काँग्रेस पुनरुत्थानाच्या पल्याड

नवीन निर्माण गौरवशाली भूतकाळाच्या प्रतिमेत अडकलेले नाही, तर भविष्याकडे पाहणारे हवे.
Shekhar Gupta writes congress chintan shibir sonia gandhi rahul gandhi
Shekhar Gupta writes congress chintan shibir sonia gandhi rahul gandhisakal
Summary

गांधी परिवाराने अनेक प्रस्थापित नेते गमावले आहेत. काँग्रेस हळूहळू विभाजित झाली. हे गट टिकून राहण्याच्या आणि पुनरुत्थानाच्या पल्याड गेले आहेत. नवनिर्माण केल्यानेच संधी मिळू शकेल. हे नवीन निर्माण गौरवशाली भूतकाळाच्या प्रतिमेत अडकलेले नाही, तर भविष्याकडे पाहणारे हवे.

काँग्रेसच्या प्रलंबित ‘चिंतन’ शिबिराचे उद्‌घाटन सोनिया गांधी यांनी उदयपूर येथे केले. पक्षाचे पुनरुत्थान करण्याची हाक त्यांनी दिली. यातून चार प्रश्न उभे राहतात. एक म्हणजे आठ वर्षांपासून निद्रावस्थेत असलेल्या काँग्रेसचे पुनरुत्थान करता येईल का? दुसरे म्हणजे, जर हे शक्य असेल तर हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी काय करावे लागेल? तिसरे म्हणजे प्रादेशिक पक्ष विरोधी पक्षांची जागा घेत असलेल्या काळात एका राष्ट्रीय पक्षाची आवश्यकता आहे काय? आणि शेवटचा प्रश्न म्हणजे, जरी ती आवश्यकता असली, तरी तो राष्ट्रीय पक्ष काँग्रेसच असावा का? तो नवीन पर्याय ठरू शकेल का?

एकेकाळी अॅम्बेसेडर कारची चलती होती. काँग्रेसच्या ताब्यात जशी दशकानुदशके सत्ता होती, तशीच अॅम्बेसेडरदेखील सत्तेचे प्रतीक होती; पण १९८० च्या नंतर मारुती सुझुकी आणि इतर मॉडेलचा जोर वाढला. १९९१ च्या आर्थिक सुधारणानंतर हिंदुस्थान मोटर्सच्या मालक आणि व्यवस्थापनाने असाच विचार केला असेल, की अॅम्बेसेडरमध्ये सुधारणा घडवून आणायच्या का? दुसरे, कोणत्या उपायाने हे परिवर्तन घडेल? तिसरे, भारतातील कार बाजारात एकच राष्ट्रीय ब्रँड असणे खरेच आवश्यक आहे का? आणि चौथे जरी भारताला याची आवश्यकता असली, तरी तो ब्रँड अॅम्बेसेडरच असावा का? त्यानंतर हिंदुस्थान मोटर्सने अॅम्बेसेडरमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या, हे लक्षात घ्या. त्यांनी कारचे बाह्यरूप बदलले. अधिक वातानुकूलित मॉडेल्स निर्माण केले. जपानी इंजिनाचा समावेश केला; पण यातले काहीच अॅम्बेसेडरला वाचवू शकले नाही.

आता काँग्रेसला अॅम्बेसेडरच्या जागेवर ठेवा, म्हणजे तुम्हाला पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरे मिळतील. कालबाह्य झालेल्या ब्रँडमध्ये सुधारणा करणे शक्य नसते. काँग्रेसने जे उपाय करून पाहिले ते सर्व अयशस्वी ठरले आहेत. अगदी ताजे उदाहरण म्हणजे उदयपूरमधील शिबिरात गुजराती नेता हार्दिक पटेल याची अनुपस्थिती. ज्याला काँग्रेसने पक्षाचा तरुण प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडले होते. एका परंपरानिष्ठ पक्षातील हा सुधारणावादी प्रयोग होता. नवीन आघाडी अपयशी ठरली. मग ती ममता बॅनर्जी यांच्यासोबत असो, डावे, धर्मनिरपेक्ष जनता दल (कर्नाटक), राजद, तेलगू देसम (तेलंगण) आणि महत्त्वाची म्हणजे समाजवादी पक्षासोबत असो. आघाड्यांचे हे अपयश इतके विनाशकारी ठरले की समविचारी पक्षांना काँग्रेससोबत आघाडी करणे म्हणजे मृत्यूचे चुंबन घेण्यासारखे वाटू लागले. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने बसपसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असे राहुल गांधी यांनी नुकतेच सांगितले. पण, मायावतींकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा सोडून कोणताच पक्ष काँग्रेसला आघाडी करण्यासाठी योग्य समजत नाही.

