल अलाहिदा. (आपण इथे परस्परविरोधी लिहीत आहोत. प्रयत्न झाले म्हणूनच गळतीचं प्रमाण कमी झालं ना?)

मोदीजी, तुम्ही मुस्लीम मुलींबाबत खरंच गंभीर आहात?

राज्यघटनेच्या कलम २५(१) नुसार धार्मिक आचरणाचं स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण आज 'हिजाब' म्हणजेच डोक्याला गुंडाळलेला स्कार्फला विरोध होतो आणि त्याला राजकीय वळण लागतं, हे सगळचं शिक्षण घेऊ पाहणाऱ्या मुस्लीम मुलींच्या आणि त्यांना शिकवण्याची इच्छा असलेल्या पालकांच्या मनात धास्ती निर्माण करणारं आहे.

काही मैत्रिणींना शिकण्याची इच्छा असूनही खर्च पेलवत नसल्याच्या कारणामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. शिक्षणाची प्रचंड आवड असणाऱ्या या मुली नंतर संसारात अडकून राहिल्या त्या कायमच्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करणाऱ्या मुस्लीम मुलींचा टक्का अतिशय कमी आहे. त्यातही पत्रकार, पोलीस, वकील, अधिकारी फारच कमी आहेत. आता सामाजिक प्रबोधनाने अनेक जणींना उच्च शिक्षणाची परवानगी देखील मिळते आहे. सामाजिक दबावाला बळी न पडता अनेक आईवडील मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवत आहे. पण हिजाबचा विषयी ज्या राजकीय वळणाने आक्रमकपणे पुढे येत आहे, ते या मुलींच्या शैक्षणिक भविष्यासाठी मारक ठरू शकतं.

Halimabi Kureshi
Halimabi Kureshi

बुरखा अथवा हीजाब घालण्याचा अधिकार हा व्यक्तिगत आहे. अनेकजणी बुरखा अथवा हिजाब घालून उच्च शिक्षण घेऊन अनेक चांगल्या ठिकाणी काम करत आहेत. खेळांमध्ये अनेक मुस्लीम मुली चमकत आहेत. हेड स्कार्फ (हिजाब) घालून त्या खेळत आहेत. ऑलिम्पिक मध्ये देखील अनेक स्पर्धांमध्ये हिजाब घालून अनेक खेळाडू खेळल्या. राजकारणात, सामाजिक क्षेत्रात मुस्लिम स्त्रिया पुढे येत आहेत.

Karnataka Hijab Controversy
बुरखा, नकाब, हिजाब यांच्यातील फरक माहितीये का?

मी स्वतः हिजाब घालत नाही किंवा घाला म्हणून सांगत नाही. पण माझ्या घरी जी परिस्थिती होती, ती प्रत्येकीच्या घरी नसते. प्रत्येकीच्या पाठीशी तिचे अब्बा नसतात. त्यामुळे जर कुणी हिजाब घालून पुढे जात असेल तर तिला थांबवून काय मिळेल? सामाजिक बदल असा आक्रमक नारे देऊन होत नाही. त्याचा उलट परिणाम म्हणून आता हिजाब न घालणाऱ्या काही मुली निदर्शनाचं प्रतीक म्हणून हिजाब घालत आहेत.

कर्नाटक मधील उडुपी येथील घटनेनं मुस्लीम मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. केंद्र सरकार मुस्लीम महिलांच्या शिक्षणासाठी भल्यासाठी असल्याचं अनेकदा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. जर ते खरंच मुस्लीम मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत गंभीर असतील तर शिक्षणाता मोडता घालणारे मुद्दे का आणत आहेत? हिजाबच्या मुद्दयावर त्यांची चूप्पी का ?

आता गणवेश कायम करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुस्लिम मुलींच्या शिक्षणासंदर्भात अडचणी निर्माण होतील का अशी भीती नक्कीच वाटते. मात्र, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी यांना हिजाब संदर्भातील हा निर्णय हिजाब प्रथेतून मोकळं होण्याची सुरुवात वाटते.

(लेखिका पत्रकार असून लेखातील मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com