स्मृतिदिन : शिवप्रेरित शहीद भगत सिंगांना समजून घेताना....

डॉ. प्रमाेद फरांदे
सोमवार, 23 मार्च 2020

महापुरुषांचं जगणं आणि विचार समजून घेतले की सर्वसामान्यांच्या आयुष्यातही क्रांती घडून येते...शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..

महापुरुषांचं जगणं आणि विचार समजून घेतले की सर्वसामान्यांच्या आयुष्यातही क्रांती घडून येते. शहीद भगत सिंग हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक धगधगती ज्योत. त्यांचा स्वातंत्र्यासाठीचा ध्येयवाद ज्वलंत होता. त्यांचे चरित्र आजही राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती म्हणून प्रेरणा देणारे आहे. तरुणांचे आयडॉल असलेल्या भगत सिंगांचे छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्रोत होते.

बालपणीच भगत सिंगांनी छत्रपती शिवरायांचे चरित्र वाचले होते. शिवरायांचे धैर्य आणि धाडस यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. शिवरायांच्या गनिमी काव्याने त्यांचे बाहू स्फुरण पावले. शिवरायांच्या पराक्रमाने ते प्रेरित झाले. शिवाजी महाराजांनी जसे रयतेचे राज्य स्थापले त्याप्रमाणे इंग्रजांना या देशातून हाकलून देत बळीचे राज्य आणण्याची भगत सिंगांनी बालपणीच मनोमन प्रतिज्ञा केली होती. 

शेतकरी, कामगार, श्रमिक, दलित, महिला यांच्या प्रगतीसाठी, सुख-समाधान आणि समृद्धीसाठी बळीचं राज्य यावं यासाठी स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात भगत सिंगांनी वयाच्या १६ व्या वर्षी उडी घेतली. भगत सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाहोरला पोलिस अधिकारी सॅंडर्सला गोळ्या घालून लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला घेतला. पोलिसांनी भगत सिंग आणि चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू यांना पकडण्यासाठी नाकाबंदी केली. शोधमोहीम सुरू केली. त्यांना सहकार्य करणाऱ्यांच्या घरांवर छापे पडू लागल्यामुळे भगत सिंग आणि साथीदारांना लाहोरमधून बाहेर पडणे गरजेचे होते. 

पोलिस भगत सिंग आणि चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू यांना चांगले ओळखत असल्यामुळे बाहेर कसे पडायचे, असा बाका प्रसंग त्यांच्यापुढे उभा राहिला. अशा वेळी भगत सिंगांपुढे उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र. शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरकैदेत होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी युक्ती वापरून आग्र्याहून कशी सहीसलामत सुटका करून घेतली हे भगत सिंगांना आठवले आणि लाहोरहून सुटण्यासाठी एक अजब युक्ती शोधली. भगत सिंगांनी एक नाटक करायचे ठरवले. या नाटकात ते धनिक बनले. 

या साहेबांच्या पत्नीची भूमिका घेतली क्रांतिकारी भगवतीचरण यांच्या पत्नी सौ. दुर्गावहिनींनी. त्यांनी खानदानी वेश परिधान केला. त्यांचा तीन वर्षांचा मुलगा साची हा धनिक साहेबांचा (भगत सिंग) मुलगा बनून त्यांच्या खांद्यावर बसला. राजगुरूंनी नोकराचे कपडे घालून साहेबांची ट्रंक आणि होल्डॉल डोक्‍यावर घेऊन हे शाही कुटुंब रेल्वे प्लॅटफॉर्मवर आले. पोलिसांसमोरून ते रेल्वेच्या प्रथम वर्गाच्या डब्याकडे चालत गेले. डब्यात चढताना भगत सिंगांनी नोकर बनलेल्या राजगुरूंना वेंधळेपणाबद्दल फटकारले. पत्नीला खानदानी भाषेत डब्यात सावकाश चढण्याचा सल्ला दिला. हे नाटक बेमालूमपणे चालले होते. त्यामुळे पोलिसांना जराही शंका आली नाही. गाडी हलली आणि भगत सिंग आणि राजगुरू, दुर्गावहिनी आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा पोलिसांच्या कडेकोट वेढ्यातून, गुप्तचरांच्या तीक्ष्ण नजरेतून आपल्या अंगभूत धैर्याने, अभिनय गुणांमुळे लाहोरहून सहीसलामत निसटले व त्यांनी थेट कोलकाता गाठले. भगत सिंगांच्या या धाडस आणि धैर्यामागे प्रेरणा होती छत्रपती शिवरायांची. भगत सिंगांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

इतर ब्लॉग्स