esakal | व्याप्ती इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशनची

बोलून बातमी शोधा

Indian Arthopedic Association
व्याप्ती इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशनची
sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

देशपातळीवर सर्व ऑर्थोपेडिक तज्ज्ञांची ही संघटना संपूर्ण देशात वा 28 राज्यांत त्या राज्य ऑर्थोपेडिक संघटनेमार्फत काम करते. 1953 ला स्थापन झालेल्या या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने नवीन उपचार संशोधने, उपचारातील नव्या तंत्रांचा उपयोग व सर्वसामान्यांसाठी शिबिरे असे उपक्रम सातत्याने वर्षभर सुरू असतात. या माध्यमातून देशातील ऑर्थोपेडिक हे अस्थींचे आजार व उपचारांवर आधारित क्षेत्र सातत्याने अत्याधुनिक होत असताना, रुग्णांशी असलेली सेवेची बांधिलकी जोपासण्याचे कामही करत आहे. याशिवाय तरुण ऑर्थोपेडिक सर्जन विद्यार्थ्यांना देशपातळीवर संशोधनासाठी फेलोशिप देते. अनेक उद्योग समूहांकडून देखील दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी संघटना सहकार्याची भूमिका घेते. देशांतर्गत व देशाबाहेर शिक्षणाला यातून मदत मिळते. सर्व राज्यांच्या कमिटीसह विविध कामांचे आयोजन व समन्वय राखण्यासाठी या देशव्यापी संघटनेच्या कमिट्या स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. आयओएच्या माध्यमातून देशभरात हे उपक्रम सुरू असतात.

कोरोना काळात अव्याहत सेवा

सर्वसाधारणपणे ऑर्थोपेडिक डॉक्‍टरांना सातत्याने अपघाताच्या संदर्भाने तत्काळ सेवा द्यावी लागते. त्यामध्ये कोणताही विलंब चालत नाही. कोरोनाच्या काळात देखील याच पद्धतीने या डॉक्‍टरांनी सेवा देण्याचे काम केले. हे काम करत असताना तब्बल 28 डॉक्‍टरांना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा संघटनेने तत्काळ या डॉक्‍टरांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत मदत देण्याचे काम केले. कोरोना काळात कोणत्याही ऑर्थोपेडिक सेवा बंद राहणार नाहीत याचे सर्व सदस्यांनी तंतोतंत पालन करत सेवा दिली. कोरोनाच्या काळात रुग्ण त्यांच्या छोट्या मोठ्या अपघातानंतर योग्य वेळेत उपचारासाठी पोचू शकले नाहीत त्यामुळे विलंबाचा परिणाम म्हणून वाकडे जुळलेले किंवा हाड ना जुळलेल्यांची संख्या वाढली आहे आणि त्यांच्यावर कॉम्प्लिकेटेड मोठ्या शस्त्रक्रिया करण्याची संख्या आता वाढली आहे.

संशोधनातून रुग्णांना दिलासा

सातत्याने गेल्या काही वर्षात बदलत्या जीवनशैलीने पायाचे आजार वाढत आहेत. त्यामध्ये गुडघ्याचे त्रास, ऑस्टिओ आर्थराईटीस, कंबरदुखी व इतर आजार वाढत आहेत. मध्यंतरीच्या काळात नी रिप्लेसमेंट हा एक उपचाराचा पर्याय वापरला जात होता. हा उपचार तसा महागडा होता. पण आता जॉईंट प्रिझर्व्हेशनच्या नव्या संशोधनामुळे पूर्वीचा गुडघा नैसर्गिक अवस्थेत तसाच कायम ठेवून प्रभावी उपचार केले जाऊ शकतात. या तंत्रामुळे रुग्णांचा गुडघा प्रत्यारोपणाचा खर्च कमी होऊन त्याला दिलासा मिळतो आहे. यासोबत हाडाच्या शस्त्रक्रियांमध्ये संगणकाचा उपयोग प्रभावीपणे होऊन रुग्णांच्या वेदना कमी होणे, शस्त्रक्रियेची अचूकता वाढणे, कमी वेळात शस्त्रक्रिया होणे आदी अनेक प्रकारच्या अद्ययावत तंत्रांच्या उपयोगाने शक्‍य होत आहे. सी-आर्म उपचाराच्या पुढे जाऊन आता ओ आर्म हा एक नवीन उपचार पद्धतीचा उपयोग वाढीस लागला आहे. तसेच नाविगशन सर्जरीकडे कल वाढलेला आहे.

हाडांची काळजी नेमकी कशी घ्यावी?

सर्वसाधारणपणे हाडांचा आधार हा कॅल्शियम आहे. तरुण वयात शरीरात आहारातून कॅल्शियम जमा होते. महिलांच्या बाबतीत प्रसूतीमुळे ते कमी होत असल्याने ते भरून काढावी लागते. तसेच व्हिटॅमिन डी जे की कोवळ्या उन्हात उभे राहिल्यानंतर त्वचेच्या माध्यमातून मिळते ते कॅल्शियम साठवण्याच्या प्रक्रियेत मदत करते. मात्र कोवळ्या उन्हात उभे राहणे अनेकांना जमत नाही. महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच आहारात दूध, अंडी, भाजीपाला, फळे हा आहार सातत्यपूर्वक असावा. व्यायामाला कोणताही पर्यायच नसल्याने नियमित व्यायाम केला पाहिजे. अतिरिक्त वजनाचा भार पायावर पड देऊ नये. वजनाच्या बाबतीत जितकी इंच उंची आहे तेवढेच किलो वजन असले पाहिजे हे साधे सूत्र असावे. व्यायामासोबत शारीरिक क्षमता वाढवणारे खेळ खेळले पाहिजेत.

सोलापूर आदर्श मेडिकल हब

सोलापूरने मेडिकल हब म्हणून मिळवलेला नावलौकिक जपला पाहिजे. पुणे व मुंबईच्या तुलनेत सोलापुरात कमी खर्चात उत्तम आरोग्य सेवा देण्याची परंपरा सातत्याने वाढते आहे. वैद्यकीय व्यावसायिकानी केलेली ही कामगिरी महत्त्वाची आहे. ऑथोपेडिकमध्ये सोलापूर टेक्‍नॉलॉजी ऑफ इंटरलॉकिंग सर्जरी या नावाने देशभरात या उपचार पद्धतीच्या माध्यमातून सोलापूरचे नाव पोचले आहे.

- डॉ. बी. शिवशंकर,

ऑर्थोपेडिक तज्ज्ञ, अध्यक्ष, इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन