esakal | खेळ मनाचा... दुःखी की आनंदी जीवनाचा?
sakal

बोलून बातमी शोधा

खेळ मनाचा... दुःखी की आनंदी जीवनाचा?

आनंदी जीवन कसं असावं? थोडं असावं पण ते ही आनंदी जगून सोडावं! याचं मूर्तीमंत प्रतीक म्हणजे फुलपाखरू. एक ग्लास आहे. तो अर्धा पाण्याने भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे. मग त्यामध्ये ग्लास अर्धा भरलेला आहे हे पाहून आनंदी व्हायचं की तो अर्धा रिकामा आहे म्हणून त्याच्या दुःखात ओंजळीत असलेल्या आनंदालाही परकं व्हायचं, हे ज्याचं-त्यानं ठरवायचं... 

खेळ मनाचा... दुःखी की आनंदी जीवनाचा?

sakal_logo
By
साक्षी साळुंखे, सातारा

फुलपाखरू... आनंदी जीवन कसं असावं? थोडं असावं पण ते ही आनंदी जगून सोडावं! याचं मूर्तीमंत प्रतीक नाही का हो? अन्‌ माणूस पाहायला गेलं तर कुणी येता-जाता सहज जरी विचारलं की ‘काय कसं चालू आहे?’ तर उत्तरं अशी येतात जसं की सगळ्या जगाचा पत्कोर यांनीच घेतलेला असतो, इतकी कंटाळवाणी ती असतात. आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टींतला का आनंद ओळखता येत नाही? प्रत्येक गोष्टी करायच्या म्हणून करतो? बहुतेक लोक तर दररोजच्या अगदी साध्या-सोप्या गोष्टींना सुद्धा कंटाळवाणं करून सोडतात; म्हणजेच त्यातला आनंद न घेता केवळ करत राहणे इतकंच काय ते त्यांच्या डोक्‍यात असावं. ज्या कामात आनंद आहे ते करण्यापेक्षा जे काम वाट्याला आलंय त्यात का नाही आनंद शोधू शकत आपण? कोणतेही प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पती... कोणताही गाजावाजा न करता हे सहजसाध्य करतात. पण, आपण त्याचा फार मोठा किस्साच करून ठेवतो. बरोबर ना!

एका कथेमध्ये माझ्या वाचनात आलं. एका आश्रमात गुरू आणि त्यांचे शिष्य राहत असतात. एके दिवशी एक व्यक्ती त्या आश्रमात आपली गाय दान करून जातो अन्‌ ही गोष्ट शिष्य त्यांच्या गुरूंच्या कानावर घालतात. त्यावर गुरू म्हणतात ‘छान झालं. आपल्याला दूध प्यायला.’ पण, आठवड्यानंतर शिष्य गुरूंकडे जाऊन सांगतात की ‘महाराज तो व्यक्ती ती गाय परत घेऊन गेला.’ त्यावर गुरू म्हणाले ‘बरं झालं! शेण उचलण्याचा आपला त्रास वाचला.’ गोष्ट वाचल्यावर इतकं प्रसन्न वाटलं म्हणजे कोणत्याही स्थितीतला आनंद शोधायचा की दुःख हे आपल्याच हातात आहे, असं म्हणतात. ‘जो कोणत्याही स्थितीत आनंदी असतो, त्याला कोणीच दुःखी करू शकत नाही. परिस्थिती बदलली की, मनःस्थिती बदला. शेवटी आनंद व दुःख या परिभाषा मनाच्याच असतात!
फुलांनाच घ्या ना. त्यांना कदाचित जगण्याचं रहस्य कळालं असावं. स्वतःही आनंदित राहणे आणि समोरच्यालाही आनंदी करून सोडणे. दुःखं काय प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात, पण चेहऱ्यावर हास्य ठेवून दुःख लपवणाऱ्या व्यक्तींनीच खरं आयुष्य वाचलंय ना? याचं उदाहरण द्यायचं झालचं तर मी चार्लिन चॅप्लीन यांच देईन. आलेल्या परिस्थितीला माणूस कोणत्या दृष्टिकोनातून घेतोय हे खूप महत्त्वाच असतं. कारण एक ग्लास आहे. तो अर्धा पाण्याने भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे. मग यामध्ये ग्लास अर्धा भरलेला आहे, हे पाहून आनंदी व्हायचं की तो अर्धा रिकामा आहे म्हणून त्याच्या दुःखात ओंजळीत असलेल्या आनंदालाही परकं व्हायचं, हे ज्याचं-त्यानं ठरवायचं... नाही का!

एकूणच सर्व खेळ मनाचा आहे. आपण जसा विचार करू तशी परिस्थिती आपल्यासमोर नक्कीच उभी राहणार आहे. म्हणूनच सगळे क्‍लेश, द्वेष, मत्सर, राग आणि महत्त्वाचं म्हणजे उद्याची चिंता सोडून मिळालेलं आयुष्य आनंदी कसं जगता येईल, याला प्राधान्य द्या. कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही!

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top