Pune News: वाढत्या गोंगाटाच्या समस्येचे करायचे काय?

पुणे शहरात गोंगाटाची पातळी शहरात वाढत चालली आहे, ही केवळ तक्रार नाही तर, हा एक आता पुण्यासारख्या शहरात गंभीर प्रश्न झाला आहे.
Pune noise pollution
Pune noise pollution sakal
Summary

पुणे शहरात गोंगाटाची पातळी शहरात वाढत चालली आहे, ही केवळ तक्रार नाही तर, हा एक आता पुण्यासारख्या शहरात गंभीर प्रश्न झाला आहे.

गेल्या आठवड्यात पुण्यात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. ‘स्वच्छ कल्याणीनगर’ आणि विमाननगर, वडगाव शेरी, कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे ४० गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी ‘व्हाईस अगेन्स्ट द नॉईज’ (गोंगाटाविरुद्ध आवाज) या मोहितंर्गत गोंगाटाबद्दल आवाज उठविला तर, चारच दिवसांपूर्वी संगीतकार ए. आर. रेहमान यांचा कार्यक्रम होता.

तो संपायला २२ मिनिटे उशीर झाला म्हूणून पोलिसांनी स्टेजवर जाऊन तो थांबविला. पोलिसांच्या तत्परतेबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुकही केले पण काही प्रश्नही निर्माण झाले.

शहरात गोंगाटाची पातळी शहरात वाढत चालली आहे, ही केवळ तक्रार नाही तर, हा एक आता पुण्यासारख्या शहरात गंभीर प्रश्न झाला आहे. शहराच्या पूर्व भागातील नागरिकांनी पोलिस, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार दाद मागितली.

थातूरमातूर उपाययोजनांच्या पलिकडे हा प्रश्न गेला नाही अन सुटलेलाही नाही ! वाढत असलेल्या गोंगाटाची समस्या केवळ विशिष्ट भागापुरतीच मर्यादीत राहिलेली नाही तर, संपूर्ण शहरात ही समस्या उग्र रूप धारण करीत आहे.

मध्य भागातील रस्त्यांवर तर, उभं राहून फोनवर बोलणंही शक्य होत नाही. पुण्याचा भौगोलिक विस्तार वाढत आहे. लोकसंख्या सुमारे ६२ लाख झाली आहे तर, वाहनांची संख्या ३३ लाखांपेक्षा झाली आहे.

त्यातच शहरात मेट्रोसारखे अनेक प्रकल्प, रस्त्यांची कामे, बांधकामे सुरू आहेत. वाहनांच्या दर्जांत सुधारणा होत असल्यामुळे हॉर्नदेखील वैविध्य आले असून ते आता उपद्रवी ठरू लागले आहेत.

भरीस भर म्हणजे शहराच्या अनेक भागांत पब, हॉटेल्स, बार रात्री उशीरापर्यंत सुरू असतात. अधून-मधून जयंती, उत्सव, यात्रा असतात. त्यांचे महत्त्व असले तरी, त्यावेळी मोठ्या आवाजात स्पिकर्स लावून ते साजरी करण्याची अनिष्ट प्रथा रूढ होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्यही धोक्यात येऊ लागले आहे. पुण्यात घरोघरी ज्येष्ठ नागरिक आहेत. अनेक घरांत रुग्ण असतात. विद्यार्थीही मोठ्या संख्येने आहेत.

शहरात स्पर्धा परीक्षा देण्यासाठी ३ लाखांहून अधिक विद्यार्थी राहतात. त्या सगळ्यांनाच वाढलेल्या आवाजाचा उपद्रव होतो. गोंगाटाचा व्यक्तिच्या मानसिकतेवर, हृदयावर आणि मेंदूवर विपरित परिणाम होतो. त्यातून व्यक्तीमध्ये चिडचीड वाढते अन त्याचाही त्रास होतो.

दवाखाने, रुग्णालये आणि शाळांच्या परिसरात महापालिकेने शांतता क्षेत्र (सायलेंट झोन) निश्चित केले आहे. त्या ठिकाणी वाहनांचा हॉर्न वाजविण्यावर निर्बंध आहेत.

परंतु, त्याची अंमलबजावणी होते का ? वाढलेल्या आवाजाचा त्रास नागरिकांना होत आहे, हे प्रशासकीय यंत्रणांपर्यंत पोचते का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात.

कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर, वडगाव शेरीमधील नागरिकांनी गोगाटाच्या प्रश्नावर आवाज उठविल्यावर बावधनमधील नागरिकांनी त्यांच्यात सहभागी झाले. या वरून शहरातील या समस्येची तीव्रता लक्षात येते.

परदेशात वाहनांचे हॉर्न अत्यावश्यक असेल तरच वाजविले जातात. आपल्या देशात तसे शक्य नाही. परंतु, हॉर्न कधी वाजवायचे, त्यावर मर्यादा किती असावी, उत्सव-जयंत्या साजऱ्या होताना स्पिकर्स लावल्यावर त्याचा आवाज किती असावा, या बाबतचे नियम आहेत.

परंतु, त्यांची अंमलबजावणी होत नाही, ही शोकांतिका. असलेल्या नियमांची जरी अंमलबजावणी झाली तरी, गोंगाटाची समस्या काही अंशी तरी कमी होऊ शकेल.

गोंगाटाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या नागरिकांनी सनदशीर मार्गांनी प्रयत्न केले. संगीतकार ए. आर. रेहमान यांचा कार्यक्रम झाला. त्यावेळी २२ मिनिटे उशीर झाला म्हणून पोलिसांनी स्टेजवऱ जाऊन कार्यक्रम थांबविला.

आवाजाबाबतच्या सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाचा त्यांनी दाखला दिला आणि ए. आर. रेहमान यांनीही कार्यक्रम थांबविला.अशीच तत्परता पोलिस एरवी का दाखवत नाही,असा स्वाभविक प्रश्न पुणेकरांच्या मनात आहे.

शासकीय नियमांची अंमलबजावणी झाल्यास आणि विविध सार्वजनिक मंडळे, कार्यकर्ते यांनी धार्मिक कार्यक्रम, जयंत्या, उत्सव साजरे करताना संयम बाळगल्यास पुणेकरांना दिलासा मिळू शकतो. यामध्ये लोकप्रतिनिधी या घटकाचा महत्त्वाचा सहभाग आहे. परंतु, असे प्रश्न निर्माण झाल्यावर या घटकांनी पुढाकार घ्यायला हवा.... पण त्यांनी लक्षात घेतले तर !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com