Sushma Andhare Latest news : भरकटलेली महाप्रबोधन यात्रा ; सुषमा अंधारेंच्या 'फ्लाॅप सभा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare

Sushma Andhare Latest news : भरकटलेली महाप्रबोधन यात्रा ; सुषमा अंधारेंच्या 'फ्लाॅप सभा'

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची महाप्रबोधन यात्रा सध्या सोलापूर जिल्ह्यात आहे. या यात्रेच्या अंतर्गत जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभा होत आहेत. मात्र या सभांना मिळत नसलेला उत्तम प्रतिसाद, खेचली जात नसलेली गर्दी अन् सुषमा अंधारेंच्या भाषणाचा अपेक्षित पडत नसलेला प्रभाव,कडव्या शिवसैनिकांमध्ये भारलं जात नसलेलं कट्टर हिंदुत्व, ठाकरेंच्या नेतृत्वाला उभारी मिळण्यासाठी उठत नसलेली हवेचा माहोल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात तयार होत

नसलेलं जनमत या सगळ्या पार्श्वभूमीवर, बाळासाहेब उद्धव ठाकरे शिंदे गटाची भरकटलेली प्रबोधन महायात्रा आणि सुषमा अंधारेंच्या फ्लाॅप सभा असंच काहीसं वस्तुनिष्ठ अन् खरंखुरं निरीक्षण याबाबतीत नोंदवता येईल.

बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसैनिकांची मोळी विस्कटू नये, त्यांच्यामध्ये शिवसेनेबद्दलची तीच आस्था, तोच जिव्हाळा, तीच स्फुर्ती अन् चैतन्य कायम रहावे, शिवसेनेत झालेली फाटाफुट आणि ढवळून निघालेलं राजकारण, बाळासाहेबांची निस्तनाबूत करण्यासाठीचे भाजपाचे डाव अन् सर्व प्रकारच्या खेळ्या या सगळ्या आघाड्यांवर बाळासाहेबांच्या मूळ शिवसेनेचा मूळचा बाज आणि अस्तित्व कायम राहावे,

शिवसेनेचं तेच भगवंत वादळ कायम राहावं जे भाजपसोबतच्या चढाओढीत अटकेपार झेंडा लावण्यात सरस राहील. या हेतूने बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेना गटानंं महाराष्ट्रात महाप्रबोधिनी यात्रा काढली आहे.

दरम्यान या गटाच्या आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या खांद्यावर या महायात्रेची शिवधनुष्य देण्यात आलं. सुषमा अंधारे यांना स्वतःचे नेतृत्व सामर्थ्यवान करून या गटात स्वतःच्या नेतृत्वाची उंची वाढवण्याची आयतीच संधी चालून आली, त्यासाठी त्या जीवाचं रान करून ही संवाद यात्रा यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, महाप्रबोधन जन यात्रेतून हे इप्सित साध्य व्हायला हवं, प्रबोधन यात्रेची उठायला हवी ती उठताना दिसत नाही,

सुषमा अंधारे यांच्या सभा तितक्याशा प्रभावी ठरत नाहीत, या तुलनेत खासदार संजय राऊत हे जर यात्रेत सहभागी असते तर त्यांनी मैदान मारले असते, रान पेटविले असते. नाही म्हटले तरी फरक पडला असता, पण सध्या ते विजनवासात दिसतात.असो. कोणत्याही जनसंवाद यात्रेला जो आजपर्यंत बाज दिसला, तो ठाकरे गटाच्या या याञेला दिसत नाही.

महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची विचारसरणी आणि भविष्यातील 'व्हिजन' सुषमा अंधारे रुजविण्याचा अट्टाहास मांडत असल्या तरी ते तितकसं रूचत नसल्याचं वास्तव आहे.

वेगळी राजकीय प्रकृती आणि पोत असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सांगोला, मोहोळ कुर्डूवाडी यासह मुख्य सोलापूर शहरात सुषमा अंधारे यांच्या सभा झाल्या, या सभांना गर्दी झालीच नाही असं म्हणता येणार नाही, पण जी अपेक्षित गर्दी खेचायला हवी होती, तितकी ती खेचली गेली नाही, जे हवा व्हायला होती ती हवा झाली नाही, या सभांवेळी आपल्या आक्रमक शैलीतून भले सुषमा अंधारे भाजपवर तुटून पडल्या पण एकूण परिणाम तितकासा साधला गेला, असं म्हणणं चुकीचं ठरेल.

बाळासाहेब ठाकरे यांची मुळची शिवसेनेची विचारधारा, शिवसेनेच्या विचाराचं व्हिजन यापेक्षा भाजवर टीकेचे विखारी फोडण्यातच अंधारे यांना स्वारस्य वाटले, तेच जिल्ह्यातील जनतेला बहुधा पटलं नाही. पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मागच्या काही वर्षात भाजपाची चांगलीच ताकद वाढली आहे, अशा 'कमल खिले' परिस्थितीत भाजपच्या नावानं ओकलेली गरळ येथील लोकांनी दूर्लक्षीत केली.

सोलापूर जिल्ह्यात सध्याही भाजप अभियान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जनभावनेचा आधार आहे, मोदींचे नेतृत्व आश्र्वासक वाटते, त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची यात्रा आणि सोलापूर जिल्हा हे जर समीकरण घातलं तर परिणाम या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह येईल, हे माञ नक्कीच !

तोफा धडाडल्या पण झाली करमणूक !

'संमदं ओके' डायलॉग फेम आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात सांगोला तालुक्यातील सभेत अपेक्षितपणे सुषमा अंधारे यांनी टीकेच्या तोफा डागल्या. पण साध्य काय झालं ? हा मुद्दा उपस्थित केला गेला. आमदार पाटील हे त्यांच्या ठिकाणी जसेच्या तसे राहतील.जहरी टीकेचे बाण सोडुन घायाळ होतील एवढे लेचेपिचे पाटील नाहीत. इथल्या सभेत अंधारे यांनी त्यांना 'टार्गेट' केले. तोंडसुख घेऊन टाळ्या मिळवल्या पण फार काही साधले असे नाही, केवळ त्यांचं मनोरंजन आणि करमणूक झाली इतकाच मतितार्थ काढता येईल.

लक्षवेधी नोंदी

* केवळ भाजपवाल्यांना टार्गेट करायचं हाच सुषमा अंधारेंचा दिसला अजेंडा

* विधानसभा आणि मातोश्रीवर बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचाच भगवा फडकणार ही अंधारेंची वक्तव्य ठरलेली केवळ अतिशयोक्तीची

* भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्या इतपत अंधारे यांच्या नेतृत्वाची उंची आहे का असा उपस्थित केला गेला सवाल

* महाप्रबोधन यात्रेच्या भाषणांमधून शिवसेना पक्षाऐवजी सुषमा अंधारे यांचा स्वत:लाच मोटीवेट करण्याचा दिसला प्रयत्न

* जिल्ह्यातील प्रत्येक सभेवेळी तेच ते मु्द्दे, भाजपला टार्गेट करण्याची तीच ती रणनिती नाही राहिली लपून

* महाप्रबोधन याञेतील सुषमा अंधारे यांच्या सभांना भगवं उपरणं खऱ्या अर्थाने गळ्यात घालून आलेल्या प्रामाणिक आणि सर्वसामान्य शिवसैनिकांची संख्या दिसली तोकडी