...तो सूरमयी सहवास !

हृदयात भरून ठेवलेल्या या आठवणी आज दिदींच्या जाण्याने पुन्हा उचंबळून आल्या.
Lata Mangeshkar
Lata Mangeshkaresakal

मी अक्कलकोटचा असल्याचा सर्वप्रथम अभिमान वाटला तो स्वरलता, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सानिध्याची संधी मिळाली त्या क्षणी ! 14 फेब्रुवारी 1994 चा तो सुवर्ण दिन. त्यातील तो सामप्रज्ञेचा अपूर्व योगच म्हणावा लागेल. दिदींशी गप्पा मारता आल्या... त्यांच्या सानिध्यात तब्बल दोन- अडीच तास वेळ घालवता आला. ही वेळच संपू नये असे मनोमन वाटत होते. अविस्मरणीय असेच ते क्षण होते. आजही त्या क्षणाची आठवण झाली की ऊर अक्षरशः भरून येतो. हृदयात भरून ठेवलेल्या या आठवणी आज दिदींच्या जाण्याने पुन्हा उचंबळून आल्या.

सोलापूर महापालिकेच्या वतीने 15 फेब्रुवारी 1994 रोजी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मानपत्र देण्याचा कार्यक्रम होता. त्यानिमित्त त्या सोलापुरात आल्या होत्या. विश्रामगृहावर आम्ही सर्व पत्रकार लतादीदींशी गप्पा मारत होतो. गप्पांच्या ओघात मी त्यांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थांविषयी बोलून दर्शनासाठी चला अशी विनंती केली. तेव्हा दीदींनी तत्कालिन महापौर मनोहर सपाटे यांना अक्कलकोटला जाऊया असं सांगितलं.

त्यावर तत्काळ मी त्यांना सांगितलं, की मी अक्कलकोटचाच आहे. माझं घरंही अक्कलकोटलाच आहे. हे ऐकून त्या हसल्या आणि त्यांनी मला आपल्या गाडीतच बसवून घेतलं. अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी सोबतच नेलं. त्यावेळेस रस्ता चांगला नव्हता, त्यामुळे जायला तासभर व यायला तासभर वेळ लागत होता. तेव्हा जाता-येता तब्बल दोन-अडीच तास त्यांच्या सहवासात राहता आले. त्यांच्याशी बोलण्याची, सहवासात राहण्याची मिळालेली संधी माझ्या आयुष्यातील अत्युच्च क्षणाची उपलब्धीच वाटली.

दिदींशी त्यादिवशी गप्पा मारताना वाटले होते, की गाताना वेगळ्या सुरात, तालात त्या गात असतील, अन्‌ बोलताना त्यांचे शब्द, बोलणे वेगळे असेल. परंतु, नमस्कार म्हणून त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा समजले, की त्यांचा स्वर आणि बोलणं हे मंजुळच म्हणजे एकसारखंच आहे. आपण हा आवाज ऐकत रहावा किंवा कानात भरून तरी ठेवावा. तो क्षण फक्त हृदयात भरून ठेवता आला.

दिदींसमवेत अक्कलकोटला गेल्यानंतर मंदिरात दर्शनासाठी त्या आल्याचे समजताच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. त्यांनी समर्थांच्या गर्भगृहात उभे असताना लोकांनी त्यांना पाहून जवळ जाण्यासाठी धडपड सुरू केली. तेव्हा त्या प्रचंड संतापल्याचेही पहायला मिळाले. त्यांना गर्दीतून वाट काढत परतावे लागले. त्यावेळी शांतपणे त्यांचे दर्शन होऊ शकले नाही, यावर शेवटी समर्थांचीच इच्छा इतकेच त्या बोलल्या. तो स्वरही प्रचंड मंजुळ असाच ऐकायला मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com