आज फिर जीने की तमन्ना है...!

 Today I want to live again ...!
Today I want to live again ...!

हे कसं झालं मंडळी पिंजऱ्यातल्या पोपटाला विचारायचं, काय बाबा कसं वाटतंय, हसतोयस ना, हसायलाच पाहिजे. अहो सगळं स्वातंत्र्य हिरावून घेऊन वर दहशतीचा बागुलबुवा, सारेच अनभिज्ञ. नेमकं काय मरणार का जगणार काही माहिती नाही. कोण मरणार, काय, कधी मरणार, कसे वाचणार, सगळे प्रयोग सुरू झाले. मंडळी हात धुऊन तर नुसतं दमायला झालंय. नुकतीच खरं तर घरात एक आकस्मिक दुःखद घटना घडली. 24 दिवसांचा आयसीयू ताण आणि धाकट्या बंधूंचा मृत्यू. माझ्यासारख्या अविवाहित बाईचा आधारच गेला. 67 वर्षांचा चित्रपट रोज डोळ्यासमोर उभं राहायचा. भाऊ कसला मुलासारखा सांभाळला होता मी त्याला. 16 मार्चला दिवस पाणी संपलं आणि पक्षी उडून जावेत तसेच सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. मुली गेल्या. मुलीने आईला नेलं आणि घराला मोठं टाळं लागलं आणि इकडे जगालाही लॉकडाउन. डोळे पुसत पाठीवर हात ठेवायला येणारी चार माणसं फक्त फोनवर बोलायला लागली. डोळे वाहणं चालूच होतं. टीव्हीवरच्या बातम्यातील उदासीनता वाढत होती. आता मृत्यूची भीती नव्हती कारण 24 दिवस मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते. पण आपल्याला काही झालं तर बघणार कोण सगळंच अवघड होतं. बंगला रिकामा होता. 

पंधरा माणसांच्या घरात मी एकटी उरले होते. कुणाशीच न बोलण्यानं आवाजही फुटत नव्हता. किमान सहा तास जन्मभर बडबडणारी मी, कारण पेशाने शिक्षक मी बोलू कुणाशी. देवघरातल्या देवावर धूळ जमली होती. म्हणलं चला देवघर तरी निदान स्वच्छ करून घेऊया. बालकृष्ण, बलाढ्य गणेश, अष्टभुजेची छोटी प्रतिमा, हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग आणि स्वामी समर्थ. मग त्यांच्याशी संवाद सुरू झाला. चला बाबांनो 15 दिवस आंघोळ नाही की नैवेद्य नाही. बाळकृष्णा भूक लागली असेल ना रे, गजानना पोट कमी झालयं, विठ्ठला कमरेवरील हात आता तरी काढा. लोकांनी देऊळ बंद केलयं हं. आई अंबाबाई पुरे झाली गं शिक्षा. असं बरंच काही आणि मग लक्षात आलं की मी यांना रागवू शकते, यांच्याशी वाद घालू शकते, ठणकावून सांगू शकते, यांना शिस्त लावू शकते. सात तास एक तास सकारात्मक जायचे. ते देव देव राहिले नव्हते मी त्यांची आई झाले होते आणि हे आईपण अगदी छानपणे अनुभवत होते. सोलापुरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही म्हणून समाधान वाटत होतं. आणि अचानकच रुग्णांची संख्या वाढू लागली. माझ्या घराचे आजूबाजूचे सात-आठ परिसर हळूहळू सील झाले. कॉलनीत 33 डॉक्‍टर ते रोज वेगवेगळेच सांगायचे. मग भांबावून जायचं. विज्ञानाची पुरस्कर्ती मी, पण गजानन महाराज सकाळी राम रक्षा स्तोत्र संध्याकाळी हे मी का करायला लागले हेच मला समजत नव्हतं. सगळे उपाय संपले की माणसं अंधश्रद्धाळू होतात हेच खरं. 

मनात विचार केला की सुरू झालाय म्हणजे संपणारच की. पण पुन्हा शंका, अरे प्लास्टिक कुठे संपलयं, मानवनिर्मितच ना. निसर्गाला ते संपवता येत नाही असे हजार विचार. त्यात टीव्हीवरच्या ओरडून बातम्या सांगणाऱ्यांची स्पर्धा. कसला दहशतवादच एक प्रकारचा. लॉकडाउन, सील होणं, पोलिस गस्त, भोंग्याचा तो प्रकार सगळं चालू होतं. रस्त्यावर येणाऱ्यांना काठीचा प्रसाद मिळत होता. एक भय्या दूध घेऊन गाडीवर चालला होता. त्याला दुसरा म्हणाला अरे आज मरना है क्‍या? तो उत्तरला नाही साहेब आज तो जीने की ठान ली है. बास, मला तेच वाक्‍य प्रेरक वाटलं होतं, आज फिर जीने की तमन्ना है. ठरलं तर घरात काम होतं त्याचं थोडं नियोजन केलं. भिंतीशी बोलणं सुरू झालं. चार दिवारे छत और मै हम तज्ज्ञ यहा रहते है. दिवारे मुझसे बाते है करती और मै उनसे प्यार. 

बघता बघता माझं घर सजीव झालं. कल्पनेचा हा खेळ आनंद देऊ लागला. मी कविता लिहायला लागले आणि गुणगुणायला लागले. झाडांना, फुलांना, पानांना कुरवाळायला लागले. साऱ्यांना धीर देऊ लागले. मला आत्मविश्‍वास आला. सगळं निवांत पण व्यस्त झालं. मी आनंदित झाले. भांडी बोलू लागली. कपडे डोलू लागले. मनाचे सावट दूर झाले. केर सहज निघू लागला. जेवणात रस आणि आमरस वाढला. खोलीत दुसरी खुर्ची ठेवून जगात नसलेल्या भावाशी संभाषणही सुरू झाले. हे खुळेपण नक्कीच नव्हतं. ही सकारात्मकता होती करोनाच्या मेदावर आणि प्रथिनांवर मात करणाऱ्या व्हिटामिनची. जी म्हणजे जीवन, सुंदर जगणं. शिळी पोळी खाताना एक दिवस आठवण झाली उपाशी कुटुंबाची. बॅंकेत जमलेल्या भरगच्च पेन्शनमधून एक आकडा दानाच्या पेटीत टाकला आणि मन समाधान पावले. वयाच्या सत्तरीपर्यंत खूप जग पाहिलं असं आपण म्हणतो पण मी ते जग खूप तोकडं पाहिलं होतं. खऱ्या अर्थाने भूगोलाचा अख्खा गोल कोरोनाने आणि त्याच्या दहशतवादाने व्यापला असताना मी केवळ सकारात्मकतेमुळे आणि नकारात्मकतेला बाजूला घेऊन जगणं शोधलं. नकारात्मकतेला क्वारंटाइन केलं आणि घरातल्या चार भिंतीत स्टे होमचा संदेश बाळगत शांतपणे आणि आनंदाने घरात जगत राहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com