कास्यानोव्ह यांचे युक्रेनवरील आक्रमणाचे भाकित

कास्यानोव्ह यांचा युद्ध दोन वर्ष चालण्याचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता
Vijay Naik writes russia ukraine war Vladimir Putin Volodymyr Zelenskyy politics UN
Vijay Naik writes russia ukraine war Vladimir Putin Volodymyr Zelenskyy politics UNSakal

24 फेब्रुवारी रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण केले. येत्या 24 जून रोजी त्याला चार महिने होतील. युक्रेनमधील शहरे एकामागून एक ताब्यात घेण्यासाठी सुरू झालेले हल्ले कमी होण्याची सुतराम शक्यता नाही. अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक जाचक निर्बंध लादलेत. रशियाची आर्थिक नाकेबंदी केली आहे, तरीही पुतिन बधलेले नाही. त्यांचा मोर्चा आता युक्रेनची राजधानी कीव्हकडे वळला असून, युद्धामुळे सुमारे 80 लाख लोकांनी देशातून पलायने केले, हजारो निष्पाप बळी गेले, राष्ट्रीय संपत्तीचे अब्जाबवधी डॉलर्सचे नुकसान झाले. अमेरिका व युरोपातील देशांनी रशियाचे आक्रमण धुडकावून लावण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष व्होलदेमीर झेलेन्सकी यांना शस्त्रास्त्र पाठविणे चालू ठेवले आहे. त्यामुळे व युक्रेनच्या सेनेच्या निर्धारामुळे झेलेन्स्की यांना रशियन सैन्याला थोपवून धरता आले. तथापि, आणखी किती काळ ते थोपवू शकतील, याचा अंदाज करणे कठीण आहे.

यापूर्वी, सीरियातील संघर्षामुळे युरोपात लक्षावधी युद्धग्रस्त लोकांनी पलायन केले व आता युक्रेनमधील लक्षावधी लोक युरोपात गेल्याने युरोपचे आर्थिक संकट अधिक वाढले आहे. दरम्यान, रशियाचे माजी पंतप्रधान मिखिल कास्यानोव्ह यांनी भाकित केले आहे, की युद्ध आणखी दोन वर्षे चालेल व त्यानंतर ऱशिया लोकशाहीच्या दिशेने वळला असेल. लोकशाहीबाबतचे भाकित कशाच्या आधारावर केले, याचा उलगडा मात्र त्यांनी केला नाही. किंबहुना पुतिन सत्तेवरून दूर झाले, तरच ते शक्य आहे. परंतु, सद्य परिस्थिती पाहता व रशियाचे कायमचे सर्वेसर्वा होण्याची महत्वाकांक्षा बाळगणारे पुतिन यांच्या रशियावर असलेल्या राजकीय पकड व वर्चस्वाकडे पाहता, रशिया लोकशाहीच्या मार्गाने जाईल, असे दिसत नाही. तथापि, कास्यानोव्ह यांचा युद्ध दोन वर्ष चालण्याचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे.

पुतिन अध्यक्ष असताना कास्यानोव्ह 2000-2004 दरम्यान रशियाचे पंतप्रधान होते. कास्यानोव्ह यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते, की पुतिन युक्रेनवर आक्रमण करतील. तथापि, युद्ध सुरू करण्यापूर्वी पुतिन यांनी रशियातील सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या सुरक्षा समितीची बैठक बोलाविली, तेव्हा मात्र त्यांना आक्रमणाची खात्री पटली. पुतिन यांनी कास्यानोव्ह यांना पंतप्रधानपदावरून बडतर्फ केल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षात प्रवेश केला व क्रेमलिन व पुतिन यांचे आघाडीचे टीकाकार म्हणून ते जाणले जाऊ लागले. युद्ध सुरू होताच, त्यांनी देश सोडला. 14 जून रोजी पॅरिसहून आलेले त्यांच्या विषयीचे वृत्त हे एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवर आधारीत आहे. युरोपात आपले वास्तव्य कुठे आहे, हे त्यांनी जाहीर केले नाही. कारण, युरोपात आश्रय घेतलेल्या आपल्या विरोधकांचा काटा पुतिन वेळोवेळी काढत आले आहेत. त्यासाठी त्यांनी गुप्तचर संघटना व विषारी रसायनाचा वापर केल्याची उदाहरणे आहेत.

