
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पदकविजेत्या कुस्तीपटू महिलांनी जोरदार आंदोलन
ब्रिजभूषण शक्तिप्रदर्शनाच्या पवित्र्यात
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पदकविजेत्या कुस्तीपटू महिलांनी जोरदार आंदोलन केले. त्याच ब्रिजभूषण यांच्या समर्थनार्थ अयोध्येतील साधूंनी येत्या पाच जून रोजी मोर्चाची तयारी चालवली आहे. ‘पोक्सो’ कायद्यातील तरतुदी अन्यायकारक असल्याने त्या मागे घ्याव्यात, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
शरत् प्रधान
भा रताच्या कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर भारतातील महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर पोलिसांकडून अद्यापही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे ऑलिंपिक स्पर्धेमध्ये मिळवलेली पदके गंगेत विसर्जित करण्याचा इशारा या महिला कुस्तीपटूंनी दिला होता.
मध्यस्थीनंतर त्याची कार्यवाही त्यांनी स्थगित केली आहे. ब्रिजभूषण यांच्या विरोधात न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मात्र या सगळ्या घडामोडींना आता वेगळे वळण लागले आहे. अयोध्येतील साधूंचा एक मोठा गट ब्रिजभूषण यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे.
त्यांनी पाच जून रोजी अयोध्येमध्ये ब्रिजभूषण यांच्या समर्थनार्थ मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे ‘पॉक्सो’ कायद्यातील काही तरतुदींमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी देखील केली आहे. या कायद्यातील काही तरतुदींचा गैरवापर करून ब्रिजभूषण यांना विनाकारण त्रास देण्यात येत आहे, असा आरोप या साधूंनी केला आहे.
ब्रिजभूषण सिंह यांचे अयोध्येशी फार जुने नाते आहे. त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये, अयोध्येतील साकेत महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
त्याचप्रमाणे येथील अनेक मठांना मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. येथील साधूंच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या विविध संस्थांना ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून आर्थिक साहाय्य प्राप्त होत असते. उत्तर प्रदेशातील पूर्वेकडील अनेक जिल्ह्यांत सिंह यांच्या पन्नासहून अधिक शैक्षणिक संस्था आहेत. त्यांच्याकडे स्वतःची दोन हेलिकॉप्टर असून, येथील सरकारी यंत्रणेवरही त्यांची मोठी पकड आहे; यावरून त्यांच्या ताकदीची कल्पना येऊ शकते.
निवडणुकीची तयारी
अयोध्येतील साधूंच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला अर्थसाहाय्य आणि अन्य भागातून येथे साधूंची जाण्या-येण्याची जबाबदारी ब्रिजभूषण यांनी घेतली असल्याचे बोलले जाते. अर्थातच सिंह हे या मोर्चाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न करत आहेत.
त्यांनी या आधीच अयोध्येतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छादेखील व्यक्त केली होती. अयोध्येतून निवडणूक लढविल्यामुळे भारतीय जनता पक्षात आपल्याला विशेष स्थान मिळेल, अशी सिंह यांची धारणा आहे. त्यामुळेच त्यांचा अयोध्येतील खासदारकीवर डोळा आहे. मात्र भाजपमधील पक्षश्रेष्ठी यासाठी अनुकूल नाहीत.
त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून ब्रिजभूषण सिंह एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एक म्हणजे त्यांच्या विरोधात चालू असलेल्या खटल्याबाबत आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी तेथील स्थानिक हिंदुत्ववादी शक्तींचा पाठिंबा मिळवणे, त्याचप्रमाणे अयोध्येतून २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी आपला दावा अधिक प्रबळ करणे.
‘पोक्सो’तील तरतुदींना विरोध
दरम्यान, अयोध्येतील साधूंनी ‘पॉक्सो’ कायद्यातील काही तरतुदींबाबत आक्षेप नोंदविला आहे. या तरतुदींचा गैरवापर करून प्रतिष्ठित व्यक्तींच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अयोध्येतील ‘हनुमंत निवास’चे महंत मिथिलेश नंदिनी शरण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘पोक्सो’ कायद्यातील काही तरतुदींचा विशेषतः लैंगिक छळाच्या व्याख्येचा गैरअर्थ काढत, प्रतिष्ठित व्यक्तींना आणि विशेषतः लोकप्रतिनिधींना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या महंतांच्या म्हणण्यानुसार एखाद्याकडे पाहणे किंवा त्या व्यक्तीला सामान्यपणे स्पर्श करणे हे देखील या कायद्यांतर्गत लैंगिक छळ म्हणून गृहीत धरले जाते. “कित्येक पुरुष, महिला आणि लहान मुले देखील समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडे मदत मागायला येतात.
अशावेळी त्यांच्या डोक्यावर आशीर्वादासाठी ठेवण्यात आलेला हात देखील चुकीचा स्पर्श म्हणून गृहीत धरला जाऊन, या कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे,” अशी भीती ते व्यक्त करतात.
ब्रिजभूषण यांना समर्थन देणाऱ्या साधूंपैकी महंत शरण यांनी देखील असाच युक्तिवाद केला आहे. ते म्हणतात, “आपल्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही साधू महात्म्यांना किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेतात.
अशावेळी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला जातो. मात्र आता यालाच लैंगिक छळ म्हटले गेल्यास अन्यायकारक ठरेल.” या कायद्यांतर्गत आरोप करणाऱ्याचीच बाजू मान्य केली जाते आणि ज्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत, त्याच्या बाजूला विशेष महत्त्व दिले जात नाही; अथवा ती नीट ऐकून घेतली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.
तसेच अयोध्येतील आणखी एक प्रसिद्ध महंत सत्येंद्र दास म्हणतात, “पोक्सो हा कायदा काहीसा एकतर्फी आहे. त्यामुळेच प्रतिष्ठित व्यक्तींना बदनाम करण्यासाठीही त्याचा वापर केला जात आहे. या प्रकरणातील आरोपीला खटला सुरू होण्याआधीच प्रसारमाध्यमे दोषी ठरवतात, हे दुर्दैवी आहे.”
या पार्श्वभूमीवर अयोध्येतील अनेक साधू आंदोलनाच्या पवित्र्यात असून ते याबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. त्याद्वारे या कायद्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करणार आहेत. अर्थात कोणत्याही कायद्यामध्ये सुधारणा करणे ही दीर्घ प्रक्रिया आहे. त्यामुळे महिला कुस्तीपटूंचे म्हणणे काहीही असले तरी देखील आमचा ब्रिजभूषण यांना पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठीच पाच जूनच्या मोर्चाचा खटाटोप असल्याचे दिसून येते.
(अनुवाद ः रोहित वाळिंबे)