
Hug Day: अन् फायनली मला तिची मिठी मिळाली...
Hug Day Special Love Story: मी दिलेली साडी नेसून ती पहिल्यांदा तयार झाली होती... कारण आमच्याच एका मित्राच लग्न... छान जरी काठाची हिरवी साडी; त्यातही साडी घ्यायची म्हटली तर मला काय कळतं त्यातलं? आणि अजून कोणाला सांगूही शकत नव्हतो कारण प्रेमाची कबुली लोकांना द्यायची नाही ही एकमेव अट होती..
तिलाच घेऊन गेलो दुकानात सांगितलं, आईसाठी साडी घ्यायची आहे, सोबत चल... दुकानात खूप साड्या होत्या पण तिची नजर मात्र त्या बॉटल ग्रीन कलरच्या साडीवरच... तशी साडीही अगदी गोड होती; केशरी रंगाचे सुंदर काठ आणि छोटे बुट्टे होते साडीला..
साडी विकत घेतली बिलिंग काउंटर वर विचारते की बरी आहे ना नक्की? आवडली आहे ना तुला?... वेडी.. नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं...
बाहेर पडलो तसं तिला म्हटलं ऐक ना, "भूक लागली आहे, काहीतरी खाऊयात?"
"इकडे वडापाव छान मिळतो... चालेल?"
"नाही नको, कुठेतरी बसून खाऊयात ना"
यावर आमच्या बाई हसल्या, गाडीजवळ गेल्या आणि "चला" म्हणाल्या... मी गाडी काढली आणि दोघेही निघालो, घेतलेली साडी द्यायची पण तर होती... एका हॉटेल मध्ये आम्ही गेलो, ऑर्डर दिली आणि मग ती साडी मी तिला दिली...
"मला काय देतो आहेस? ठेव की बाजूला"
"आनंदच्या लग्नात ही साडी नेसावीस अशी इच्छा आहे, ब्लाऊज शिवून घे"
"अरे काकूंसाठी घेतलीस ना तू?"
"नाही; तुझ्याच साठी घ्यायची होती, पण असं सांगितलं तर तू ऐकलं नसतस म्हणून असं सांगितलं"
"बरं.." एवढंच म्हणून ती गालातल्या गालात हसू लागली..
जेवण झालं नी मला बाजारात घेऊन गेली, म्हणली, "आता साडीवरती ज्वेलरी नको?", एका मुलीसोबत ज्वेलरीच्या दुकानात थांबण्याची ही माझी पहिलीच वेळ होती, भरपूर प्रकार होते तिथे पण तिला ते आवडत नव्हते, तिने त्या दुकानदाराला ठामपणे सांगितलं की "काका काहीतरी सोबर आणि सिंपल दाखवा.. खडे असलेले दागिने नको."
मी "का?" असं विचारण्याची चूक मी केली.. त्यावर पटकन बोलली, "अरे काठापदराच्या साडीवर कोणी हे असे दागिने घालतं का?"
असो.. तिने दीड तास दुकान शोधल्यानंतर तिला काहीच मिळालं नाही, मग आम्ही पुढच्या दुकानात गेलो.
तिकडे तिने मोत्याचे दागिने आहेत का विचारलं? आणि त्यातून काही दागिने सिलेक्ट केले, एक मोठा तन्मणी, मोत्याच्या बांगड्या, नथ, बुगड्या, लांब झुबे आणि पायात चाळ हे सगळं घेऊन आम्ही बाहेर पडलो. तिला घरी सोडलं आणि मीही घरी गेलो.
लग्नाच्या दिवशी मी तिची आतुरतेने वाट बघत होतो, नेहमीप्रमाणे बाई लेट आल्या, गळ्यात चिंचपेटी, हातात एक पैठणीच टेक्स्चर असलेला बटवा आणि बोटातल्या अंगठ्या तेवढ्या मी बघितल्या नव्हत्या... तशी तिला गोल टिकली आवडते पण मला आवड म्हणून तिने चंद्रकोर लावली होती. त्याक्षणी असं वाटलेलं की जाऊन घट्ट मिठी मारावी... पण हिंमत झाली नाही...
पण का असं? म्हणजे जेव्हा हीच मैत्रीण होती तेव्हा तर अगदी हक्काने मिठी मारत होतो मी हिला, मग आता का नाही? प्रेमात जरा अवघडल्यासारखं होत होतं, पण खरंतर मला तेही आवडत होतं... तिने नजरेनेच विचारलं कशी दिसते आहे? मीही नजरेनेच हो म्हणालो तशी पटकन लाजली. आम्ही सगळे एकत्र जमलो सेल्फी काढली आणि मग स्टेजवर गेलो, मंगलाष्टक, विधी, फोटो, जेवण सगळंच झालं... पाठवणीची वेळ आली... झालं शेवटचे मोजून वीस मिनिट... आता इथून थेट मित्राच्या घरी जायचं होतं... आज काही मिठी मिळणार नाही यासाठी मी मनाची तयारी केली.
पाठवणीला लोकांच रडणं सुरू झालं आणि याही बाईंच्या डोळ्यात पाणी आलं.. का? तिला जवळ घेण्यासाठी मी पुढे सरसावलो पण तेवढ्यात दुसऱ्याच एका मित्राने तिला मिठी मारली.. नी म्हणाला, "रमे.. बाळा अगं आपला मित्र नाही चालला सासरी... ठिके?" सगळेच हसायला लागलो.. पाठवणी झाली आणि दोघे गाडीत बसले आम्हीही जायला निघालो..
पुढे जायला लागलो तेव्हाच कोणीतरी फटाके लावले, अचानक तिने माझ्या उजव्या दंडाला मागून घट्ट धरलं... आणि मला मागे ओढलं "थांब ना..." ती खूप घाबरून हळूच म्हणाली..
"का? तुला फटाक्यांची भीती वाटते?"
दबक्या आवाजात ती "हम्म" एवढंच म्हणाली.. साधारण एक-एक फटाका फुटत होता आणि ती दचकत होती, आमचा सगळा ग्रुप तिला बघून हसत होता.. इतरवेळी झाशीची राणी असणारी ती आत्ता एकदम भित्री भागूबाई झाली होती.
तिने हे सगळं बघून मला एका बाजूने पोटाला घट्ट मिठी मारली, मीही तिला सावरायचं म्हणून तिचा हात धरून ठेवला. तिच्या प्रत्येक दचकण्यासोबत तिची मिठी अजून घट्ट होत होती तसा मीच काहीवेळाने जरा संधीचा गैरफायदा घेत तिला घट्ट मिठी मारली.. आणि finally मला तिची मिठी मिळाली.. निमित्त काहीही असो; मला तिची मिठी मिळाली होती.