
Blog: धर्म म्हणजे काय?
- श्रुती आपटे
श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्म्याचे अविनाशी स्वरूप सांगितले, आता थोडे व्यावहारिक पातळीवर समजावून सांगत आहे. श्रीकृष्ण म्हणतो, ‘‘अर्जुना, तुझा स्वधर्म काय आहे याकडे पाहिलेस, तरी तुझं मन विचलित होणं योग्य नाही.
तू क्षत्रिय आहेस, युद्ध करणं, दुर्जनांचा नाश करणं आणि सज्जनांचं रक्षण करणं हेच तुझं कर्तव्य आहे. एखाद्या क्षत्रियाला, लढाऊ वृत्तीच्या व्यक्तीला योग्य मार्गानं शत्रूला नष्ट करण्याची संधी मिळणे हे भाग्याचं असतं.
’’ एखादा विषय समजून घ्यायचा असल्यास त्यातील महत्त्वाच्या शब्दांचा नेमका अर्थ लक्षात घ्यावा लागतो. इथं धर्म म्हणजे काय हे समजून घेऊया. धर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ‘स्वधर्म’ असे श्रीकृष्ण म्हणतो,
तेव्हा त्याचा अर्थ स्वभाव किंवा गुणधर्म असा होतो. उदाहरणार्थ, उताराकडे वाहणे हा पाण्याचा धर्म आहे. सुगंध पसरवणे हा फुलांचा धर्म आहे.
तसाच अर्जुनाचा धर्म कोणता होता? शूरता, धाडसीपणा, निर्भयता, अन्याय सहन न करणे म्हणजेच क्षत्रियत्व हा अर्जुनाचा स्व-धर्म होता. क्षत्रिय युद्धाला कधीच भीत नाहीत.
बालमित्रांनो, आपल्या पोलिस दलाचे ब्रीदवाक्य तुम्हाला माहिती आहे का? ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’, म्हणजे ‘सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
आहे ना छान! कारण दुष्टांना मारल्याशिवाय सज्जन सुखी राहू शकत नाहीत हे तर आपण अनुभवतोच! आता, धर्म्य म्हणजे काय ते बघूया. धर्म्य म्हणजे योग्य.
हे युद्ध करणे योग्य आहे का? याचा विचार करूनच पांडवांना श्रीकृष्णाने युद्ध करणे कसे आवश्यक आहे, ते पटवून दिले होते. त्यामुळेच हे युद्ध राजनीतीस अनुसरून, म्हणजेच धर्म्य होते.