काँग्रेसने सुधारणा करण्याचा खूप प्रयत्न केला; पण अपयशी ठरला. प्रियांका गांधींना प्रचारात उतरवण्यात आले; पण सर्व काही अपयशी ठरले. त्यामुळे ज्याप्रकारे नव्वदच्या सुरवातीला अॅम्बेसेडरमध्ये सुधारणा होऊ शकली नाही, त्याचप्रमाणे काँग्रेसचा ब्रँडही पुनर्स्थापित होऊ शकणार नाही. भाजपला विरोध करणाऱ्या अधिक चांगल्या पक्षाला त्यांनी जागा रिकामी करून द्यावी का?

अॅम्बेसेडरच्या मालकांची जी परिस्थिती होती तीच आज काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. बाजारात नवे कोरे उत्पादन आणून सर्वांना चकित करा. मोडतोड झालेल्या ब्रँडमध्ये तुम्हाला सुधारणा करता येणार नाही. तुम्हाला एक नवीन ब्रँड शोधावा लागेल. हे केले नाही, तर आमच्या यादीतील चौथा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहील. तो म्हणजे भाजपला आव्हान देऊ शकेल, अशा एका देशव्यापी शक्तीची गरज आहे. जर, नजीकच्या भविष्यात हे होऊ शकले नाही, तर निदान राजकारणात समतोल साधणे आवश्यक आहे. पण, अॅम्बेसेडरप्रमाणेच काँग्रेसचेही पुनरुत्थान शक्य नाही. काँग्रेस या स्थितीला पोहोचण्याची प्रक्रिया तीन दशकांपूर्वीच सुरू झाली होती.

मग आता भविष्य काय आहे? काँग्रेस उदयपूरमध्ये विचारमंथन करण्यात वेळ वाया का घालवत आहे? भारतातल्या या सर्वात जुन्या पक्षाने स्वतःचे विसर्जन करावे का? अर्थातच असा सल्ला कुणी देणार नाही किंवा कुणी अशी इच्छा करणार नाही. मी तर नक्कीच नाही. विरोधकमुक्त भारत ही दुःखद घटना असेल. काँग्रेसमुक्त भारत झाला, तर भारत तीन-चतुर्थांश विरोधकमुक्त होईल. त्यामुळे ‘ऑर्गनायझर’चे माजी संपादक शेषाद्री चारी यांनी काँग्रेस वाढावी आणि टिकावी, अशा शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचे असे म्हणणे होते, की काँग्रेस फुटली पाहिजे. फूट पडणे, हे काही नवीन नाही, विशेषतः १९६० पासून. काँग्रेस ओ, जे, एस, आर, एनसीपी, काँग्रेस फॉर डेमोक्रसी. इतकी फूट पडली की नावे लिहायला इंग्रजी वर्णमाला कमी पडेल! प्रश्न असा आहे, की आता फूट पडली, तर कोण काय घेऊन जाईल आणि काय मागे ठेवील?

दशकभरात गांधी परिवाराने अनेक नेते गमावले. काँग्रेस हळूहळू विभाजित झाली. हे सर्व गट टिकून राहण्याच्या, सुधारणेच्या आणि पुनरुत्थानाच्या पल्याड गेले आहेत. काहीतरी नवीन निर्माण करणे हाच मार्ग आहे. हे नवीन निर्माण गौरवशाली भूतकाळाच्या प्रतिमेत अडकलेले नाही, तर भविष्याकडे पाहणारे हवे. नेहरू, इंदिरा, राजीव कुणीही घ्या, तुमच्या भूतकाळासाठी वीस टक्क्यांपेक्षा जास्त लोक तुम्हाला मतदान करणार नाहीत. तुम्ही काहीही करून अॅम्बेसेडर कार परत आणू शकत नाहीत. पूर्णपणे नवनिर्माण केल्यानेच तुम्हाला संधी मिळू शकेल. पण, जे करायचे ते लवकर. तुम्ही ज्या बेटावर बसला आहात ते पुरात झपाट्याने नष्ट होत आहे.

जातीआधारित पक्षांनी मते हिरावली

जातींवर आधारित पक्षांनी देशाच्या ‘हार्टलँड’मधील काँग्रेसची धर्मनिरपेक्ष व मागासवर्गीयांची मते हिरावून नेली. राज्यामागून राज्यात काँग्रेसने आपली मतपेढी गमावली. अनेकदा काँग्रेसमध्येच अंतर्गत बंडाळी झाली. उदाहरणार्थ, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, हिमंत बिस्वा सरमा आणि आता ‘आप’ उरलेल्या मतपेढीवर कब्जा करत आहे. पक्ष आपले नाव बदलू शकत नाही, त्याचप्रमाणे सर्वोच्च नेतृत्वातही बदल करू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com