
Blog: कर्मयोग;मुलांसाठी गीता
केवळ कर्मावरच तुझा अधिकार आहे. फळावर नाही. फळावर दृष्टी ठेवून कर्म करू नकोस. आणि कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस.
बालमित्रांनो, श्रीकृष्णाने आता बुद्धीयोग सांगायला सुरुवात केली आहे. बुद्धीयोग म्हणजेच निष्काम कर्म करण्याची युक्ती कोणतीही कामना मनात न ठेवता जर कर्म केलं तर कर्माचं बंधन पडत नाही.
कर्माचे बंधन कधी पडते? प्रत्येक मनुष्य सतत कर्म करीत असतो आणि त्या कर्माचे फळ अनुभवतो. उठणे, बसणे, खाणे, पिणे इत्यादी कर्मेच आहेत. अन्न खाणे हे कर्म आहे. आणि पोट भरणे, पोषण मिळणे हे त्याचे फळ आहे कोणतेही कर्म केले की फळ निर्माण होते.
मग ते ठरवून करा किंवा न ठरवता करा हा झाला ‘कर्माचा सिद्धांत’ चांगले कर्म केले तर पुण्य लाभते आणि वाईट कर्म केले तर पाप लागते. हा झाला ‘कर्मफलन्याय.’ ईश्वरप्राप्ती, आनंदप्राप्ती, जन्ममृत्यूपासून सुटका हे मनुष्याचे अंतिम उद्दिष्ट असते.
पुण्यकर्म केले तर सुखभोगण्यासाठी पापकर्म केले तर दुःख भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो यालाच म्हणतात ‘कर्मबंध.’ या दुष्टचक्रातून सुटण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युक्ती सांगितली आहे.
ज्यामुळे युद्धासारखे भयंकर कर्म करून सुद्धा कर्माच्या बंधनातून सुटून जाईल. यालाच म्हणतात ‘कर्मयोग’ किंवा ‘बुद्धीयोग’ कर्माच्या बंधनातून सुटायचे असल्यास मनुष्यापुढे दोन पर्याय असतात. एकतर फळ निर्माण होऊ नये म्हणून कर्मच न करणे.
मात्र हा मार्ग तर जवळजवळ अशक्यच असतो. आणि दुसरा पर्याय म्हणजे निष्काम बुद्धीने कर्म करणे.
जीवन हे क्रिकेटच्या खेळासारखा असतं. खेळायचं ठरवलं की आलेला प्रत्येक चेंडू टोलवणं भागच असतं. समोरून येणारा चेंडू कसा येईल माहिती नसतं कौशल्याने योग्य असा फटकारा मारला तरी त्याचा परिणाम काय होईल हेही माहीत नसतं.
चौकार, षटकार, किती धावा मिळतील? कॅच पकडला जाणं आउट होणं हे सर्वच अनिश्चित असतं. परंतु या भीतीने चेंडू टोलवायचा नाही. किंवा खेळायचेच नाही असं ठरवणं हे सुद्धा अयोग्यच आहे ना? मग जो येईल तो चेंडू मी पूर्ण कौशल्याने पूर्ण सामर्थ्याने टोलवणे.
एवढेच आपण करू शकतो. मग त्याचा परिणाम काहीही असो, तो स्वीकारणे आणि आनंद मानणे, मिळणारे यश-अपयश हे ईश्वराच्या चरणी अर्पण करणे. हाच आहे, ‘कर्मयोग.’
- श्रुती आपटे