
BLOG: मोदी-शहांनाही भीती वाटावी! ब्रिजभूषण सिहांकडं नेमकी कोणती कवचकुंडलं?
-- प्रतिक पाटील
स्त्रीला एखाद्या अनोळखी पुरुषानं वासनांध नजरेनं पाहिलं किंवा काही इशारा केला किंवा कुठं कळत-नकळत साधा अंगाला स्पर्श केला. तर ही बाब तिला किती अस्वस्थ करू शकते याची आपण कल्पनाही करू शकत नाही. कुस्तीपटूंच्या प्रकरणात तर जबरदस्तीनं संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ब्रिजभूषण विरोधात अल्पवयीन मुली ते पदक विजेत्या कुस्तीपटूंनी आपले जबाब नोंदवले आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत.
क्रीडा क्षेत्रातील कारकीर्दीवर थेट प्रभाव पाडू शकणार्या अन् सत्तेत वावरत असणाऱ्या व्यक्तीकडून अशा गोष्टी घडतात तेव्हा त्या उघडकीस आणणं हे अत्यंत धैर्याचं काम असतं. हा निर्णय घेताना त्यांचं मानस उद्रेक होईपर्यंत अनेक आंदोलनातून जात असावं. पण जेव्हा केव्हा त्यांचा आक्रोश ते उघडपणे मांडतात तेव्हा एक सभ्य समाज म्हणून आपलं पहिलं कर्तव्य हे त्यांना सुरक्षिततेची हमी देणं असतं. इथे अमेरिकेतील एक उदाहरण पुरेसं असेल.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पॉर्नस्टारसोबत संबध प्रस्थापित केल्याचं सांगितलं गेल. पण राष्ट्रपतीपदाची निवडणूक होण्यास दोनच दिवस बाकी असताना या महिलेला या गोष्टी लपवून ठेवण्यासाठी १ कोटी ३० हजार डॉलर्सची रक्कम देण्यात आली. पण संबंधित महिलेनं सन 2018 मध्ये याबाबतीत खुलासे केल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. कारण हा प्रकार अवैध असून यात ट्रम्प दोषी असल्याचा निर्णय दिला गेला.
पण आपल्या इथं मात्र आपलं सरकार कुस्तीपटूंचं ऐकायलाही तयार नाहीत, न्याय देणं ही तर त्यानंतरची बाब झाली. हे कमी की काय, पक्ष प्रेमात अंध झालेल्यांनी पीडितांचीच विविध प्रकारे 'लांडगेतोड' सुरू केली आहे. या सगळ्यांसाठी जणूकाही त्याच जबाबदार आहेत या हेतूनं त्यांनाच प्रश्न विचारले जात आहेत. त्यांचंच चारित्र्य हनन सुरू आहे. त्यांना देशविरोधी, विरोधी पक्षाचे एजंटही घोषित करून झालं. आपल्या अतिशय डेकोरेटेड असलेल्या या कुस्तीपटूंना सरकार दरबारी कुणीही ऐकायला तयार नाही. पण याच कुस्तीपटूंनी पदकं आणली तेव्हा आपल्या याच पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी ट्विटही केले होते आणि आता चार महिने अंदोलन करूनही तेच पंतप्रधान यांची दखलही घेत नाहीत. यावरून त्यांचा दुटप्पीपणा पुरेसा उघड होतो.
लैंगिक छळासंबंधी अत्यंत कठोर कायदे आणि पीडितांना जलदगतीनं न्याय मिळण्यासंबंधीच्या तरतुदी भारताच्या कायद्यात आहेत. पण असं असतानाही या प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या या कुस्तीपटूंना आपली तक्रार नोंदवण्यासाठी अशा क्लेशदायक आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागत आहे, ही देशासाठी आणि देशातील नागरिकांसाठी अतिशय लज्जास्पद बाब आहे. हे फक्त व्यवस्थेचं अपयश नसून आरोपीला पाठीशी घालण्यासाठी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न आहेत.
या प्रकरणातील आरोपी ब्रिजभूषण सिंह यांच्याकडे अशी कुठली कवच कुंडलं आहेत? की अमर्याद सत्ता आणि या सत्तेच्या बळावर कुणालाही वकवणाऱ्या मोदी-शहांनाही त्यांची भीती वाटावी! स्वतःच्या पक्षातील संविधानिकपदावर असणारी व्यक्ती जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशा हीन दर्जाचं कृत्य करत असते तेव्हा त्याच्याविरुद्ध बोट उचलायची सुद्धा हिंमत गृहमंत्रालय करू शकत नाही. तर सामाजिक स्वास्थ्य नक्कीच धोक्यात आलेलं आहे, याबाबतीत दुमत नसावं. पण तरी सुद्धा सर्व काही संपलेले नाही. देशातील सुज्ञ व विचारी लोक या कुस्तीपटूंच्या अंदोलनाला आपला पाठिंबा देत आहेत. त्यांच्यासाठी सोशल माध्यमातून लिहीत आहेत, ही आश्वासक बाब आहे.