चंद्रकांतदादा-देवेंद्रजींचे आभार ! 

Thanks to Chandrakantdada-Devendraji!
Thanks to Chandrakantdada-Devendraji!

चंद्रकांतदादा आणि देवेंद्रजी "अभ्यासोनीच प्रकटतात'. त्यांनी आठवडाभर सांगलीत "कार्यक्रम' कसा झाला याचा अभ्यास केला आणि कोल्हापूर आणि मुंबई मुक्कामी त्याचे निष्कर्ष मांडले. ते अतिशय महत्त्वाचे असेच आहेत. दादा म्हणाले,""यांचा करेक्‍ट कार्यक्रम म्हणजे फक्त "पळवापळवी' आहे.'' देवेंद्रजी म्हणाले,""हा तर सत्ता आणि पैसा यांचा वापर करून सांगलीत आमची सत्ता हिसकावून घेतली आहे.'' या दोघांच्या सखोल अभ्यासामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक ऋषीतुल्य वृत्तीच्या नेते मंडळीची मने खूप दुखावली आहेत. कारण असे काही अभद्र कृत्य करावे हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते आणि नाही. ते प्रत्यक्षात करणार तरी कसे? 

खरेतर हे सारे घडले ते भाजपच्या ब्रॅन्डेड विचाराच्या सदस्यांचे मनपरिवर्तन करून. त्यासाठी या साऱ्या सदस्यांना कुटुंबापासून दूर मुक्कामी नेण्यात आले. शहर विकासासाठी काळाची गरज ओळखून कशी पुरोगामी भूमिका घेतली पाहिजे, यासाठी त्याचं प्रदीर्घ प्रबोधन-समुपदेशन करण्यात आले. सात नगरसेवकांच्या त्यागाची दादा आणि देवेंद्रजींकडून झालेली अवहेलना कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील समस्त शुद्ध चारित्र्याच्या नेतेगणांच्या मनाला फारफार लागली आहे. इकडे समस्त सांगलीकरही आता निराश झाले आहेत. कारण त्यांचा वेगळाच ग्रह झाला होता. सर्व सात फुटीर नगरसेवकांपैकी दोघांना आजारपणाने कसे गाठले, याच्याच विवंचनेत सारे होते. त्या आजारी नगरसेवकांनी निदान घराच्या गच्चीत येऊन तरी नागरिकांना आपण बरे आहोत, असे सांगायला हवे अशी मागणी जोर धरत होती. 

ब्रॅन्डेड नगरसेवक कॉंग्रेसमधील विकास महर्षीच्या शहर विकासाच्या भव्य दिव्य कल्पना साकार करण्यासाठीच तिकडे गेले आहेत, असा समज सांगलीकरांचा झाला होता. कारण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या या सर्व महर्षींनी पाडलेल्या प्रकाशातच गेली वीस वर्षे सांगली, मिरज आणि कुपवाड शहराचे नागरिक उजळून निघाले आहेत. मधेच भाजपची निष्क्रिय अडीच वर्षांची सत्ता आली आणि महापालिकावासीय अस्वस्थ झाले होते. दादा आणि देवेंद्रजींचे अभ्यासपूर्ण निष्कर्ष पुढे आले आणि सांगलीकरांच्या मनात त्या सात नगरसेवकांप्रती निर्माण झालेल्या उच्चकोटींच्या भावनांचा कल्लोळ एकदम शांत झाला. 

आपले हे उच्चविद्याविभूषित त्यागी नगरसेवक असे कसे वागले, याच्या खूप खूप वेदना सांगलीकरांना आता होत आहेत. इकडे आमचे नूतन महापौर दिग्विजयजी.. तर सध्या सांगलीपासून बारामतीपर्यंत पायाला भिंगरी बांधून पळत आहेत. त्यांनी शहर विकासाचे शिवधनुष्य उचलले आहे. ते पेलण्यासाठी चाणक्‍य मंडलातील भाजपेयींही सरसावले आहेत. दिग्विजयजी जो काही शहर विकासाचा पाया घालण्याचा विडा उचलणार आहेत; त्यात पक्षभेद न करता खारीचा वाटा सर्व भाजपेयींचा असणार आहे. त्याची सुरवात म्हणून नुकतीच विश्रामबागी कार्यालयी दिग्विजयजींच्या यथोचित सत्काराने झाली आहे. अशा सर्वांचाच भ्रमनिरास दादा आणि देवेंद्रजींच्या वक्तव्याने झाला आहे. 

पळवापळवी...भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर असे लोकशाहीला काळिमा लावणारे प्रकार घडल्याचे कोणालाच माहीतच नव्हते. त्यांनी जयंतरावांच्या कृष्णकृत्याचा पर्दाफाशच केला आहे. कारण समस्त सांगलीकर तर जयंतरावांचे सरळ एका रेघेतील निर्मळ राजकारणच आजवर पहात आले आहेत. यानिमित्ताने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कृत्याचा पंचनामा झाला आहे. त्यांच्या कार्यक्रमामागची खरी माहिती बाहेर आली आहे. दादा आणि देवेंद्रजींचे त्याबद्दल समस्त सांगलीकर ऋणी आहेत. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com