उत्तराखंड दुर्घटना..! पर्यावरण सजगतेचा इतिहास आणि आपण 

Uttarakhand
Uttarakhand

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठ नजीकच्या रैणी गावातील डोंगरावरील नंदादेवी हिमनदीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. पर्यावरण अर्थात झाडांच्या रक्षणासाठी संपूर्ण जगभरात अनोख्या पद्धतीने झालेल्या चिपको या बहुचर्चित आंदोलनाला याच गावात गौरादेवी यांच्या पुढाकाराने मोठे यश आले होते. दुर्दैवाने झाडांच्या रक्षणासाठी ज्या चमोली जिल्ह्यातील रैणी गावात मोठी आंदोलने उभारली त्याच गावात हिमनदी तुटून मोठी दुर्घटना घडली. 

इतिहासापासून मानवाने नक्कीच बोध घ्यायला हवा आहे. पण माणूस इतिहासातील आंदोलनांचे, घटनांचे सोयीस्कर अर्थ घेतो. यामुळे विकासाच्या नावावर निसर्गावर चालवलेली कुऱ्हाड कधी मानवाच्या मानगुटीवर बसते हे कळतच नाही. विकासाच्या आड निसर्ग येतो की निसर्गाच्या आड विकास येतो, हे कळण्याइतपत अनेक दुर्घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. परवानग्या, नाहरकत यांसारख्या कागदी घोड्यांना नाचवले म्हणजे आपण पर्यावरणाला हानिकारक नसलेला विकास करतो, असा बाळबोध अर्थ घेणं आता थांबवायला हवे आहे, हेच या घटनेतून आपण समजून घ्यायला हवे आहे. दुर्घटनेबाबत अनेक अंगानं सध्या विवेचन सुरू आहे. पण पर्यावरणीय बदलांमुळे ही दुर्घटना घडली आणि मानव म्हणून आपण काय करायला हवे याबाबत मंथन व्हायला हवे आहे. केवळ ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम या गुळगुळीत झालेल्या प्रतिक्रियेला आता काही अर्थ राहिला नाही. घटनेची कारणमीमांसा ही ग्लोबल घटकांबरोबरच स्थानिक पातळीवरील पर्यावरणाच्या बाबतीत झालेल्या बदलांची कारणे शोधून उपाययोजनांपर्यंत व्हायला हवी आहे, हे नक्कीच. अर्थात या घटनेबाबत हवामान खात्याने या भागात धोकादायक वातावरण निर्माण होण्यासारख्या स्थितीचा अंदाज नसल्याने हिमनग कोसळण्याची घटना अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. हवामान खात्याच्या अंदाजाच्या बाहेरही अनेक घटना झाल्या आहेत. यावरून पर्यावरण बदलाचे दुष्परिणाम मानवी अंदाजांच्या कक्षेच्या पलीकडे असल्याचे स्पष्ट आहे. 

रैणी गावातील दुर्घटना आणि पर्यावरणाबाबत या भागातील लोकांची सजगता याबाबतच्या इतिहासाचे अवलोकन करायला हवे. दुर्घटना घडलेल्या भागाच्या जवळपास असलेल्या मंडल गावात 1964 च्या दशकात अतिवृष्टीमुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला होता. औद्योगिक कारणांसाठी होणारी वृक्षतोड व पर्यावरणीय बदल याचा सहसंबंध त्याकाळी स्थानिक लोकांच्या लक्षात आला. त्यामुळे या भागातील सामाजिक कार्यकर्ते चंडी प्रसाद भट यांनी वृक्षतोडीला दिलेल्या परवानगीच्या विरोधात व वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलने सुरू झाली. 1973 मध्ये तत्कालीन उत्तर प्रदेश व आताच्या उत्तराखंडमधील अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात पहिले आंदोलन झाले. त्यानंतर दुसरे आंदोलन ज्याला आपण चिपको आंदोलन म्हणतो ते गौरादेवी, बचनीदेवी, सुदेशीदेवी यासारख्या अशिक्षित स्त्रियांच्या पुढाकाराने 7 फेब्रुवारी 2021 ला दुर्घटना घडलेल्या उत्तराखंडातील चमेली जिल्ह्यातील जोशीमठ नजीकच्या रैणी गावातून झाले. 1974 गौरादेवी व त्यांच्या सहकारी महिलांनी डोंगर दऱ्यातील लोकांमध्ये प्रबोधन करत झाडे तोडायला येणाऱ्या ठेकेदारांच्या कामगारांनी झाडे तोडू नये म्हणून या महिलाच झाडाला चिकटून राहायच्या म्हणून या आंदोलनाला चिपको आंदोलन म्हटलं गेले. 

गौरादेवी व त्यांच्या सहकारी महिलांनी 2500 देवधर वृक्ष या आंदोलनातून वाचवली. हे आंदोलन महिलांनीच हाती घेतले. या अनोख्या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा मिळाला. चंडी प्रसाद भट, सुंदरलाल बहुगुणा, कॉम्रेड गोविंदसिंग रावत, गौरादेवी यांनी चिपको आंदोलनाला यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दखल घेत पंधरा वर्षे या भागात वृक्षतोड न करण्याचा निर्णय घेतला. 1730 मध्ये जोधपुरचे महाराजा अभयसिंह यांनी राजवाडा बांधण्यासाठी चुना भाजण्यासाठी बिश्‍नोई खेड्यातील झाडे तोडण्यासाठी कामगार गेले असता बिश्‍नोई लोकांनी त्याला विरोध केला. राजाच्या सैन्यांनी लोकांवर केलेल्या हल्ल्यात अनेक लोक मारले गेले. या आंदोलनाचे नेतृत्वही अमृतादेवी या महिलेनेच केले. हे आंदोलनही यशस्वी झाले. यांसारखी काही आंदोलने स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यत्तोर काळात झाली. 

पर्यावरणाबाबतची स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील सजगतेची व्याप्ती सर्वदूर पसरलाय हवी होती; पण दुर्दैवाने तसे झाले नसल्याने आता अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. वृक्षारोपणाचे व पर्यावरण संवर्धनाचे काम केवळ शासकीय कार्यक्रम किंवा एनजीओंचा कार्यक्रम न होता ; त्याला लोकचळवळीचे स्वरूप यायला हवे आहे. कारण पर्यावरणाचा विषय हा जगातील प्रत्येकाशी जोडला गेला आहे. त्यामुळे पर्यावरणासंबंधी शासकीय पातळीवरील धोरणे आखताना याला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा विचार व्हावा अर्थात असे विचार केल्याचे काही शासकीय व एनजीओच्या अलीकडच्या विविध कार्यक्रमांतून दिसत आहे. मात्र लोकसहभाग कमीच आहे. ते वाढविण्यासाठी विचारमंथन गरजेचे आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी निर्माण करणे गरजेचे आहे आणि अंतिमतः लोकांनीही घटना कुठे घडली; त्याचं आपल्याकडे काय होणार असा नकारात्मक विचार करू नये; कारण पर्यावरण बदलाचे परिणाम हे सर्वच भूभागांवर होताना दिसून येत असून, प्रदेशपरत्वे त्याचे स्वरूप वेगवेगळे आहेत एवढंच. 

- किरण चव्हाण, माढा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com