
त्यागमूर्ती नाही तर स्वार्थी होती मीरा ! समर्पणातून 'स्व'कडे जाणारा मीरेचा प्रवास
संत मीराबाई... कृष्ण वेडी मीरा... कान्ह्यात सामावणारी मीरा... स्वतःला विसरून स्वतःतच हरवणारी मीरा... अशा एक ना अनेक विशेषणांनी तुम्ही मीरेला मांडण्याचा प्रयत्न केला तरीही शेवटी त्या पलिकडेच आहे मीरा... असं म्हणावं लागतं.
मीराबाईच्या जीवनाची कहाणी सगळ्यांनीच ऐकली असेल. कृष्णाच्या अनेक गोपिकांसारखी, राधेसारखी कृष्णप्रेमात वेडी झालेली मीरा. लहानपणीच आईने कान्हाच तुझा ठाकूरजी म्हणजे नवरा, स्वामी आहे अशी ओळख आईने करून दिली अन् ही त्यालाच पूर्ण सत्य मानून सबंध जीवन जगली.
लहान मुलीच्या मनाच्या, विश्वासाच्या अगदी जवळची असणारी आई जेव्हा सोडून जाते तेव्हा आईने दाखवलेले हे श्रद्धास्थानच आपलं सर्वस्व मानून ही कोवळी मुलगी लहानाची मोठी झाली. तिच्या या श्रद्धेला भक्तीची आणि प्रेमाची जोड मिळाली अन् ती घडत गेली. अगदी तिच्याही नकळत.
आजच्या काळात आपण प्रेमाला दरवेळी शरीराशी जोडून तेवढ्याच मर्यादेत त्याकडे पाहतो. म्हणून राधेला कृष्णाची प्रेयसी म्हणतो आणि मीरेला राधेचा राग येतो असं ठरवून मोकळे होतो. पण खरं प्रेम त्याकाळीही देहातीत होतं अन् कायम तसंच राहणार. त्यामुळे आज आपण इथे मीरेच्या त्या देहातीत प्रेमाच्या माध्यमातूनच तिचं जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
मीरा मेवाडची. त्या भागात पतीला ठाकूरजी किंवा राणा म्हणतात. राणा म्हणजे राजा. जो राज्य करतो. स्वामी ज्याच्या स्वाधिन आपण असतो. हे सत्य मानून मीरा आयुष्यभर चालली. वाढत्या वया बरोबर तिचा हा भाव दृढ होत गेला. मग तिला तिच्या कान्हा शिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. कारण कान्हाच तिचं विश्व होतं. तिचं लग्न झालं, पण दुसऱ्या कोणाला पती मानायला ती तयार नव्हती. मग तिला किती त्रास झाला आणि तिला मारण्यासाठी कसे प्रयत्न झाले याची कथा बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे. त्यातून मीरा कशी त्यागमूर्ती आहे हे जगासमोर आलं.
पण मला मीरा त्यागमूर्ती नाही तर स्वार्थी वाटते. जीला खऱ्या अर्थाने स्व काय आहे हे समजलं आहे. स्व मी नक्की कोण? अर्थ म्हणजे धन. माझं नेमकं धन काय आहे हे तिने खूप लवकर जाणलं आणि तिने ते मिळवण्याचा ध्यास घेतला. इतर कशाचीच त्यापुढे काहीच किंमत नव्हती. त्यामुळे तिने काही गमवलं नाही किंवा कशाचा त्यागही केला नाही. उलट तिला जे हवं होतं तेच तिने मिळवलं.
माझ्या लेखी मीराबाई खऱ्या अर्थाने धाडसी होती. ज्या काळात मीरा आत्मशोधात होती त्या काळात स्त्रियांनी अशी काही अपेक्षा करणंच चूक होतं. कृष्णाच्या मूर्तीत तिने भगवंताला शोधलं अन् त्याला आपल्या आत सामावून घेतलं. तिची जीव की प्राण असणारी ती मूर्ती जेव्हा घरच्यांनी गायब केली तेव्हा सगुणातून निर्गुण भक्तीकडे मीराची वाटचाल सुरू झाली.
ज्या स्व ला आजवर कान्हाच्या मूर्तीत ती बघत होती आता तो तिच्या रोमारोमात सामावल्यावर तिला चराचरात दिसू लागला. मग तिने महालाचा त्याग केला असं कसं म्हणणार? तो तिला चराचरात भेटत असताना एका पिंजऱ्यात स्वतःला कोंडून कसं घेणार?
स्व म्हणजे अंतरात्मा, जो अमर, अनंत आहे हे जिने ओळखलं तिला मृत्यूची भीती देहापूरते मर्यादित लोकच घालू शकतात. मग ज्या मीरेला माहितीये की, ती अमर, असीम, अनंत आत्मा आहे तिला विषाचा प्याला पिऊन क्लेष कसे होणार?
बाह्य जगात जे बघून आपल्याला खरोखर दुःख होतं अशा घटना मीरेच्या वाटेत काट्यांच्या रुपातली फुलेच ठरली. ती प्रत्येक घटना तिला जास्त जास्त आंतर्मुख करणारी, आत डोकावून आपल्या कान्हाला घट्ट मिठी मारायला लावणारीच ठरली. जो जगासाठी त्याग होता, ते प्रत्येक पाऊल तिने तिच्या स्व च्या दिशेने अधिक जवळ नेणारं ठरलं.
त्यामुळे मीरेकडे कोणी व्यक्ती म्हणून बघण्यापेक्षा कृष्ण म्हणजे प्रेम आणि प्रेमात सामावण्यासाठी लागणारं समर्पण म्हणजे मीरा, अशा दृष्टीकोनातून जर बघितलं तर मीरा अधिक चांगली समजू शकते...