हे ही दिवस जातील...!

 These days will pass ...!
These days will pass ...!

साधारण तीन-चार महिन्यांपूर्वी कोरोना, क्वारंटाइन, कोविड-19, लॉकडाउन हे शब्दही आपल्याला माहीत नव्हते आणि आज प्रत्येकाच्या तोंडी दिवसातून किमान पाच-दहा वेळा तरी हे शब्द येतात. खरोखरच एका अगदी शुल्लक जिवाणूने संपूर्ण जगाचे व्यवहार ठप्प केले. 30 जानेवारी 2020 ला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविड-19 ला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले. धर्म, पंथ, जात, लिंग, वय, देश, प्रादेशिकता असे विषमता दर्शविणारे सर्व घटक बाजूला सारून कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या मगरमिठीत जखडून टाकले. 

कोविड-19 च्या अचानक लागलेल्या या ब्रेकमुळे आपली सामाजिक वीण व तिची दृढताही देखील जाणवली. पैसा, उत्पन्न, मालमत्तेचा संग्रह, त्यातून येणारी सधनता अशा भौतिक सुखसमाधानापेक्षा नात्याचे बंध व त्यातील माणुसकीची वेगवेगळी रुपे समजली. पाश्‍चात्त्य देशात संचारबंदीच्या काळात घराच्या उंबरठ्याआड घडणारी हिंसा-घटस्फोट यांचे प्रमाण वाढले. पण आपल्या भारतात तेवढ्या प्रमाणात तसे घडले नाही आणि त्यातूनच कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले. 

सुरवातीला याचं गांभीर्य कळलं नाही. जसे स्वाइन फ्लू, एड्‌स असे भयंकर पसरणारे साथीचे रोग आले आणि गेले. हा कोविड-19 पण तशा प्रकारेच असावा अशी मनाची (चुकीची) धारणा होती. मी एक अभिनेता असल्याने एका हिंदी चित्रपटात भूमिका करत आहे व त्या अनुषंगाने 10 मार्चला कर्नाटक - बेळगावमधील खानापूर तालुक्‍याला चित्रीकरणासाठी आलो. चित्रपटाचे चित्रीकरण व्यवस्थित चालू होते. म्हणजे बरेचसे चित्रीकरण पूर्ण झाले आणि 24 मार्चचे माझे पुण्याचे परतीचे रेल्वेचे आरक्षण झालेले होते आणि 23 मार्चपासून आपल्या संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले गेले, ते सुरवातीला 31 मार्चपर्यंत. विचार केला की, संपूर्ण देशातच लॉकडाउन केला आहे, तर ठिक आहे 31 मार्चनंतर घरी परतू. पण नंतर एक एक बातम्या येऊ लागल्या आणि परिस्थितीतचं गांभीर्य लक्षात येऊ लागले. 

मनात अनेक विचार येऊ लागले. हळूहळू माझं मन:स्वास्थ बिघडू लागलं. काय करावं काही सुचत नव्हते. प्राणायाम, योगासन, ध्यानधारणा यांनी शारीरिक व मानसिक आरोग्य नीट ठेवण्यात यशस्वी झालो... घरी सगळे वाट बघताहेत. घरी जायची खूप इच्छा आहे... पण घरी जायला कोणतेही साधन उपलब्ध नाही. रस्तेच बंद झाले आहेत आणि अशी ही अवस्था माझी एकट्याचीच नाही तर, जगातील बहुतांश देश या एकाच कारणामुळे ठप्प झाले आहेत, असे जगाच्या इतिहासात अन्य उदाहरण नसेल. 

आपल्याला वाटायचे की वाईट वेळ 50-100 वर्षांनी येईल, पण ही अशी वेळ आताच येईल असे वाटले नव्हते. असं वाटतं की हे एक वाईट सुरू स्वप्न आहे... पण सध्या तरी हे वाईट स्वप्न-की सत्य-लवकर संपेल असे वाटत नाही. एकीकडे घरी जाण्याची ओढ लागली आहे, तर इकडे सगळे रस्तेच बंद केल्यामुळे जाताही येत नाही. पण आता फक्त स्वतःचा विचार न करता, आपल्या देशावर आलेल्या या संकटाचा विचार करायला हवा. 

सध्याच्या संकटातून बाहेर पडताना आपल्या देशातील असंख्य डॉक्‍टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, पोलिस यांनी खरोखरच अनमोल कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू जाहीर केला आणि आपल्या देशातील जनतेने त्यांच्या आदेशाचे पालन केले.... अर्थात असे करताना काही वेळा पोलिसांना थोडं कठोर व्हावं लागलं आणि यातील विनोदाचा भाग म्हणजे, नागरिकांचा जीव वाचावा म्हणून पोलिसांना लाठीमार करावा लागत होता. पण एकंदरीत सर्वच जण आपापल्या आयुष्यातील वाईट वेळ अनुभवत आहेत. या कोरोनामुळे गोरगरिबांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. सर्वच जण जिथे आहेत तिथे अडकून पडले आहेत. संपूर्ण जग कोविड-19 चा मुकाबला करत आहेत. अशा वेळी उपयोगी पडणारे "हायड्रोक्‍सोक्‍लोरोक्विन' हे औषध अमेरिकेसह नेपाळ, भूतान, श्रीलंका, इस्राईल, स्वीडन, इटली अशा जवळपास 45-50 देशांना मदत करणाऱ्या आपल्या भारत देशाचे स्थान आंतरराष्ट्रीय समुदायापुढे अभिमानाने आले आहे. या विचारानेच मनाला उभारी आली आहे आणि मनोमन विचार केला की नक्कीच हे ही दिवस जातील आणि आपण सारेच या कोरोना विरुद्धचा लढा यशस्वीपणे जिंकून दाखवू. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com