सुख-दुख:चा अनुभव देणारी 'हिरकणी', सायकलनं जगायला शिकवलं

सुख-दुख:चा अनुभव देणारी 'हिरकणी', सायकलनं जगायला शिकवलं
Summary

माझी हिरकणी मला सांभाळून घेते, माझा आर्थिक भार कमी करते. मला मनमुराद फिरायला मदत करते..अजून काय हवं? आयुष्यात सायकल सारखी गर्लफ्रेंड असेल तर मिळत फक्त निस्वार्थी प्रेम आणि जग हुंदडण्यासाठी सोबत..!

जिच्या प्रेमाचा कल माझ्या बाजूने नेहमी असतो ती माझी सायकल. माझ्या सायकल प्रेमाबद्दल काय सांगू आणि सांगावं तेवढं कमीच. खेड्याकडून शहरात येताना आईचा निरोपाचा हात सुटला आणि तो सावरला या सायकलने. कोल्हापूरपासून अवघ्या 30 किलोमीटरवर माझं कसबा वाळवे हे गावं. या अंतरात मला गाव जवळ करणारी गावाला जोडून ठेवणारी माझी सायकल मला नेहमी आठवते. कधी आयुष्याच्या चढाओढीत सुखाचा पॅडल खाली जातो आणि दुःखाच पॅडल वर येत आणि हे सुखदुःखाच चक्र नेहमीच चालू असत पण या दोन्हीतही साथ देणारी सायकल नेहमी जवळची वाटते.कॉलेजपासून हॉस्टेल असो की लायब्ररी-सकाळपासून रात्रीपर्यंत तिची फेरी कधीच चुकत नाही. ना पेट्रोलचा खर्च ना कसलीच चिंता आणि शरीर तंदुरुस्त ठेवणारी एकमेव गोष्ट जी आपल्या सोबत नेहमी असायला पाहिजे ती सायकल.

कोल्हापुरातल्या नामांकित राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि बावड्यातल्या हॉस्टेलवरुन थेट कॉलेजवर यायचं, मित्रांच्या सोबतीने कधीकधी पन्हाळ्यावर जाणं व्हायचं, ऐतिहासिक किल्ले तेही सायकलवरून पाहण्याची मज्जाच काही वेगळी असते. माझा पहिला थरारक अनुभव सांगायचं म्हंटल तर सायकलवरून केलेली रांगणा सफारी. कोल्हापूर पासून दीडशे किलोमीटर वर असणारा अभेद रांगणा किल्ला.मी शिवतेज, विकास, श्रद्धा, अमित बाकीचे सगळे गारगोटी पर्यन्त बसवर सायकल टाकून आले. मी मात्र माझ्या हिरकणीवरून म्हणजे सायकल, मी तीच नाव हिरकणी ठेवलंय. तिच्यावरून थेट रांगणा. जंगलातून जाणारी खडबडीत वाट,वाटेत उंच सखल दगड आणि तुटुंब वाहणारे ओढे यातून वाट काढायची होती. सगळ्यात अवघड म्हणजे येथे असणारी जंगली प्राण्यांची वर्दळ. कधी कोणता प्राणी समोर येईल सांगता येत नाही म्हणून घाबरून जाऊन आम्ही सायकली फास्ट चालवत किल्ल्यावर पोचलो सुद्धा. रांगणाईदेवीच मंदिर आणि हत्तीसोंड पाहून आम्ही त्याच दिवशी रात्रीच्या प्रवासाला निघालो आणि पुन्हा तोच रस्ता फक्त आता आमच्याकडे होते मोबाईलचे टॉर्च. हातातला मोबाईल सांभाळायचा की सायकल धरायची या धावपळीत समोरून किती साप गेले हे सगळं आठवून आजही मन धजत. पण सायकलने किल्ला फिरण्याची मजा काही औरच..!

सुख-दुख:चा अनुभव देणारी 'हिरकणी', सायकलनं जगायला शिकवलं
निसर्गाचा मुक्तछंद!

मागच्या वर्षी म्हणजे नुकताच कोरोना यायच्या अगोदर नव्या वर्षाच्या स्वागताला आम्ही दिल्ली राईड केली होती. कोल्हापूर ते दिल्ली सायकलने जायचं ठरलं. कित्येक जणांनी तर आम्हाला वेड्यात काढलं. थंडी खूप असते,दरोडेखोरीचे प्रकार घडतात अस काहीबाही सांगितल पण मागे हटेल तो सायकलप्रेमी कसला. आम्ही कसुन तयारी केली. जेमतेम सोबत लागणार साहित्य घेतलं आणि स्वारी निघाली दिल्ली वारी. दोन गडी कोल्हापुरी अशी टॅगलाईन घेऊन दोघांनी दिल्ली कडे कूच केली. वाटेत फेसबुकवरच्या मित्रांच्या भेटीगाठी घेत आम्ही सातारा-पुणे-राळेगणसिद्धी-शिर्डी-नगर-धुळे-उज्जैन-आग्रा-दिल्ली असा प्रवास करत इंडिया गेट वर आमची राईड संपवली. राईडचा पहिला टप्पा आग्र्यातल्या लाल किल्ल्यावर संपला ते थेट दुसरा टप्पा इंडिया गेटवरून राजघाट वर. बस मधल्या डब्यातून हे सगळं अनुभवता आलं नसतं जितकं सायकलने अनुभव दिले. आम्ही जाताना महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा या राज्यातून गेलो.तब्बल 2300 किलोमीटरचं अंतर आम्ही सायकलने पार केल तेही अठरा दिवसात.! सायकलने संस्कृतीच दर्शन घडवलं. जगायला शिकवलं. दिल्लीच्या राजपथावरील परेड पाहणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं,भारताच्या प्रजासत्ताक दिनी आम्ही त्या परेडचा एक भाग झालो. सायकलने भरभरून दिलं, देत आहे आणि इथून पुढे भरभरून देत राहिल यात शंका नाही.

सुख-दुख:चा अनुभव देणारी 'हिरकणी', सायकलनं जगायला शिकवलं
World Bicycle Day: सायकल ट्रॅकवर धावणारं जग!

जून महिन्याची नुकतीच सुरवात झालीय आणि पावसाची चाहूल देखील लागतीय. मान्सूनच्या वातावरणात सायकलवरून किल्ले डोंगर फिरण्याची मज्जा काही औरच असते. हिरवाईने नटलेला सह्याद्री आणि पॅडल मारेल तसे अनेक चित्तथरारक अनुभव सायकल देत राहते. माझी सायकल मला जीवापेक्षा प्रिय वाटते कारण ती मला व्हर्चुअल नाही तर खऱ्या आयुष्यात जगायला शिकवते. माझी हिरकणी मला सांभाळून घेते, माझा आर्थिक भार कमी करते. मला मनमुराद फिरायला मदत करते..अजून काय हवं? आयुष्यात सायकल सारखी गर्लफ्रेंड असेल तर मिळत फक्त निस्वार्थी प्रेम आणि जग हुंदडण्यासाठी सोबत..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com