कास्यानोव्ह म्हणतात, की रशियाने युक्रेनचा ताबा मिळविला, आक्रमण यशस्वी झाले, तर त्यांची पुढील नजर बाल्टिक देशावर असेल. पुतिन यांच्याविषय़ी अलीकडे येणाऱ्या वृत्तात असेही म्हटले आहे, की त्यांना ऱशियाला पूर्वाश्रमीच्या रशियन साम्राज्याचे पुनरूज्जीवन करावयाचे आहे. पूर्वाश्रमीचा युएसएसआर म्हणजे युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक होते. ते पूर्ववैभव प्राप्त करून द्यावयाचे आहे. ते त्याना शक्य होईल काय ?.

बाल्टिक देशात लाटव्हिया, इस्टोनिया व लिथुआनिया यांचा समावेश होतो. हे तिन्ही देश सोव्हिएत युनियनच्या जोखडातून 1990-91 मध्ये स्वतंत्र झाले. ते आता नाटो, युरोपिय महासंघ, युरोझोन व ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेन्ट (ओइसीडी) चे सदस्य आहेत. पुतिन यांना युक्रेनवर हल्ला करणे सोपे होते. कारण युक्रेन अद्याप नाटो संघटनेचा सदस्य झालेला नाही. त्यामुळे नाटो विरूद्ध रशिया असा संघर्ष होण्याची शक्यता नव्हती. परंतु, युक्रेननंतर पुतिन यांनी या तीन देशांना धाकपटशा सुरू केला वा आक्रमण केले, तर त्यांना वाचविण्यासाठी नाटोला मध्यस्थी करावी लागेल व अमेरिका व युरोप थेट युद्धात खेचले जातील. स्थिती पुतिन यांच्या हाताबाहेर जाईल.

अलीकडे पुतिन यांच्या आक्रमणाचे भय वाटल्याने स्वीडन व फिनलँड या दोन देशांनी नाटोचे सदस्य होण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, त्यांना सदस्यत्व मिळाल्यास नाटो संघटना अधिक मजबूत होईल. पुतिन यांना `कमजोर’ नाटो अभिप्रेत आहे, नाटोचा विस्तार नको आहे, परंतु, युक्रेनवरील युद्धाचा नेमका उलटा परिणाम होत आहे. ब्रिटनच्या ब्रेग्झिटनंतरच्या विभाजनानंतरही युरोपीय महासंघाचे सुरक्षात्मक अयक्य अधिक मजबूत झाले आहे. या स्थितीत आजवर रशियाच्या खनिज तेल आयातीवर अवलंबून असलेल्या युरोपला अन्य देशातून खनिज तेल आयात करण्यास यश आले, तर रशियाची तेल कोंडी होण्याची शक्यता टाळता येणार नाही. तथापि, युद्धाच्या गेल्या शंभर दिवसात तसे झालेले नाही. फिनलँडमधील `सेन्टर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ नुसार, युक्रेनवरील गेल्या शंभर दिवसांच्या युद्धादरम्यान रशियाला खनिज तेलाच्या निर्यातीपासून तब्बल 98 अब्ज डॉलर्सची मिळकत झाली आहे. त्यातील चीनने 12.6 अब्ज, जर्मनीने 12.1 अब्ज व इटलीने 7.6 अब्ज डॉलर्सचे खनिज तेल आयात केले. तसेच खनिज तेलाच्या वाढत्या किमतीचाही रशियाला लाभ झाला.

युद्धाचे भवितव्य आणखी गोष्टीवर अवलंबून राहाणार आहे, ती म्हणजे पुतिन यांच्या प्रकृतीवर. त्याबाबत गेल्या काही दिवसात बऱ्याच बातम्या येत आहेत. त्यात पुतिन यांना दुर्धर रोग झाला असून, त्याचे आयुष्य जेमतेम तीन वर्षे उरले आहे, असे वृत्त आहे. आणखी काही बातम्यांनुसार, त्यांची दृष्टी अधू झाली असून, ते केवळ मोठमोठी अक्षरेच वाचू शकतात, कागद हातात धरताना त्यांचे हात थरथर कापतात, उभे राहून भाषण करताना त्यांचे पाय लटपटतात, या पासून ते त्याना नेमके काय झाले आहे, हे जगाला कळू नये, यासाठी त्यांची विष्ठा अन्य देशाच्या गुप्तचर संस्थेच्या हाती लागू नये, यासाठी ती गोळा करण्यासाठी रशियन गुप्तचर अधिकाऱ्याचे पथक नेमण्यात आले आहे, इथपर्यंत टोकाच्या बातम्यांचे पेव फुटले आहे. त्यांच्या तब्येतीबाबत येणाऱ्या बातम्यांचे रशियन नेत्यांकडून वारंवार खंडन केले जात आहे. तरीही त्यांच्या तब्येतीबाबत निर्माण होणारे सावट कमी झालेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com